अल्पवयीन मुलीचे अपहरण; फोंड्यात खानापूरचे दोघे जेरबंद

0
58

खानापूर-बेळगाव येथील एका अल्पवयीन युवतीचे अपहरण करून कुंडई येथील तपोभूमीजवळ आणून सोडल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. अनील संभाजी पाटील (२५) व तुकाराम बाजीराव पाटील (३२, दोघेही खानापूर) अशी संशयितांची नावे असून अपहरण करण्यासाठी वापरलेली केए २५-पी-७५९७ क्रमांकाची स्कॉर्पिओ जीप जप्त करण्यात आली आहे.

दोघाही संशयितांनी मंगळवारी दहावीच्या वर्गात शिकणार्‍या युवतीला हायस्कूलजवळून स्कॉर्पिओतून गोव्यात आणले. कुंडई येथील तपोभूमी जवळ सदर अल्पवयीन युवतीला आणून सोडल्याचे कळताच युवतीच्या वडिलांनी फोंडा पोलीस स्थानकात तक्रार दिली. त्यानुसार चौकशी केली असता सदर स्कॉर्पिओ जीप म्हार्दोळ येथे आढळून आली. यावेळी पोलिसांनी स्कॉर्पिओत असलेल्या दोघाही संशयितांना पोलीस स्थानकात आणून अटक केली.
अपहरण करून तपोभूमीजवळ सोडण्यात आलेल्या अल्पवयीन युवतीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. उपनिरीक्षक योगेश मांद्रेकर याप्रकरणी तपास करीत आहे. अटक केलेल्या संशयितांना न्यायालयाने ३ दिवसांचा रिमांड ठोठावला आहे.