नाहक वाद

0
104

शिवजयंतीचे निमित्त करून वाळपई व मडगावात जो धार्मिक तणाव निर्माण झाला, त्या घटना दुर्दैवी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एखाद्या जातीय अथवा धार्मिक अस्मितेचे नव्हेत, तर ते राष्ट्रीय स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. असे असताना त्यांची जयंती हा वादाचा विषय बनावा यासारखे दुर्दैव ते काय? शिवजयंतीचे निमित्त साधून कोणी जर धार्मिक तणाव निर्माण करू पाहात असेल तर या प्रवृत्तीची वेळीच दखल घेतली जाणे आवश्यक आहे. या वर्षी प्रथमच गोव्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिवजयंती सोहळे साजरे झालेले पाहायला मिळाले. ठिकठिकाणी झालेल्या या कार्यक्रमांमागे कोणत्या प्रेरणा होत्या हेही तपासले जाणे गरजेचे वाटते, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि कार्य यापासून आदर्श घेण्यासाठी सोहळा साजरा होण्याऐवजी विशिष्ट समुदायाला धाक दाखवण्यासाठी, धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या उत्सवांचा गैरवापर होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हा लोकोत्तर राजा ‘यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत’ तर होताच, परंतु त्याच बरोबर ‘पुण्यवंत आणि नीतीवंत’ही होता. रयतेचे स्व-राज्य त्यांनी आयुष्य वेचून उभे केले. ‘उपभोगशून्य स्वामी’ या भावनेने सांभाळले. आपल्या अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यामध्ये कित्येक मानदंड प्रस्थापित केले. आदर्श घालून दिले. मुख्य म्हणजे सामान्य रयतेला स्वाभिमानाने उभे राहायला शिकविले. तिला ध्येयवाद शिकवला. शिवरायांनी सर्व धर्मांचा सदैव आदरच केला. अनेक मुसलमान अधिकारी त्यांच्या स्वराज्यात महत्त्वाच्या पदांवर होते. शिवाजी महाराजांनी उभारलेल्या देशातील पहिल्यावहिल्या अशा मराठी आरमाराचा प्रमुख दौलतखान होता. इब्राहिमखान त्यांचा तोफखाना सांभाळीत असे. मठ आणि मंदिरांबरोबरच दर्गे आणि मशिदींनाही त्यांनी सदैव साह्य केले. एखाद्या स्वारीत कुराणाची प्रत जरी सापडली तरी ती ते सन्मानपूर्वक परत करीत असत असे इतिहासकारांनी लिहून ठेवलेले आहे. अशा मोठ्या मनाच्या या शिवरायाच्या जयंती उत्सवाला एखाद्या धार्मिक समूहाने विरोध करणे हेही समजण्यापलीकडचे आहे. असा विरोध होत असेल तर त्या समाजातील बुजुर्गांनी अशा दांडगटांना योग्य समज देणे गरजेचे आहे. वाळपईतील मुसलमान समुदाय हा तेथील हिंदू समाजाइतकाच राष्ट्रप्रेमी आहे. बहुतेकांचे प्राथमिक शिक्षण मराठीतून झालेले आहे. ते उत्तम मराठी बोलतात आणि लिहितात. मराठी वर्तमानपत्रे आणि मराठी साहित्य वाचतात. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या जीवनकर्तृत्वाचा अभिमान त्यांच्याही नसानसांत आहे आणि असायला हवा. त्यामुळे जो काही तणाव तेथे निर्माण झाला तो गैरसमजांतून झालेला असावा आणि त्या गैरसमजांचे निराकरण सामंजस्याने होण्याची आवश्यकता आहे. दोन्ही समाजांतील विचारी, समंजस लोकांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. वाळपईत रातोरात शिवपुतळा उभारण्याचा प्रयत्न झाला. यापूर्वी डिचोलीत छत्रपती शिवाजी महाराज मैदानासमोरील शिवपुतळ्याची विटंबना करून तणाव निर्माण करण्याचा कोणी पद्धतशीर प्रयत्न केला होता. अशा घटना घडू नयेत यासाठी निर्जीव पुतळ्यांपेक्षा अशा लोकोत्तर आदर्शांना आपल्या जीवनात अनुसरणे अधिक श्रेयस्कर ठरेल. छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्वगुण, त्यांचे संघटनकौशल्य, त्यांची मुत्सद्देगिरी, द्रष्टेपण, व्यवस्थापन चातुर्य, प्रजाहितदक्ष वृत्ती असे खूप काही शिकण्यासारखे आहे. ज्यावर एकही डाग नाही असे निष्कलंक आयुष्य जगलेल्या शिवाजी महाराजांच्या नावाने भलते वाद निर्माण करणे हे राजकीयदृष्ट्या काहींना लाभाचे ठरू शकेल, परंतु समाजाच्या दृष्टीने मात्र त्यातून कोणतेही हित साधले जाणार नाही आणि छत्रपतींच्या उज्ज्वल वारशाची तर ती थट्टाच ठरेल.