आयकर कायदा कलम ८०-सी शिवाय अन्य कर-सवलती

0
476

– शशांक मो. गुळगुळे

१ एप्रिलपासून सुरू होणार्‍या नव्या वर्षासाठी काही सवलतींत बदल करण्यात आलेले आहेत. या सवलती २०१६-२०१७ या आर्थिक वर्षासाठी व २०१७-२०१८ या ‘ऍसेसमेंट’ वर्षासाठी लागू आहेत. प्रत्येक भारतीयाने जेवढ्या सवलती आहेत त्यांचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा.

३१ मार्च रोजी आर्थिक वर्ष संपेल. १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ पर्यंतच्या उत्पन्नावर उत्पन्नाप्रमाणे आयकर भरावा लागेल. काहींना उत्पन्न, सवलती वगैरेंमुळे कर भरावाही लागणार नाही. प्रत्येक भारतीयाने जेवढ्या सवलती आहेत त्यांचा जास्तीत जास्त फायदा घेऊन कमीत कमी आयकर भरावा.
आयकर कायद्याच्या कलम ८०-सीबाबत सर्वांना माहिती आहे. या कलमानुसार दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर-सवलत मिळते. भविष्य निर्वाह निधी, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, जीवन विम्याचे प्रिमियम, पोस्टाच्या काही योजना, गृह कर्जाचा मुख्य हप्ता, पाच वर्षे मुदतीच्या बँक ठेवी इत्यादीत केलेल्या दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर कायदा कलम ८०-सीअन्वये कर-सवलत मिळते. पण याशिवाय बरीच अन्य कलमे आहेत, त्या कलमांनुसारही आयकर सवलत मिळते. ८०-सी, ८०-सीसीसी व ८०-सीजीडी या कलमांन्वये केलेल्या गुंतवणुकीवर सर्व मिळून किंवा एकूण दीड लाख रुपयांपर्यंतची कर-सवलत मिळू शकते. मात्र नॅशनल पेन्शन सिस्टिम किंवा पहिलं घर विकत घेणारे यांच्यासाठी जास्त कर-सवलत आहे. नॅशनल पेन्शन सिस्टिममध्ये गुंतवणूक करणार्‍यांना दीड लाखांहून, ५० हजार रुपये अतिरिक्त म्हणजे कर-सवलत मिळते. अशांची कर-सवलतीची मर्यादा २ लाख रुपये होऊ शकते.
सूट ः जर तुम्ही भारतीय नागरिक असाल व तुमचे उत्पन्न ५ लाख रुपयांपर्यंत असेल तर आयकर कायद्याच्या कलम ८७-ए नुसार पाच हजार रुपयांची कर सूट मिळते. येत्या आर्थिक वर्षासाठी या सुटीची मर्यादा अडीज हजार रुपये करण्याची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
संपत्तीसंबंधी कर ः स्थानिक स्वराज्य संस्थांनी तुमच्याकडून कर वसूल केला असेल तर कलम २३ (आय) नुसार ‘इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी’खाली कर-सवलत मिळू शकते. संपत्ती हस्तांतरित करताना स्टॅम्प ड्युटी किंवा रजिस्ट्रेशन चार्जेस भरलेले असतील तर रक्कमही कलम ८०-सी अन्वये कर-सवलतीस पात्र आहे.
आरोग्यासंबंधी खर्च ः आरोग्य विमा किंवा मेडिक्लेमसाठी २५ हजार रुपयांपर्यंतची प्रिमियमची स्वतःसाठी भरलेली रक्कम कर-सवलतीस पात्र आहे, तर वरिष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा तीस हजार रुपये आहे. आयकर कायद्याच्या कलम ८०-डी अन्वये स्वतःसाठी किंवा अवलंबून असलेल्यांसाठी प्रिव्हेन्टीव्ह चेक-अपसाठी केलेला पाच हजार रुपयांपर्यंतचा खर्च कर-सवलतीस पात्र आहे. ही पाच हजार रुपयांची कर-सवलत घेतली तर आरोग्य विम्याच्या प्रिमियमवर स्वतःसाठी २० हजार रुपयांची व वरिष्ठ नागरिकांसाठी २५ हजार रुपयांची कर-सवलत मिळणार. ८० वर्षांवरील व्यक्ती स्वतःच्या उत्पन्नातून वैद्यकीय खर्च करीत असेल तर अशा व्यक्तीना आयकर कायद्याच्या कलम ८०-डी नुसार ३० हजार रुपयांपर्यंतच्या खर्चावर कर-सवलत मिळू शकते.
