गोवा ते मुंबई सायकलयात्रा…. एकटीने!

0
271

यती अनिल लाड

 

 आव्हानांना धैर्यानं सामोरं जाण्याची जिद्द बाळगणारी एक धडपडी मुलगी गोवा – मुंबई प्रवास सायकलवरून एकटीने करायचं ठरवते आणि सगळ्या प्रतिकूलतांवर मात करीत गेटवे ऑफ इंडिया गाठते! गोव्याची युवा पत्रकार यती लाड हिचा हा धाडसी प्रवास अशा साहसांचे वेध लागलेल्या सर्वांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल!

जोखीम पत्करून ध्येय साध्य करणं एक आव्हान असतं आणि आव्हान स्वीकारल्यानंतर यशस्वी होण्यासाठी गरज असते जिद्द, चिकाटी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संयम! या तीन गोष्टी कोणतेही आव्हान स्वीकारल्यानंतर यशस्वी होण्यासाठी महत्वाच्या असतात हे सर्वांनाच माहित आहे. एखादे आव्हान स्वीकारल्यानंतर हे गुण का महत्वाचे आहेत याचीही जाणीव होते. असेच एक आव्हान स्वीकारून मी गोवा – मुंबई हा ५१८ किलोमीटरचा सागरी महामार्ग सायकलवरून एकटीने पार करू शकले!
गोव्याहून मुंबईला जाणं हे अनेकांसाठी नित्याचं असेल आणि मुक्कामाच्या ठिकाणी लवकरात लवकर पोचावं यासाठी प्रवासाचे अनेक पर्यायही आपल्याकडे आहेत. त्यामुळे मी जेव्हा गोवा – मुंबई हा प्रवास सायकलने करायचं ठरवलं, तेव्हा अनेकांना ही संकल्पना विचित्र वाटली.
बस, ट्रेनचे पर्याय असताना सायकलने का, असे प्रश्न सर्वांत जास्त माझ्या आईने मला विचारले. ‘‘हवं असल्यास तू विमानाने जा, मी तुला पैसे देते’’ असा सल्लावजा आदेशही तिने मला दिला, कारण मी सायकलने जाणार या पेक्षा जास्त भीती तिला मी एकटी जाणार याची होती. ही एकटीने सायकल प्रवासाची कल्पना त्या सर्वांसाठी नवी होती आणि माझ्यासाठी फक्त अनुभव नवा होता. मी ठरवलं होतं की मला जायचं आहे आणि ते सुद्धा एकटं! त्यासाठीचा सराव आणि अभ्यास मी गेल्या ४ महिन्यांपासून सुरू केला होता. मुळात तो सराव गोवा – मुंबईसाठी नसून मनाली ते लेह लडाख साठी मी करीत होते. पण तिथलं वातावरण आणि रस्ते हे अधिक खडतर असल्यानं मी सुरवातीलाच हा प्रवास करणं टाळलं.
माझं शरीर सायकलिंग करायला कितपत साथ देणार याची अजिबात कल्पना मला नव्हती, म्हणून मी सुरवातीला कमी अंतर पार करायचं ठरवलं. यासाठी मी पहिल्यांदा पणजी ते दोडामार्ग असा येऊन जाऊन अंदाजे १०० कि. मी. चा सायकल प्रवास करून पाहिला. दिवसाला मी १०० कि. मी. सायकल प्रवास करू शकते हे समजल्यानंतर मी गोवा – मुंबई हा सागरी महामार्ग निवडला.
सागरी महामार्ग निवडण्याची प्रमुख कारणे दोन. १) इथली रहदारी ही मुख्य राष्ट्रीय महामार्गापेक्षा कमी. अवजड आणि भरधाव वेगाने जाणार्‍या गाड्या या मार्गावर अपवादाने आढळतात २)विशाल अशा अरबी समुद्राची साथही कायम प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याबरोबर असेल!

