कणखर व्हाच!

0
121

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सामना करणार्‍या जवानांवर दगडफेक करून त्यांच्या कारवाईत अडथळा आणणार्‍या स्थानिक युवकांना भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी खणखणीत इशारा दिला आहे. कारवाईत अडथळा आणणारे दहशतवाद्यांचे साथीदार मानले जातील आणि त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असा हा सुस्पष्ट इशारा आहे. काश्मिरी राजकारण्यांनी लष्करप्रमुखांच्या या इशार्‍यामुळे तेथील युवकांमध्ये फुटिरतेची बीजे अधिक रुजतील असे अकांडतांडव चालवले असले तरी लष्कराच्या सहनशीलतेलाही काही सीमा आहेत. दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करायला लष्कराचे जवान गेले की त्यांच्यावर स्थानिक जमावाने दगडफेक करायची, लाठ्या – काठ्यांनी हल्ला चढवायचा आणि स्थानिक जमावाचा ढालीसारखा उपयोग करून दहशतवाद्यांनी लष्करी जवानांवर हातबॉम्ब फेकायचे, एके ४७ चालवायच्या, असे सत्र काश्मीरमध्ये सतत सुरू आहे. नुकतेच हंडवाडा, बंदिपूर आणि कुलगाम मध्ये तीन ठिकाणी अशा घटनांत एका मेजरसह लष्कराचे सहा जवान हकनाक मारले गेले. त्या पार्श्वभूमीवर शहीदांना श्रद्धांजली वाहताना जनरल रावत यांच्या तोंडून हा इशारा आला. ‘‘ते आज वाचतील, पण उद्या पकडले जातील’’ असेही रावत यांनी दहशतवाद्यांना साथ देणार्‍या काश्मिरी युवकांना बजावले आहे. एखाद्या ठिकाणी दहशतवादी दडून बसले आहेत असा सुगावा लागला की लष्कर तेथे धाव घेते. स्थानिक जमावावर नियंत्रण ठेवायची जबाबदारी केंद्रीय राखीव पोलीस दल व स्थानिक जम्मू काश्मीर पोलिसांची असते. लष्कर धडक कारवाई करते आणि तेथून निघून जाते. परंतु या कारवाईमध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी जमाव जमवणे आणि त्याचा फायदा दहशतवाद्यांना मिळवून देणे हे अलीकडे सर्रास सुरू आहे. नुकताच अशाच एका मोहिमेत मेजर सतीश दहिया यांचा बळी गेला. आपल्या एकुलत्या एक कर्तबगार मुलाच्या मृत्यूचा घाव त्याच्या वडिलांना सोसावा लागला. ज्या दिवशी त्यांच्या मृत्यूची वार्ता घरी पोहोचली तो त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस होता. घरी पत्नी आणि दोन वर्षांची मुलगी. मृत्यूची वार्ता घरी आली आणि पाठोपाठ काही तासांनी घरी येऊन पोहोचली ती मेजर सतीशनी आपल्या पत्नीला पाठवलेली केक, मेणबत्त्या आणि शुभेच्छापत्राची भेट! त्या वीरपत्नीला काय वाटले असेल! त्या शोकाकुल पत्नीने काय म्हणावे? ‘‘मेरी दो सालकी बेटीने अपना पिता दे दिया है देशको? बस, इसके सिवा और नही दै देनेको|’’ हा कुठल्या चित्रपटातला संवाद नाही. ही आपल्या एका शहीदाच्या घरी व्यक्त झालेली भावना आहे. असे किती वीर जवान आपण हकनाक बळी देणार आहोत? लष्कराने दहशतवादविरोधी कारवाई करताना किती बचावात्मक राहायचे याचा पुनर्विचार करण्याची वेळ निश्‍चित आलेली आहे. या बचावात्मकतेचा गैरफायदा दहशतवादी पद्धतशीरपणे घेत आहेत. काश्मीरमधील दहशतवादविरोधी कारवायांमध्ये स्थानिक जमावाला ढाल म्हणून पुढे करणार्‍या स्थानिक म्होरक्यांना जोवर जरब बसत नाही, तोवर हे असले भ्याड हल्ले होत राहतील. काश्मिरी युवकांना अधिकाधिक कडवे बनवण्याचे मोठे षड्‌यंत्र सुरू आहे. फायदा दहशतवादी घेतात. बुरहान वानी प्रकरणात ते दिसून आलेच. या परिस्थितीत काश्मिरी युवकांना राष्ट्रीय प्रवाहात सामील करण्याच्या प्रयत्नांना वेग देतानाच, दुसरीकडे त्यांच्या मनात विष कालवणार्‍या फुटिरतावाद्यांनाही धडा शिकवणेही तितकेच गरजेचे आहे. संरक्षणमंत्री म्हणाले तसा ‘रस्त्यावरील प्रत्येक काश्मिरी हा दहशतवादी नव्हे’, परंतु त्यांना दहशतवादाकडे नेऊ पाहणारे जे सूत्रधार आहेत, त्यांना वेचून आणि ठेचून काढण्याची वेळ मात्र आलेली आहे.