हृदयविकाराचा झटका

0
508

– डॉ. स्वाती अणवेकर

पूर्वी हृदयविकाराचा झटका हा फक्त साठी-सत्तरीनंतरच कुणालातरी आल्याचे व त्याचा मृत्यू झाल्याचे आपण ऐकायचो. पण आता तसे नाही आणि याचे कारण आहे आपले बदललेले खान, पान, राहणीमान इ.

हृदयविकाराचा झटका म्हणजेच ‘हार्ट अटॅक’ कसा येतो?
– वैद्यकीय भाषेत यालाच ‘ऍक्यूट मायोकार्डियल इन्फार्क्शन’ असे देखील म्हणतात. हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट अटॅक तेव्हाच येतो जेव्हा हृदयाला रक्ताचा पुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाहात अडथळा (ब्लॉक) येतो म्हणजेच त्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात. तसे झाले की हृदयाच्या पेशींना इजा होते आणि अशा परिस्थितीमध्ये कधी कधी तर त्या व्यक्तीच्या जीवाला पण धोका निर्माण होतो. उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्ट्रॉल, डायबेटीस असे आजार असणार्‍या व्यक्तींना तर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता एखाद्या स्वस्थ व्यक्तीपेक्षा अधिक असते.
मायोकार्डियल इन्फार्क्शनमध्ये हृदयाला होणारा रक्तपुरवठा अचानक बंद होतो व त्यामुळे हृदयाच्या पेशींना इजा पोहोचते. यात प्रामुख्याने हृदयाला रक्त पुरवठा करणार्‍या करोनरी आर्टरीजमध्ये अडथळा निर्माण झालेला असतो. हा अडथळा या रक्तवाहिनीमध्ये निर्माण झालेल्या प्लाकमुळे असतो. हा प्लाक कसा निर्माण होतो ते आपण पाहू या. हा प्लाक रक्तातील टाकाऊ पेशी, चरबी व कोलेस्ट्रॉल यापासून तयार झालेला असतो.
आपल्या भारतासारख्या प्रगतशील देशामध्येदेखील हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू येण्याचे प्रमाण पुष्कळ वाढलेले आढळते. अगदी नवजात शिशूपासून, लहान मुले, विशी-पंचविशीतले, चाळीशीतले तरुण-तरुणीदेखील याचे बळी झाल्याचे ऐकायला येते. पूर्वी हृदयविकाराचा झटका हा फक्त साठी-सत्तरीनंतरच कुणालातरी आल्याचे व त्याचा मृत्यू झाल्याचे आपण ऐकायचो. पण आता तसे नाही आणि याचे कारण आहे आपले बदललेले खान, पान, राहणीमान इ.
हृदयविकाराचा झटका येतो आहे हे कसे समजावे?..
त्याची लक्षणे कोणती?–
* छातीत वेदना होणे, श्‍वास घ्यायला त्रास होणे… ही जरी हृदयविकाराचा झटका येण्याची प्रमुख लक्षणे असली तरीदेखील प्रत्येक व्यक्तीमध्ये थोड्याफार फरकाने खालील लक्षणे दिसून येतात.
– छातीत घट्टपणा व प्रेशर आल्यासारखे वाटणे.
– छाती, पाठ, जबडा आणि शरीराच्या वरच्या भागात वेदना होऊन काही काळ थांबणे किंवा कमी होणे व पुन्हा तशाच वेदना होणे.
– श्‍वास घ्यायला त्रास होणे.
– शरीरावर थंड हवामानात अथवा कारण नसताना प्रचंड घाम येणे.
– पोटात मळमळणे.
– कधी कधी काही लोकांना उलटीदेखील होते.
– शरीराला थकवा जाणवणे.
– खोकला येणे.
– टक्कर आल्यासारखे वाटणे.
– हृदयाचे ठोके वाढणे.
प्रत्येक व्यक्तीमध्ये हृदयविकाराचा झटका येत असताना थोड्याफार फरकाने हीच लक्षणे जाणवतात मग ती व्यक्ती स्त्री असो अथवा पुरुष.
छातीत वेदना होणे हे लक्षण स्त्री व पुरुष दोघांमध्येही पहायला मिळत असले तरी बायकांमध्ये काही विशेष लक्षणे पहायला मिळतात.
– श्‍वास घ्यायला त्रास होणे.
– जबडा दुखणे
– डोके अगदी हलके वाटणे
– मळमळणे अथवा उलटी येणे.
हृदयविकाराचा झटका येण्याची कारणे कोणती?
हृदय हे कार्डिओ-व्हास्न्युलर संस्थेमधील प्रमुख अवयव आहे. यात बर्‍याच महत्त्वाच्या रक्तवाहिन्या असतात. त्यातील प्रमुख रक्तवाहिनी म्हणजे करोनरी आर्टरी होय. या रक्तवाहिन्या प्राणवायुयुक्त शुद्ध रक्ताचे वहन शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांना व हृदयाला देखील करतात. जेव्हा ह्या रक्तवाहिन्या काही कारणाने ब्लॉक होतात अथवा त्यांच्या भिंतीमध्ये साठलेल्या प्लाकमुळे त्या संकुचित होतात तेव्हा हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी होतो अथवा पूर्णपणे बंदच पडतो. आणि अशी परिस्थिती उद्भवली असता हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
कोरोनरी धमनीमध्ये ब्लॉकेज निर्माण होण्याची असंख्य कारणे आहेत. त्यातील काही महत्त्वाची कारणे पाहूया.
वाईट कोलेस्ट्रॉल ः
यालाच अर्वाचीन वैद्यक शास्त्रात एलडीएल अथवा लो डेन्सिटी लायपोप्रोटीन असे म्हणतात. हेच कोरोनरी धमनीमधील ब्लॉकेजचे प्रमुख कारण आहे. कोलेस्ट्रॉल हा रक्तामध्ये असणारा रंगविरहित घटक आहे. आपल्या शरीरातदेखील कोलेस्ट्रॉलची निर्मिती होत असते. सर्वच प्रकारचे कोलेस्ट्रॉल हे शरीरास अपायकारक असते असे नाही. पण एल्‌डीएल् कोलेस्ट्रॉल जर गरजेपेक्षा जास्त वाढले तर हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या प्रमुख रक्तवाहिन्यांच्या भिंतीना चिकटते व प्लाकची निर्मिती करते. हाच प्लाक कठीण पदार्थ असतो जो हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या प्रमुख धमन्यांना ब्लॉक करतो. रक्तामधील प्लेटलेट्‌स या पेशी ज्या रक्त गोठायला मदत करतात त्यादेखील या प्लाकला चिकटून राहू शकतात ज्याचे कालांतराने गंभीर परिणाम दिसतात.
(क्रमशः)