‘आज्ञापत्रा’तून दिसणारे शिवकालीन राजनीतीचे प्रतिबिंब

0
1016

– डॉ. सोमनाथ कोमरपंत

शिवाजीमहाराजांनी तेजोमय इतिहास घडविला. परंपरानिष्ठ राज्यव्यवहाराला कलाटणी देऊन कल्पकतेने त्यांनी अभिनव राज्यपद्धती प्रस्थापित केली. ते राजनीतिधुरंधर होते; तसेच प्रजाहितदक्ष होते. जनसामान्यांविषयीची कणव हा त्यांच्या राजनीतीचा मूलबंध होता. राजा कसा असावा आणि राज्य कसे असावे याचा मानदंड पहावा तो शिवाजीमहाराजांच्या राजनीतिनैपुण्यात. शिवजयंतीच्या निमित्ताने…

श्रीशिवछत्रपतींचे मोठेपण नव्याने सांगण्याची आज आवश्यकता नाही. कालप्रवाहात ते टिकून राहिलेले आहे. येणार्‍या पिढ्याही ते अधोरेखित करतील, याविषयी तिळमात्र शंका वाटत नाही. कधी इतिहास माणसे घडवितो, कधी माणसे इतिहास घडवितात. शिवाजीमहाराज ही अशी व्यक्ती होती की त्यांनी तेजोमय इतिहास घडविला. निसर्गनेमाने वाहणार्‍या कालप्रवाहाला त्यांनी गतिमान केले. परंपरानिष्ठ राज्यव्यवहाराला कलाटणी देऊन कल्पकतेने त्यांनी अभिनव राज्यपद्धती प्रस्थापित केली. ते राजनीतिधुरंधर होते; तसेच प्रजाहितदक्ष होते. जनसामान्यांविषयीची कणव हा त्यांच्या राजनीतीचा मूलबंध होता. त्यांच्या अभ्युदयाचा निरंतर ध्यास त्यांना होता. लोककल्याणकारी राज्याचा आदर्श त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत निर्माण केला. राजा कसा असावा आणि राज्य कसे असावे याचा मानदंड पहावा तो शिवाजीमहाराजांच्या राजनीतिनैपुण्यात. अशा असामान्य व्यक्ती इतिहासाच्या पटलावर पुनः पुन्हा जन्म घेत नाहीत. देश-काल-परिस्थितीनुरूप अशा व्यक्ती पृथ्वीतलावर जन्म घेत असतात. आपले अवतारकार्य करून अंतर्धान पावतात. जसे राम, कृष्ण होऊन गेले तसे सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात शिवाजीमहाराज जन्मास आले. त्यांचा जन्म लौकिक होता; पण कार्य अलौकिक होते. न कळणार्‍या कुमारवयात स्वराज्य स्थापनेची दीक्षा घेणे हे येरागबाळ्याचे काम नव्हते; त्यामागे निश्‍चितपणे नियतीचे अधिष्ठान होते. म्हणूनच ‘वर्षत सकळ मंगळी’ आणि ‘आम्ही वैकुंठवासी| आलो याचि कारणासी| बोलिले जे ऋषि| साच भावें वर्ताया’ या ज्ञानदेव-तुकाराम या दोन महापुरुषांच्या मूलमंत्रांचे बीजारोपण महाराष्ट्रभूमीत जाज्वल्य मनोवृत्तीने करणारा कृतिशील, द्रष्टा नेता म्हणून शिवाजीमहाराजांचा निरंतर गौरव होत राहील. संतांच्या या भूमीत नैतिकतेचे अधिष्ठान असलेले ‘आनंदवनभुवन’ ज्या महापुरुषाने निर्माण केले असा हा पुण्यशील राजा! त्याच्यासमोर सर्वांनी नतमस्तक व्हावे. त्याचे कर्तृत्व अतुलनीय. भूमीच्या अंतरंगातील हुंदके-उसासे कनवाळूपणाने ओळखणारा हा कुशल नेता, ज्याच्या नेतृत्वाचा आदर्श गतिमान काळातही राज्यकर्त्यांनी गिरवावा. लोककल्याणाची प्रेरणा घ्यावी.
