कवी-शाहिरांचे स्फूर्तिस्थान छत्रपती शिवाजीमहाराज

0
181

– वरद सु. सबनीस (सहाय्यक पुरातत्त्व अधीक्षक, पणजी)

‘अखंड हिंदवी स्वराज्य’ या संकल्पनेतून कल्याणकारी राज्याची स्थापना करणार्‍या छत्रपती शिवाजीमहाराजांचे कर्तृत्व थोर आहे. जनकल्याण, साहस, युद्धनीती, शिक्षण, राज्यशास्त्र, स्व-धर्म, स्वभाषा, शेती, नाविक शक्ती, व्यापारतंत्र यांसारख्या नानाविध अंगांनी शिवचरित्र नटलेले आहे. शिवचरित्रातील काही अनोळखी गोष्टी वाचकांच्या नजरेस आणण्याचा हा प्रयत्न…

‘अखंड हिंदवी स्वराज्य’ या संकल्पनेतून कल्याणकारी राज्याची स्थापना करणार्‍या छत्रपती शिवाजीमहाराजांचे कर्तृत्व थोर आहे. छत्रपतींच्या कर्तृत्वाची व्याप्तीदेखील विशाल आहे. शाहिस्तेखानची बोटे व अफजलखानचा कोथळा इथे शिवकाळ सीमित नाही, तर जनकल्याण, साहस, युद्धनीती, शिक्षण, राज्यशास्त्र, स्व-धर्म, स्वभाषा, शेती, नाविक शक्ती, व्यापारतंत्र यांसारख्या नानाविध अंगांनी शिवचरित्र नटलेले आहे.
प्रभू रामचंद्राच्या निष्कलंकित व संपूर्ण व्यक्तिमत्त्वाबद्दल हिंदी साहित्यातील एक सुप्रसिद्ध कवी मैथीलीशरण गुप्त म्हणतात की,
राम, तुम्हारा चरित स्वयं ही काव्य है|
कोई कवि बन जाए, सहज संभाव्य है॥
असेच काहीसे छत्रपतींच्या बाबतीत आहे. जसा अभ्यासक तसे शिवचरित्र नजरेस पडते. वेगवेगळ्या विचारधारेच्या लोकांना शिवचरित्र आपलेसे वाटावे यात अजिबात नवल नाही.
छत्रपती शिवराय, त्यांचे चरित्र, त्यांचे पराक्रम यांवर बरेच संशोधन झाले आहे. अभ्यासासाठी अजूनही प्रचंड वाव आहे. छत्रपती शिवाजी समजला, शिवकाल समजला असे छातीठोकपणे सांगण्याचे धाडस आजमितीला कोणी करू शकेल अशी स्थिती नाही.
शिवकाळाची आठवण करून देणारे अनेक गड-किल्ले, तोफा-तलवारी, कागदपत्रे, वास्तू वा इतर वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. देश-विदेशांतील संग्रहालये शिवस्मृती जपत आहेत व अभिमानाने मिरवत आहेत.
प्रस्तुत लेखप्रपंच हा शिवचरित्रातील काही अनोळखी गोष्टी वाचकांच्या नजरेस आणण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. गोव्यासारख्या छोट्याशा प्रदेशात शिवराय जनमानसांत आदरस्थानी विराजमान आहेत. त्यांच्या अल्पशा सहवासाने का होईना, परंतु गोमंतकीय भूमी पावन झालेली आहे. गोमंतकीय समाजाचा हिंदू गाभा अविरत प्रज्वलित ठेवण्यामागे शिवरायांची महत्त्वाची भूमिका आहे.
‘शिवाजी’ या केवळ नावानेच मुघल व आदिलशाही दरबारात धास्ती निर्माण केली होती. एवढेच नव्हे तर इराणचा बादशाह असो वा युरोपमधील तत्कालीन वृत्तपत्रे; छत्रपतींची कीर्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत होती.
शाहीर व कवी यांच्या काव्यप्रतिभेला जणू स्फूरणच चढत होते. हिंदू समाज, हिंदवी स्वराज्य यासाठी झटणारे सर्व घटक एकत्र आणण्यासाठी कवी-शाहिरांनी आपली निष्ठा, प्रतिभा पणास लावून पोषक वातावरण निर्माण केले होते.
हा काळ असा होता की, गावागावांतून शाहीर तयार होऊ लागले. त्यातून शिवकीर्ती सर्वदूर पसरली. अज्ञानदासाचे पोवाडे प्रसिद्ध आहेतच. छत्रपतींनी स्वतः अशा शाहिरांना, कवींना व इतर प्रतिभावंतांना राजाश्रय दिल्याचे अनेक पुरावे इतिहासात उपलब्ध आहेत.