५० हजार रुपयांची अतिरिक्यत सवलत ः कलम ८०-सीसीडी (आयबी) नुसार नॅशनल पेन्शन सिस्टिममध्ये केलेली ५० हजार रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर दीड लाख रुपयांहून अतिरिक्त कर-सवलत उपलब्ध आहे.
राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग्ज योजना ः २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात या गुंतवणुकीवरील कर-सवलत काढून टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे. पण ३१ मार्चपर्यंत हिचे अस्तित्व आहे. जर तुमचे उत्पन्न १२ लाख रुपयांहून कमी असेल व तुम्ही अगोदर शेअर बाजारात गुंतवणूक केलेली नसेल तर आयकर खात्याने ठरवून दिलेल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये तुम्ही गुंतवणूक केलीत किंवा त्या कंपन्यांचे शेअर विकत घेतले तर यात केलेल्या गुंतवणुकीच्या ५० टक्के रक्कम कर-सवलतीस पात्र असून या कर-सवलतीची कमाल रक्कम २५ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. ही सवलत आयकर कायद्याच्या कलम ८०-सीसीजी अन्वये मिळते.
इंडेक्सेशन ः जर तुम्ही १ लाख रुपयांना संपत्ती विकत घेतलीत व काही वर्षांनी १ कोटी रुपयांना विकली तर ९९ लाख रुपये हा तुमचा फायदा. का? जर तुम्ही पाच वर्षांनी विकलीत तर तो तुमचा दीर्घ मुदतीचा फायदा ठरतो. पण तुम्ही प्रॉपर्टी धारण केलेल्या काळात चलनवाढ किती झाली त्याच्याशी तुम्हाला झालेल्या नफ्याची सांगड घालून कमी आयकर भरावा लागतो.
दिव्यांग ः काही प्रमाणात दिव्यांग असणार्‍यांना ७५ हजार रुपये व पूर्ण दिव्यांग असणार्‍यांना १ लाख २५ हजार रुपये भारतीय नागरिक व हिंदू अविभक्त कुटुंबांना कर-सवलत आहे. वैद्यकीय उपचार, पूनर्वसन इत्यादीसाठीच्या खर्चावर कर-सवलत आहे. एखादं मूल किंवा व्यक्ती दिव्यांग आहे किंवा मतिमंद आहे अशांवर केलेल्या खर्चावर कलम- ८० डीडीअन्वये कर-सवलत असून, दिव्यांग व्यक्तीला स्वतःसाठी कर-सवलत हवी असल्यास त्याला ती कलम ८०-यूअन्वये मिळू शकते. पण त्याला आयकर खात्याने ठरविलेल्या यंत्रणेकडून दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र आणावे लागते व त्या प्रमाणपत्रात दिव्यांग चाळीस टक्क्यांहून अधिक असल्याचे डॉक्टरनी नमूद केलेले असणे आवश्यक असते.
विशिष्ट प्रकारचे आजार ः भारतीय नागरिक व अविभक्त हिंदू कुटुंब यांना विशिष्ट प्रकारच्या आजारांसाठी केलेल्या खर्चावर आयकरात सवलत मिळते. कर्करोग, हृदयावरील शस्त्रक्रिया, गंभीर अपघात, निकामी मूत्रपिंडे, मेंदूत गाठ वगैरे प्रकारच्या गंभीर आजारांच्या उपचारावर केलेल्या खर्चाला आयकर कायदा कलम- ८० डीडीबीनुसार ४० हजार रुपयांपर्यंतची व वरिष्ठ नागरिकांना ६० हजार रुपयांपर्यंतची कर-सवलत मिळते.
लेखक व शोधकार्य करणारे ः लेखकाला रॉयल्टीतून किंवा रजिस्टर्ड पेटन्टमधून मिळणार्‍या उत्पन्नावर ३ लाख रुपयांची अतिरिक्त कर-सवलत आहे. लेखक आयकर कायद्याच्या कलम- ८० क्यूक्यूबीनुसार तर पेटन्टधारक कलम ८०- आरआरबीनुसार कर-सवलतीस पात्र आहेत.