कौस्तुभाचा कोणता पैलू मौल्यवान ठरवावा? प्रत्येक पैलूच्या तेजामुळे आणि समग्र गुणसमुच्चयामुळे कौस्तुभ हा कौस्तुभ ठरत असतो. शिवाजीमहाराजांच्या असामान्य कर्तृत्वासंबंधी एवढे सांगितले तरी पुरे. शिवाजीमहाराज तीनशे सत्याऐंशी वर्षांपूर्वी जन्मले. आज काळ झपाट्याने बदलत चाललेला आहे. माणसे बदलत चाललेली आहेत. त्यांची जीवनशैली बदलत चाललेली आहे. जगरहाटी किती बदलली तरी आदर्श नीतीचे मानदंड अभंग राहतात. शिवनीती अशीच अजोड राहिलेली आहे. कारण तिचे पाय मातीत रुतलेले होते; पण तिची स्वप्ने मात्र आकाशाशी भिडणारी होती. एवढा मोठा राज्यशकट कौशल्याने चालवूनही अहंकाराचा वारा या कर्त्या पुरुषाच्या अंगाला स्पर्श करू शकला नाही. सारी पुण्याई सात्त्विकांच्या ओंजळीत घालण्याचा निर्मोहीपणा आणि निःसंगपणा त्यांच्या अंतरंगात होता. ‘‘राजा म्हणजे पृथ्वीचा उपभोगशून्य स्वामी,’’ हे राम गणेश गडकरी यांच्या ‘राजसंन्यास’ नाटकातील महावाक्य म्हणजे शिवाजीमहाराजांच्या राजनीतीचा इत्यर्थ आहे आणि आजच्या राज्यकर्त्यांच्या वृत्तिप्रवृत्तींवर केलेले ते शरसंधान आहे. त्या प्रत्येकाने आपला चेहरा दर्पणात पाहावा, तो पारखून घ्यावा.
**********
हे अंतःसूत्र ध्यानात घेऊन शिवाजीमहाराजप्रणीत राजनीतीचा वेध ‘आज्ञापत्रा’द्वारे घ्यायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून १६७४ साली नवा शक सुरू केला.
प्रतिपच्चंद्रलेखेव| वर्धिष्णुर्विश्‍ववंदिता|
शाहसूनोः शिवस्यैषः मुद्राभद्राय राजते॥
हे त्यांच्या राज्याचे बोधवाक्य होते. तत्कालीनच नव्हे तर सार्वकालीन नेतृत्वाचा मानदंड म्हणून शिवाजीमहाराजांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन करता येण्यासारखे आहे. द्रष्टेपणाने त्यांनी अष्टप्रधानमंडळ नेमून राज्ययंत्रणा चोख ठेवली. प्रजेच्या सर्वांगीण विकासासाठी ते अहर्निश झटले. या राजाला रंकाची काळजी अधिक होती. इतिहासात यासंबंधीचे अनेक दाखले आहेत. त्यांनी ‘आज्ञापत्र’ आदेशिले. त्यानुसार राज्यकारभाराची आखणी केली. कोट- किल्ले- जंजिरे जिंकले. काही नव्याने उभारले. कान्होजी आंग्रे यांच्या कुशल धुरंधरत्वाखाली आरमार उभारले. संतमंडळीचा ते आधारस्तंभ ठरले. त्यांनी स्त्रियांची प्रतिष्ठा सांभाळली. ही राजाश्रियाविराजित आभा लाभल्यामुळे अवघा महाराष्ट्र प्रकाशमान झाला. त्याच्या संचिताचे धन असलेल्या मराठी भाषेची त्यांनी काळजी वाहिली. फारशी भाषेच्या अतिरिक्त वापरामुळे मराठी भाषेचे स्वरूप बदलून गेलेले होते. शिवाजीमहाराजांनी रघुनाथपंत नारायण हणमंते या राजकारणधुरंधर आणि विद्वान पंडिताकडून ‘राज्यव्यवहारकोश’ लिहवून घेतला. महाराजांना आणखी आयुष्य लाभले असते तर महाराष्ट्राचा भाग्योदय निश्‍चितपणे अधिक उजळला असता.
