सत्य काय?

0
92

पर्ये मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विश्‍वजित कृष्णराव राणे यांच्यावर त्यांच्या माजी चालकाने केलेला शाणू गावकर याच्या हत्येचा आरोप अतिशय गंभीर आहे आणि त्यातून जागलेल्या संशयाचे निराकरण निश्‍चितपणे व्हायला हवे. २००६ साली घडलेल्या त्या घटनेची वाच्यता करायला त्या चालकाने तब्बल अकरा वर्षे का लावली आणि ही जबानी पोलिसांपुढे देण्याऐवजी महाराष्ट्रातील एका आरटीआय कार्यकर्त्याची मदत त्याने का घेतली हा प्रश्न मात्र गूढ निर्माण करतो आणि त्याची उत्तरेही मिळाली पाहिजेत. विधानसभा निवडणुकीत विश्वजित कृष्णराव राणे यांनी प्रतापसिंह राणे यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराशी टक्कर घेतली आहे. आम मतदान झाले असले तरी सरकारी कर्मचार्‍यांचे मतदान अजून व्हायचे आहे. अशा वेळी कोण्या एका व्यक्तीने दुसर्‍याचा हवाला देऊन केलेल्या आरोपाची कोणतीही शहानिशा न करता एखाद्याला खुनी ठरवणे न्यायोचित ठरत नाही. कोणी कोणाविरुद्ध कितीही गंभीर आरोप जरी केला, तरी जोवर त्याची शहानिशा होत नाही आणि आरोप सिद्ध होत नाही, तोवर अशा निष्कर्षाप्रत येणे गैर ठरेल. त्यामुळे सद्यपरिस्थितीत तरी सदर चालकाने केलेल्या आरोपाची सर्वतोपरी चौकशी होणे, त्यासाठी स्वतः विश्‍वजित यांनी पोलीस तपासकामास सहकार्य करणे गरजेचे आहे. आपल्याजवळ खंडणी मागितली गेली होती असे राणे यांचे म्हणणे आहे. परंतु वारंवार अशा धमक्या मिळूनही ते स्वस्थ का राहिले हाही प्रश्न येतोच. त्यांच्या पक्षाचे सरकार राज्यात सत्तेवर असताना सातत्याने खंडणीच्या धमक्या मिळूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करावे एवढी साधी ही बाब नक्कीच नव्हती. चालक अजय आरदाळकर याला जी काही विशेष माहिती होती आणि त्याच्या आधारे तो व आणखी कोणी विश्‍वजित यांच्याकडून खंडणी उकळू पाहात होता असा त्यातून अर्थ निघतो. मुळात शाणू गावकर हा एवढी वर्षे बेपत्ता असूनही त्यासंंबंधी पोलिसांकडून योग्य तपासकाम का झाले नाही हा या प्रकरणातील कळीचा मुद्दा आहे. त्याचा खरोखरच खून झाला, तर त्याचा सुगावा पोलिसांना एवढ्या वर्षांत का लागू शकला नाही? पोलिसांवर काही दडपण होते का? हेही प्रश्न आता उपस्थित होतात. विश्‍वजित यांच्या चालकाने केलेल्या दाव्याप्रमाणे होंडा येथील एका मद्यालयामध्ये सदर खून झाला. त्या मृतदेहाची नंतर काही व्यक्तींनी विल्हेवाट लावली असेही सदर चालकाने सुरवातीला सांगितले. नंतर विल्हेवाट आपणच लावल्याची जबानी त्याने दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. म्हणजे पोलिसांना तपासकामाची एक स्पष्ट दिशा या माहितीतून मिळाली आहे. मृतदेह अनमोड घाटात नेऊन टाकला त्याला आता दहा वर्षे उलटून गेली आहेत, परंतु ज्यांची नावे पुढे आली आहेत, ते तर आहेत. सत्य बाहेर येण्यासाठी हवी आहे तपासकामातील तत्परता, निष्पक्षता आणि तशी राजकीय इच्छाशक्ती. खुनासारख्या प्रकरणात सबळ दुवे आणि पुरावे उपलब्ध असतील तर आरोपी कितीही बडी असामी असली तरी आजच्या सोशल मीडियाच्या काळात त्यावर पांघरूण टाकणे सोपे नाही याची जाणीव तपास अधिकार्‍यांनीही ठेवायला हवी. सदर चालकाने केलेला आरोप, त्यावरील विश्‍वजित कृ. राणे यांचे म्हणणे, ज्यांची नावे चालकाने घेतली त्या व्यक्ती, ज्या मद्यालयामध्ये सदर घटना घडली असे सांगितले गेले आहे, तेथील कर्मचारी असे अनेक दुवे पोलिसांना तपासासाठी आता उपलब्ध झाले आहेत. पोलिसांना या गुंतागुंतीच्या तपासकामासाठी थोडा वेळ देणे आवश्यक आहे, पण शाणू गावकर प्रकरणाचे गूढ उकलण्यासाठी एवढी जय्यत साधने हाती असल्याने सत्य काय हे लवकरच जनतेसमोर येईल अशी अपेक्षा आहे.