उत्तर हिंदुस्थानातून शिवरायांना भेटून शिवकार्यात समर्पित होण्यासाठी आलेला कविभूषण तर आपल्या नावास साजेल असाच होता. कविराज भूषण यांनी रचलेले अनेक छंद हे वाखाणण्याजोगे आहेत.
साजे चतुरंग बीर
रंग में तुरंग चढी
सरजा सिबाजी जंग
जितने चलत है॥
चतुरंग वीराप्रमाणे शोभणारा छत्रपती शिवाजी युद्ध जिंकण्यास सज्ज झाल्याचे छान वर्णन कविभूषणांनी केले आहे.
तेज तम अंस पर
कन्ह जिमी कंस पर
त्यो म्लेच्छ बंस पर
शेर शिवराज है
वरील ओळींमधून शिवरायांच्या असामान्य कर्तृत्वाची तुलना अंधारावर मात करणार्‍या तेजाशी व कंसाचा संहार करणार्‍या कृष्णाशी केली आहे.
शिवाजीमहाराजांनी अनेक पराक्रम केले. त्यांच्या पराक्रमांवर आधारित वर्णने तत्कालीन मराठी, कन्नड, उर्दू, संस्कृत, इंग्रजी, फ्रेंच, डच, इटालियन, पोर्तुगीज, अरबी, फारसी भाषांत आढळतात. याहून वेगळी आंतरराष्ट्रीय ख्याती काय असावी?
‘तारीख-ए-इस्कंदरी’ हे बिजापूरच्या दरबारी कवीने लिहिलेले दख्खनी भाषेतील काव्य असो वा ‘पर्णाल पर्वतग्रहणाख्यान’ हे तत्कालीन संस्कृत काव्य असो; छत्रपतींचा व त्यांच्या असामान्य कार्याचा उल्लेख समकालीन साहित्यात हमखास आढळतोच!
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पराक्रमी व लोककल्याणकारी आयुष्याचे सर्वात समर्पक वर्णन जर कोणी केले असेल तर ते समर्थ रामदासस्वामींनी!
निश्‍चयाचा महामेरू| बहुत जनांसी आधारू|
अखंड स्थितीचा निर्धारू| श्रीमंत योगी॥
परोपकाराचिया राशी| उदंड घडती जयासी|
तयाचे गुण महत्त्वासी| तुळणा कैंची॥
नरपति, हयपति, गजपति| गडपति, भूपति, जळपति|
पुरंदर आणि छत्रपति| शक्ति पृष्ठभागी॥
यशवंत, कीर्तिवंत| सामर्थ्यवंत वरदवंत|
पुण्यवंत, नीतिवंत| जाणता राजा॥
समर्थांनी वरील उक्तींमधून शिवरायांचे शब्दरूपी चित्र रेखाटले आहे. ‘जाणता राजा’, ‘श्रीमंत योगी’ यांसारखी समर्पक बिरुदावली शिवरायांच्या कर्तबगारीची व साधेपणाची झलक दर्शवतात.
१८७१ साली प्रसिद्ध झालेल्या ‘राजा शिवाजी’ या म. मो. कुंटे यांच्या काव्यरूपी शिवचरित्रामध्ये सहा भागांमधून कवीने सोप्या व रसाळ भाषेत अनेक घटनांचे वर्णन केले आहे. सावंतवाडकर भोसले यांनी मुधोळच्या घोरपडेंशी युती करून छत्रपतींविरुद्ध मोहीम चालवली होती. या घटनेच्या विविध प्रसंगांचे वर्णन ‘राजा शिवाजी’ या काव्यात खालीलप्रमाणे आले आहे-
सावंत रे! घोरपडे निघाले
भावाभावातच युद्ध चाले
सारे मराठे ममता करावी
तर्वार त्यांच्यावरी का धरावी?
खरी गोष्ट आहे, खरी रीति आहे
तरी सिद्ध झाले लढायास का हे?
मुसलमान लोकास सहाय्य देती
मराठी बुडावी असे सिद्ध होती
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या मनातील गोंधळाचे शब्दरूपी वर्णन कवीने केले आहे.
पुढे शिवाजीमहाराजांनी मुधोळची मोहीम आखली व मुधोळकरांचा पाडाव झाला व सावंतवाडकरांचे धाबे दणाणले. या प्रसंगी सावंतवाडकरांनी गोव्यातील पोर्तुगिजांकडे आश्रय मागितला.