**********
राज्यांगांचा सम्यक विकास साधण्यासाठी शिवाजीमहाराज सतत प्रयत्नशील कसे राहिले याचा आलेख येथे ‘आज्ञापत्रा’द्वारे रेखाटायचा आहे. त्यांच्या प्रभावामुळे जी कर्तृत्ववान माणसे त्या काळात उदयास आली त्यांत रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांचा नामनिर्देश अग्रक्रमाने करायला हवा. गो. स. सरदेसाई, दत्तो वामन पोतदार, श्री. व्यं. पुणतांबेकर आणि का. ना. साने इत्यादी नामवंत इतिहाससंशोधकांनी रामचंद्रपंत अमात्यांचे ग्रंथकर्तृत्व मान्य केलेले आहे. या ग्रंथाचे कर्तृत्व रामचंद्रपंत अमात्यांकडे नसावे असे मतप्रतिपादन डॉ. वि. भि. कोलते आणि प्रा. श्री. ना. बनहट्टी या विद्वानांनी केलेले आहे.
‘आज्ञापत्रा’त शिवशाहीच्या राजनीतीचे सखोल विवरण अमात्यांनी केलेले आहे. शिवाजीमहाराज, संभाजी, दुसरा शिवाजी आणि दुसरा संभाजी यांची कारकीर्द रामचंद्रपंत अमात्य यांनी जवळून पाहिलेली होती. त्यामुळे त्यांच्या विवेचनाला अनुभवाचे तेज प्राप्त झालेले आहे.
‘आज्ञापत्रा’तून शिवाजीमहाराजांच्या चरित्राचे आकलन अमात्यांनी चांगल्या प्रकारे करून घेतले होते असे दृष्टोत्पत्तीस येते. त्यांची व्यापक जीवनदृष्टी आणि राजनीतीतील दूरदृष्टी यांवर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. त्यांची राजनीती, धर्माविषयीचे आचरण आणि नीती यांविषयीचे विवेचन रामचंद्रपंत अमात्यांनी केलेले आहे. त्यांनी राज्यकारभाराविषयी नुसती सैद्धान्तिक चर्चा न करता मराठी राज्याची उभारणी कोणत्या ध्येयधोरणांच्या पायावर करण्यात आलेली होती यासंबंधीचा ऊहापोह या ग्रंथात केलेला आहे. शककर्त्या युगपुरुषाचे मानसस्पंदन येथे पारदर्शी स्वरूपात प्रकट झालेले आहे. इतिहासाचे परिशीलन करणार्‍यांचे आणि वाङ्‌मयोपासकांचे लक्ष वेधून घेणारा हा ग्रंथ आहे. या ग्रंथात एकूण नऊ प्रकरणे आहेत. पहिल्या दोन प्रकरणांत शिवाजीमहाराजांनी स्वराज्यस्थापनेसाठी अविश्रांत श्रम कसे केले यासंबंधीचे विवेचन आहे. त्यांच्यानंतर संभाजी व राजाराम यांनी ते टिकविण्याचा प्रयत्न कसा केला यासंबंधीचा मागोवा घेण्यात आलेला आहे. तिसर्‍या प्रकरणापासून नवव्या प्रकरणापर्यंत प्रामुख्याने राजनीतिविषयक विवेचन करण्यात आलेले आहे. हा या ग्रंथाचा गाभा मानता येईल. त्यात राजाची कर्तव्ये, प्रधानसंयोजन, सावकारी किंवा व्यापार, वतनदारांचे दयादत्व आणि त्यांचे नियंत्रण, सामाजिक वृत्तीविषयीचे अनुकूलत्व, गडकोटांचा बंदोबस्त, आरमाराचे महत्त्व आणि त्याची व्यवस्था इत्यादी विषय आलेले आहेत.