पहिला दिवस ः

अखेर तो दिवस उजाडला. ५ जानेवारीला मी माझा हा एकटीचा सायकल प्रवास सुरू केला. नियोजन केल्याप्रमाणे मला सकाळी ६ वाजता निघायचं होतं, पण घरच्यांना माझ्या या उपक्रमाविषयी विश्‍वास देईपर्यंत मला निघायला ९ वाजले. ठीक ९ वाजता मी सायकलची पेडल मारायला सुरवात केली. उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन माझा प्रवास सुरू झाला. दुपारी साधारणतः मी २ वाजता वेंगुर्ल्यात पोहोचले. नियोजनानुसार माझा मुक्काम वेंगुर्ल्यात होता, पण मी निर्णय बदलला. मी पुढे मालवणपर्यंत जाण्याचं ठरवलं. वेंगुर्ला – मालवण पुन्हा ५० कि.मी. चं अंतर होतं. जास्तीच जास्त मी रात्री ८ किंवा ९ च्या दरम्यान मालवणला पोहोचेन असा माझा अंदाज, पण तो सपशेल चुकीचा ठरला. अंतर जरी कमी असलं तरी चढाव आणि वेग या दोन गोष्टींमुळे बराच फरक पडतो हे मला या ठिकाणी समजलं. इतके दिवस मी सरळ रस्त्यावर सायकलिंगचा सराव करीत होते म्हणून गती जास्त असायची, पण वेंगुर्ला पार करून मालवणच्या दिशेने जाताना कायम चढण लागते. पुन्हा या मार्गावर लोकवस्ती सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात आहे. जस जसा सूर्य मावळत होता, माझा वेग कमी कमी होत चालला होता.
संध्याकाळी ६ च्या दरम्यान एका ठिकाणी थांबून उरलेल्या रस्त्याचा अंदाज जाणून घेण्याचा मी एका व्यक्तीकडून प्रयत्न केला. त्या ठिकाणाहून मालवण अजून ३० कि. मी. होतं आणि पुढे रस्ता सरळ नसून चढाव असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यांनीच मला पुढे न जाण्याचा सल्ला दिला! मलाही ते पटलं, पण राहणार कुठे असा भला मोठा प्रश्न माझ्या चेहर्‍यावर त्यांनी पहिला. मी काही विचारायच्या आधी तेच म्हणाले की तू एक मुलगी आहेस. सांगणं चुकीचं होईल, पण तू इथेच राहा. आमच्या घरात बायका – मुलं आहेत. हवं असल्यास आधी खात्री करून घे. तुला जर शंका असेल तर दुसरीकडे सोय करू. मला थोडं दडपण आलं खरं, पण माझ्यापाशी दुसरा पर्यायही नव्हता. पहिल्याच दिवशी मी अशा ठिकाणी अडकले होते की, जिथे हॉटेल सोडाच, पण साधं लॉज सुद्धा नव्हतं. मी होकार देताच त्यांनी आपल्या मुलीला हाक दिली. त्यांचं घर आणि एकत्र कुटुंब पाहून मला मोकळं वाटलं! मग सुरू झाल्या एकत्र बसून गप्पा. हे कुटुंब होतं रेवंडकर कुटुंब.
स्वाभाविकच मी कुठून आले, कुठे जाते, काय करते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना हवी होती. माझा पाहुणचार सुद्धा एकदम शाही होता आणि रात्रीच जेवण झाल्यानंतर मी झोपले तेही टेन्शन फ्री!

दुसरा दिवस ः

माझ्या प्रवासाचा दुसरा दिवस उजाडला. मी खूप खुश होते कारण नियोजनाप्रमाणे दुसर्‍या दिवशी वेंगुर्ला – मालवण अंतर कापायचं होतं, पण मी वेळे आधी पुढे होते. मालवणला पोहोचण्यासाठी मी बरंच अंतर पार केलं. त्यामुळे मालवण पार केल्यानंतर मला थेट देवगडला जायचं होतं वेळ वाया न घालवता. मी ज्या ठिकाणी होते, तिथून ३० किमी मालवण आणि नंतर पुन्हा ५० किमी देवगड म्हणजे एकूण ८० ते ९० किलोमीटर सायकल मला त्या दिवशी चालवायची होती, तीही सूर्य मावळण्यापूर्वी.
सकाळी ७ वाजता मी रेवंडकर कुटुंबाचा निरोप घेतला आणि ११ वाजता मालवणला पोहोचले. मालवणला पोहोचल्यावर मी मालवणी जेवणार असा बेत होता, पण तिथे पुन्हा राहून वेळ निघून जाण्यापूर्वी मला निघायचं होतं. त्यामुळे १० -१५ मिनिटे थांबून एनर्जी बार आणि पाणी प्याले आणि पुन्हा पेडल मारायला सुरवात केली. नियोजनाप्रमाणे मी जरी जात नसले, तरी एक दिवस मी वाया नाही घालवला याचा आनंद होता. त्याच उत्साहाने मी रात्री ८ वाजता देवगडला पोचले आणि जवळच लॉजमध्ये खोली आरक्षित केली. रात्री अगदी हलकं जेवण घेऊन झोपले!

