भिकार्‍यांविरुद्ध कारवाई करा

0
63

>> महापौरांची पोलिसांना सूचना

 

पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी शहरातील भिकार्‍यांविरुद्ध मोहीम उघडण्याचा निर्णय घेतलेला असून शहरातील पदपथ व अन्य ठिकाणी बसून भीक मागणार्‍या भिकार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याची सूचना पणजी पोलीस स्थानकाच्या निरीक्षकाना केली आहे. भीक मागणे प्रतिबंध कायद्याखाली या भिकार्‍यांवर कारवाई करण्याची सूचना फुर्तादो यांनी एका पत्राद्वारे पोलीस निरीक्षकाना केली आहे.
पणजी शहरात ठिकठिकाणी बसून भीक मागणारे हे भिकारी पर्यटक व स्थानिक लोकांना त्रास करीत असल्याच्या लोकांच्या वाढत्या तक्रारी असल्याच्या पार्श्‍वभूमीवर फुर्तादो यांनी निरीक्षकाना हे पत्र लिहिले आहे. एका पत्र लेखकाने एका स्थानिक वृत्तपत्रात पत्र लिहून पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी पणजी शहरातील भिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
परराज्यांतून गोव्यात येऊन येथे भीक मागणार्‍या भिकार्‍यांची संख्या गोव्यातील सर्व शहरांत वाढतच चाललेली आहे. काही माफियानीच या भिकार्‍यांचे जाळे विणलेले असून दोन वेळचे जेवण देऊन त्यांना मोक्याच्या ठिकाणी भीक मागण्यांसाठी बसवले जात असल्याचे वृत्त आहे. लुळे-पांगळे, लंगडे, आंधळे अशा लोकांचा हे माफिया भीक मागण्यासाठी वापर करीत असल्याचे वृत्त आहे. देशभरात या माफियानी भिकार्‍यांचे जाळे विणले असावे असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.