औरंगजेबाची शक्ती शिवाजीमहाराजांनी अजमावली होती. त्याचे महत्त्व त्यांनी कमी लेखलेले नव्हते. ते उद्गारतात ः ‘‘परंतु औरंगजेब म्हणजे चौपन्न पादशाहीचा धणी. सैन्यादि देशकोशांविषयी अद्वितीय समृद्धिमान, किंबहुना या पृथ्वीतलाच्या ठायी ‘दिल्लीश्‍वरो वा जगदीश्‍वरो वा’ अशी ज्याची प्रख्याताख्या, अशा महान शत्रूशी संग्रामप्रसक्त जाहल्यावर त्याचा पराजय विनाश्रम स्वल्पायासे परम कठीण, तद्नुरूप परस्पर प्रसंगातिशयामुळे संपूर्ण राज्यातील प्रजा पीडा पावली.’’
यातून शिवाजीमहाराजांची वस्तुनिष्ठ मीमांसा करणारी आणि वास्तव ओळखणारी वृत्ती दिसून येते. त्यांनी नेमके कोणते कार्य केले याचा समुचित आलेख ‘आज्ञापत्रा’त आलेला आहे ः
‘‘सिंहासनारूढ होऊन छत्र धरून छत्रपति म्हणविले. धर्मोद्धार करून देवब्राह्मण संस्थानी स्थापून यजन याजनादि षट्‌कर्मे वर्णविभागे चालविली. तस्करादि अन्यायी यांचे नाव राज्यात नाहीसे केले. देशदुर्गांदि सैन्यादि बंद नवेच निर्माण करून एकरूप अव्याहत शासन चालविले. केवळ नूतन सृष्टि निर्माण केली. औरंगजेबासारखा महान शत्रू परितापसागरी निमग्र करून दिगंत विख्यात कीर्ती संपादिली ते राज्य.’’
चौथ्या प्रकरणाच्या प्रारंभी राजांची प्रजाहिताच्या दृष्टीने करायची कर्तव्ये विशद करताना म्हटलेले आहे ः ‘‘राज्यामध्ये हुजरात, गड, किल्ले, लश्कर, हशम यांचा नियम करणे, प्रजार्ति निवारण करणे, प्रजा संरक्षणे, धर्माधर्म विचारून पाहणे, यथाकाली दान देणे, सेवक लोकांची केली वतने पाठविणे, समयाचे समयीं प्रजेकडून करभार घेणे, संपादिले पदार्थांचा संग्रह करणे, नित्यनित्य राज्याचा आयव्यय पाहणे, स्थूल, सूक्ष्म, अतीत, अनागत कार्य सुचोन त्या कार्यानुरूप अगोदर त्याचा विवेक योजने, न्यायान्याय पाहून यथाशास्त्र शासनाचा निश्‍चय करून शासन करणे, परचक्रादि आले अरिष्टाचा परिहार योजणे, देशोदेशी वार्तिक प्रेरून वर्तमान आणविणे, समयविशेषे शत्रूशी संधिविग्रहउपेक्षा जें कर्तव्य त्याचा यथोचित विवेक करून तद्नुरूप प्रवर्तन करणे, आहे राज्य याचे संरक्षण करून नूतन संपादणे, अंतःपुरादि नाजूक नियम तो यथोचित संरक्षणे, संभावितांचे मान वाढवून क्षुद्रांस नियमावर ठेवणे, दैवते, दैवतैक्र निष्ठ सुब्राह्मण यांचे प्रसाद संपादणे व अधर्म प्रवृत्ति मोडून धर्माभिवृद्धि करून शाश्‍वत लोक अर्जिणे इत्यादि ही नृपकार्येच होत.’’
गड-कोटांचे महत्त्व ‘आज्ञापत्रा’त प्रतिपादन केलेले आहे. ‘‘गडकोट हेच राज्य, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार, गडकोट म्हणजे आपली वसतिस्थळे, किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राण संरक्षण.’’ अशा सूत्रमय वाक्यांत सूचकतेने मोठा आशय सांगितलेला आहे. प्रधानाचे महत्त्व पुढील शब्दांत प्रतिपादन केलेले आहे.