ती शुन्य वाडी, यजमान नाही
तो देश घेता, श्रमते न काही
छत्रपतींच्या पराक्रमाची जाणीव पोर्तुगिजांना असल्यामुळे पोर्तुगिजांनी सावंतवाडकरांना शरण नाकारली व सावंतवाडकर छत्रपतींना शरण आले. छत्रपतींनी मात्र सर्वांचे हित कशात आहे हे सांगून सावंतवाडकरांना आपल्या बाजूने वळवले.
तुला रे कळे तो मुसलमान कोण
तुझे आमचे शत्रु हे नीट जाण
अशा प्रकारे शिवचरित्राच्या माध्यमातून कुंटे यांनी छत्रपतींच्या मुत्सद्दी धोरणांचेदेखील यथार्थ चित्रण केलेले आहे.
१८७३ साली प्रकाशित झालेले गणेशशास्त्री लेले यांचे ‘शिवाजी चरित्र’ हे महाभारताच्या चौकटीत लिहिलेले आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांचे आजोबा मालोजी यांच्यापासून या चरित्राची सुरुवात होते व १६७४ च्या छत्रपतींच्या राज्याभिषेकापर्यंतच्या प्रमुख घटनांचा आढावा या चरित्रात घेतला आहे.
छत्रपतींच्या पराक्रमी, संपूर्ण व निष्कलंकी व्यक्तिमत्त्वाचे चपखल असे शब्दरूपी चित्रण या काव्यात खालीलप्रमाणे आले आहे-
शिवाजी हा आहे विदित सकलाते क्षितिवरी
मराठ्यांचे राज्य प्रथम नृप जो स्थापित करी॥
ज्याची सत्कीर्ती मज गमली पुर्णेंन्दु दुसरा
कलंकाचा ज्याच्यावरी न गवसे लेशही खरा॥
पौराणिक महाकाव्याच्या परंपरेवर आधारित या काव्याचे वर्णन अनेकांनी ‘आधुनिक मराठीतील पहिले ऐतिहासिक महाकाव्य’ असेही केलेले आहे.
१८९१ साली प्रकाशित झालेले ‘श्री शिव विजय’ हे ओवीबद्ध शिवचरित्र अं. रा. हर्डीकर यांनी लिहिले. ३१ अध्याय व ३७०९ ओव्यांमध्ये शिवचरित्र गुंफलेले आहे. या काव्याची पद्धत व चौकटदेखील पौराणिक महाकाव्य परंपरेशी साधर्म्य जोडणारी आहे.
शिवरायांच्या जन्मापूर्वीच्या अंधकारमय परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर शिवजन्म ही ईश्‍वरी कृपा होती व तसे होणे क्रमप्राप्त होते अशा स्वरूपाचे वर्णन कवीने केले आहे.
आता होईल शिवावतार, भंग पावतील यवनवीर|
सद्धर्म प्रकाश पृथ्वीवर, उजळणार पुनरपि॥
जेव्हा विजापूरच्या आदिलशहाने शहाजीराजेंना कैद केली, त्याप्रसंगीदेखील छत्रपतींनी माघार न घेता कठीण प्रसंगाला सामोरे जाणे पसंत केले. अशा घटना घडताना महाराजांची मनःस्थिती कशी असेल याचे शब्दांकन कवीने खालील शब्दांत केले आहे.
क्रोधाविष्ट झाले मन| न साहे पित्याचा अपमान|
विजापुरी जाऊन| ‘लंका’ करावी दहन॥
या ‘श्री शिवविजय’ काव्याची दुसरी आवृत्ती १९०९ साली प्रकाशित झाली, यावरून त्याची लोकप्रियता लक्षात येते. यात हर्डीकरांनी शिवाजीमहाराजांवर एक आरतीदेखील लिहिलेली आहे-
जयदेव जयदेव जय शिवराया|
अवतार धरिला त्यां धर्म स्थापाया|
जयदेव जयदेव… ॥
या आरतीमध्ये छत्रपतींबद्दल अतीव भक्ती व आदरभाव समाविष्ट आहे.
अनेक समकालीन कवी-शाहिरांनी शिवकार्याच्या स्मृती अजरामर करून ठेवल्या आहेत. १७ व्या, १८ व्या, १९ व्या शतकांमध्ये निर्मिलेल्या काव्यकृती अनेक आहेत. त्यांत शिवरायांच्या कार्याचा उल्लेख असलेल्याही अनेक काव्यकृती आहेत. त्या नानाविध भाषा व प्रांतांमध्ये घडविलेल्या आहेत. यातून एक गोष्ट प्रखरतेने स्पष्ट होते की छत्रपतींनी काव्यजगताला एक नवी स्फूर्ती दिली.