तामिळी तमाशा

0
95

तामीळनाडू विधानसभेत शनिवारी ई. पलानीस्वामींवरील विश्वासदर्शक ठरावावेळी जे रणकंदन घडले, ते लोकशाहीस मुळीच शोभादायक नाही. सभापतींचे पक्षपाती वर्तन, माध्यमांविरुद्ध दडपशाही, आमदारांची बेशिस्त आणि धटिंगणगिरी या सार्‍यांनी भारतीय लोकशाहीवर आणखी एक ओरखडा उमटवला आहे. ई. पलानीस्वामींना राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी पंधरवड्याची मुदत दिली असली, तरी ते लवकरात लवकर विश्वासमत प्राप्त करण्याचा प्रयत्न करतील अशी अटकळ होतीच. त्याप्रमाणे त्यांनी घाईघाईने विश्वासमत घेऊन निसटत्या बहुमतावर सत्ता हस्तगत करण्याचा निकराचा प्रयत्न केला. गुप्त मतदानास नकार देऊन सभापती पी. धनपाल यांनीही त्यांच्या या प्रयत्नाला सक्रिय साथ दिली. मतदान लांबणीवर टाकावे ही द्रमुकने पुढे केलेली मागणीही फेटाळली गेली. विधानसभेत काय घडते आहे हे जनतेला कळू नये यासाठी विधिमंडळाचे दूरचित्रवाणी प्रक्षेपण बंद ठेवण्यात आले, पत्रकारांच्या कक्षातील ध्वनिक्षेपक बंद करण्यात आला. मग जे काही सभागृहात घडले ते थक्क करणारे होते. आमदारांनी माईक तोडले, खुर्च्या तोडल्या, सभापतींना धक्काबुक्की केली, कागदपत्रे फाडली. एकूण ८८ साली जानकी रामचंद्रन आणि जयललिता यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईत जे घडले होते किंवा त्यानंतर ८९ साली द्रमुक आणि अद्रमुक यांच्यातील धुमश्चक्रीत करुणानिधींचा चष्मा फोडण्यापासून जयललितांची साडी फाडण्यापर्यंतचे जे प्रकार घडले होते, त्याच धाटणीची धटिंगणशाही यावेळी झाली. ई. पलानीस्वामी आणि ओ. पनीरसेल्वन यांच्यातील या सत्तासंघर्षात आक्रमक झाले ते द्रमुकचे आमदार. स्टालीन यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आघाडी उघडली. त्यांना बाहेर काढून सभापतींनी विश्वासदर्शक मत उरकून घेतले आणि पलानीस्वामींना १२२ विरुद्ध ११ असा हा सामना सहज जिंकता आला. पण जरी पलानीस्वामी विश्वासदर्शक ठराव अशा प्रकारे जिंकले असले, तरी ही लढाई येथे संपलेली नाही आणि संपणार नाही. ही तर सुरूवात आहे. पनीरसेल्वमनी आधीच आघाडी उघडली आहे. अभाअद्रमुकच्या सरचिटणीसपदी शशिकला यांच्या झालेल्या निवडीलाच त्यांनी निवडणूक आयोगाकडे आव्हान दिलेले आहे. त्यासंदर्भात न्यायालयातही धाव घेतली जाऊ शकते. शिवाय जनतेपर्यंत जाऊन त्यांचे समर्थन मिळवण्याचा इरादाही त्यांनी आधीच जाहीर केला आहे. दुसरीकडे, आपल्या प्रतिस्पर्धी पक्षातील या सार्‍या दुफळीचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न द्रमुक करतो आहे. स्टालीन यांची सध्याची आक्रमकता त्याचेच संकेत देते आहे. शनिवारच्या धुमश्चक्रीत पनीरसेल्वन समर्थक आमदार आक्रमक नव्हते, तेवढी आक्रमकता द्रमुकने दाखवली त्याचे कारण हेच आहे. पलानीस्वामींनी बहुमत प्राप्त केले असले, तरी त्यासाठी जो मार्ग अवलंबिण्यात आला तो काही प्रशंसनीय नव्हता. शशिकला यांनी पक्षाच्या आमदारांना ते फुटू नयेत म्हणून रिसॉर्टमध्ये कोंडून ठेवले होते. शशिकलांची रवानगी तुरुंगात झाली तरी या आमदारांना घरीही जाऊ दिले गेले नाही. थेट विधानसभेत आणण्यात आले. काही उंदीर पनीरसेल्वम यांच्या गटात येऊन मिळाले देखील. एकूणच सत्तेसाठी ही जी काही हाव दिसली ती लोकशाहीच्या दृष्टीने भूषणावह खचितच नाही. तामीळनाडूसारखे मोठे आणि महत्त्वाचे राज्य एका राजकीय अनिश्‍चिततेच्या गर्तेत गेले कित्येक दिवस गटांगळ्या खाते आहे. पलानीस्वामींच्या मुख्यमंत्रिपदी झालेल्या निवडीनेही ही अनिश्‍चितता संपत नाही. निवडणूक आयोगापासून न्यायालयापर्यंत आणि शेवटी जनतेच्या न्यायालयापर्यंत ही लढाई आता यापुढे खेळली जाणार आहे.