‘‘प्रधान म्हणजे नृपसत्ताप्रसारक, प्रधान म्हणजे प्रजापालन धर्मसंरक्षणाचे अध्यक्ष, प्रधान म्हणजे राजमदजनित अन्यायसागराची मर्यादा, प्रधान म्हणजे हस्तीचे अंकुश, किंबहुना प्रधान म्हणजे इहलोकी राज्यकृतसंपादनामुळे नृपाची विश्रांत, धर्मप्रतिपालनामुळे परलोकपंथीची दीपिका.’’
‘आज्ञापत्र’ हा ग्रंथ छोटेखानी आहे, पण त्यातील एकेका प्रकरणात राज्याच्या एक एक उपांगाविषयी केलेले अनुभवनिष्ठ मार्गदर्शन आहे. ‘‘साहुकार म्हणजे राज्याची व राज्यश्रीची शोभा’’, ‘‘एकाचे सुखानिमित्त बहुतांस श्रम द्यावे या कार्यामध्ये दुसरा श्राप द्यावाच नलगे, या कलियुगी दिवसेंदिवस पापाधिक्यच होणार?’’ आणि ‘‘महसूल न्यून होणे हीच राज्याची जीर्णता, तेच राज्यलक्ष्मीचा पराभव.’’ या मोजक्याच वाक्यांद्वारे शिवाजीमहाराजांचा द्रष्टेपणा आणि विचारांची मौलिकता दृष्टोत्पत्तीस येते.
‘आज्ञापत्रा’तील नववे प्रकरण अतिशय महत्त्वाचे आहे. आरमार कसे सज्ज ठेवावे, अधिकार्‍यांची गुणवत्ता कोणत्या प्रकारची असावी, त्यांनी शत्रूचा बंदोबस्त कसा करावा, आरमाराची छावणी कशी करावी यासंबंधी त्यात मार्गदर्शन केले गेलेले आहे. राजकर्त्याचा धोरणात्मक पवित्रा कोणता असावा याविषयी येथे विवेचन केले गेलेले आहे.
‘‘ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र याकरिता आरमार अवश्य करावे.’’ ‘‘गनीमाचे मुलुखाशिवाय विदेशींचे गैरकौली असे साहुकारांची तरांडी येता जाता असली, तरी ती परभारे जाऊ न द्यावी.’’ ‘‘सारे आरमार एकाच जागी न ठेवावे. जागा जागा छावणी ठेवावी.’’ ‘‘स्वराज्यातील आंबे फणस आदिकरून हेही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची, परंतु त्यास हात लावू नये. काय म्हणोन की, ही झाडे वर्षा दोन वर्षांनी होतात असे नाही, रयतांनी ही झाडे लावून लेकरांसारखी बहुत काळ जतन करून वाढविली. ती झाडे तोडील्यावर त्यांचे दुःखास पारावार काय… या वृक्षांच्या अभावे हानिही होते.’’ या अवतरणांमधून शिवकालीन राजनीतीवर प्रकाश पडतो. शिवाजीमहाराज पर्यावरणाच्या संरक्षणाच्या बाबतीत किती दक्ष होते हे दिसून येते. राज्याच्या अभिवृद्धीसाठी राज्यकर्त्याच्या बुद्धिमत्तेचा, कल्पकतेचा आणि दूरदृष्टीचा सर्वांगस्पर्श आवश्यक असतो. शिवाजीमहाराजांकडे तो होता. त्यांचे अंतरंगदर्शन घडविणारा ‘आज्ञापत्र’ हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे.
मराठी भाषेच्या शैलीविशेषाच्या संदर्भातदेखील हा ग्रंथ लक्षणीय वाटतो. अल्पाक्षररमणीयत्व हा त्याचा मोठा गुण आहे. ‘‘केवळ नूतन सृष्टी निर्माण केली’’ आणि ‘‘ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र…’’ या वाक्यांतून आशयसंपन्नता जाणवते. शिवकालीन भाषेचा उत्तम नमुना म्हणूनही ‘आज्ञापत्र’कडे अंगुलीनिर्देश करता येईल.