म्हादई : नाडकर्णींना गोव्याची बाजू मांडण्यास अनुमती द्यावी

0
82

>> मुख्यमंत्र्यांचे प्रधानमंत्र्यांना पत्र

 

भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल बनलेले गोव्याचे माजी ऍडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांना म्हादईप्रश्‍नी जललवादासमोर गोव्याची बाजू मांडण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. तशी मागणी करणारे पत्र श्री. पार्सेकर यांनी मोदी यांना पाठविले आहे.
म्हादई पाणीतंटा प्रश्‍नावर गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यांचा जललवादासमोर लढा सुरू आहे. गोव्याचे ऍडव्होकट जनरल असताना ऍड. नाडकर्णी यांनी म्हादईप्रश्‍नी गोव्याची बाजू मांडताना अतिशय प्रभावीपणे युक्तिवाद केला होता. त्यामुळे लवादाने अंतरिम निवाडा गोव्याच्या बाजूने दिला होता. मात्र, ऍड. नाडकर्णी सध्या देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल असल्याने केंद्र सरकारने त्यांना म्हादई प्रश्‍नावर गोव्याची बाजू मांडण्यास अनुमती नाकारली आहे. त्यामुळे गोव्याची बाजू लंगडी पडण्याची भीती गोवा सरकारला वाटत आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहून वरील मागणी केली आहे.
म्हादईचे पाणी मलप्रभेत वळवण्यासाठी कर्नाटकाने सुरू केलेले कळसा कालव्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. लवादाचा आदेश धुडकावून कर्नाटक सरकारने हे काम चालूच ठेवले आहे.