चौकट

भारतीय नागरिकांचा उतारवयातील काळ सुखात जावा यासाठी त्यांनी दीर्घ मुदतीची गुंतवणूक करावी यासाठी आयकर कायद्यात बर्‍याच कर-सवलती देण्यात आल्या आहेत. सध्याच्या सरकारची अटल पेन्शन योजना वृद्धापकाळात हात देण्यासाठी चांगली आहे.
आयकरात कर-सवलत मिळण्यासाठी केलेल्या गुंतवणुकींवर मिळणारा वार्षिक परतावा- कर्मचारी भविष्य निधी ८.८० टक्के, सार्वजनिक भविष्य निधी ८.१० टक्के, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे ८.५० टक्के, पेन्शन योजना ६-८ टक्के, जीवन विमा योजना ८-१० टक्के, पाच वर्ष कर बचत मुदतठेव ७-८ टक्के, अक्विटी संलग्न बचत योजना १२-१५ टक्के, नॅशनल पेन्शन योजना ११-१२ टक्के व राजीव गांधी इक्विटी बचत योजना १०-१५ टक्के.
पगारदारांनी सादर करावयाचे पुरावे ः
१) घरभाडे ः घरमालकाला दिलेली घरभाड्याची रक्कम, त्याचा पुरावा म्हणून घरभाडे दिलेल्या पावत्या, जर घरभाडे ५ हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर रेव्हेन्यू स्टॅम्प असला पाहिजे. घरमालकाचे नाव, पत्ता यासाठी पुरावा, घरभाडे करारनाम्याची प्रत, जर वर्षाचे घरभाडे १ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर घरमालकाचा पॅन देणे बंधनकारक आहे. २) रजा प्रवास सूट ः केलेल्या खर्चाच्या पावत्या. ३) गृहकर्जावरील व्याज ः देय व्याज किंवा दिलेले व्याज, गृहकर्ज देणार्‍याचे नाव व पत्ता तसेच पॅन याचा पुरावा म्हणून गृहकर्जाच्या व्याजाचे प्रमाणपत्र सादर करावे. ४) कलम ८०-सी, ८०-सीसीसी व ८०-सीसीडी यानुसार केलेल्या गुंतवणुका ः कलम ८०-सीनुसार केलेल्या गुंतवणुकीचे पुरावे, जीवन विमा हप्ता भरल्याच्या पावत्या, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्याचे पासबूक किंवा पैसे भरलेली पेईंग-इन-स्लीपची प्रत, फक्त दोन अपत्यांच्या शाळेत भरलेल्या ‘फी’च्या पावत्या. ५) कलम ८० डीनुसार मेडिक्लेमचा प्रिमियम भरल्याची पावती. आरोग्य तपासणी केली असल्यास त्याच्या पावत्या. प्रिमियमची रक्कम रोख भरल्यास विमा सवलत मिळत नाही. चेकने भरल्यासच कर-सवलत मिळते. तपासणी खर्चाची रक्कम रोख दिली असल्यास चालते. ६) कलम ८० डीडी किंवा ८० यू ः पगारदारावर अवलंबून असलेल्या अपंग व्यक्तीच्या देखभालीसाठी किंवा वैद्यकीय खर्चासाठी लागलेल्या रकमेवर कलम-८० डीडी व स्वतः कर्मचार्‍यासाठी कलम-८० यू वजावटीसाठी फॉर्म १० आयएममध्ये विहित वैद्यकीय अधिकार्‍याचे प्रमाणपत्र सादर करावे. या कलमांतर्गत ७५ हजार रुपयांची व ८० टक्क्यांहून जास्त अपंगत्वासाठी सव्वालाख रुपयांची वजावट मिळते. ७) शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाची वजावट घेण्यासाठी बँक किंवा आर्थिक संस्थेचे प्रमाणपत्र सादर करावे. या कलमांतर्गत मिळणार्‍या वजावटीवर मर्यादा नाही.
करदात्यांनी या कर-सवलतींच्या कलमांची सर्व माहिती करून घेऊन यापैकी ज्या-ज्या सवलती मिळू शकतील त्या घेऊन आपला फायदा करून घ्यावा. १ एप्रिलपासून सुरू होणार्‍या नव्या वर्षात वर उल्लेखिलेल्या काही सवलतींत बदल करण्यात आलेले आहेत. या सवलती २०१६-२०१७ या आर्थिक वर्षासाठी व २०१७-२०१८ या ‘ऍसेसमेंट’ वर्षासाठी लागू आहेत हे लक्षात घ्यावे.