तिसरा दिवसः

पणजी ते देवगड असे जवळजवळ १४० कि.मी. चं अंतर मी पार केलं होतं. तिसर्‍या दिवशीचं लक्ष्य होतं रत्नागिरी! पण माझ्या उत्साहावर विरजण पडलं ते मासिक पाळीमुळे. आणि मासिक पाळीच्या पहिल्याच दिवशी सायकल चालवणं मला शक्य झालं नसतं. तसंच देवगडला राहण्याचीही माझी अजिबात इच्छा नव्हती. मला सगळंच कंटाळवाणं वाटायला लागलं. मनात विचार आला की, बस पकडून सरळ गोव्यात यावं. पण मग मी पुन्हा विचार केला की, गोव्यात जाण्यापेक्षा मी रत्नागिरी गाठलं तर मला विश्रांतीही मिलेल आणि अंतर सुद्धा कापलं जाईल!
सकाळी लवकर उठले खरं, पण देवगडहून रत्नागिरीला जाण्यासाठीची बस मला चुकली. २ वाजेपर्यंत मी देवगडलाच होते आणि आता पुन्हा रत्नागिरीसाठी बस नव्हती. तिथल्या बसचालक आणि वाहकांना विचारून काय करता येईल हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि सर्वांनीच आपआपल्या परीने मला वेगवेगळे पर्याय दिले. मला रागही येत होता आणि मासिक पाळीमुळे मला त्रासही होत होता. ते सर्व जण मात्र आपण सांगतो तेच बरोबर आहे हे एकमेकांना पटवून देण्यात व्यस्त होते. शेवटी एकाने मला देवगडपासून दीड दोन तासाच्या अंतरावरील एका ठिकाणी जायला सांगितलं. अर्थात बसने. पण त्या जागेचं नाव मला माहित नाही. मी नेमकी कुठून रत्नागिरीची बस पकडली हे मला माहित नाही आणि तेव्हा विचारायची सुद्धा इच्छा नव्हती. कुठल्याही परिस्थितीत मला रत्नागिरीला पोहोचून शांत झोपायचं होतं. एकदाची रत्नागिरीची बस सापडली. संध्याकाळी मला वाटतं मी ५ किंवा ६ वाजता रत्नागिरीला जाण्यार्‍या बसमध्ये बसले. सायकल अर्थातच बसच्या टपावर! रात्री ८ वाजता मी हातखंबा इथे पोहचल्यानंतर पुन्हा साधारणतः १५ कि. मी सायकल चालवावी लागली. पण रत्नागिरीला पोचल्यानंतर जरा बरं वाटलं. गाड्यांचा आवाज, लखलखणारे दिवे, हे गेले दोन दिवस मी पहिलेच नव्हते. ते सगळं बघितल्यानंतर मन शांत झालं. जणू मला हीच माणसांची धावपळ पाहायची होती!

चौथा दिवस ः

मी घेतलेल्या अचूक निर्णयामुळे चौथ्या दिवशी रत्नागिरीला होते . तब्येतही ठीक होती आणि एक दिवस सायकल न चालवल्यानं शरीराला बर्‍यापैकी विश्रांती मिळाली होती. त्यामुळे पुन्हा सायकल चालवायला मानसिकदृष्ट्‌याही मी तयार होते. मात्र नियोजनाप्रमाणे मी सकाळी ६ वाजता सुरूवात न करता १० वाजता केली. चौथ्या दिवशी मला पोहचायचं होत गुहागरला. रत्नागिरी ते गणपतीपुळे हा रस्ता सरळ असल्यानं मी १ वाजता गणपतीपुळ्याला पोहोचले. मी जो रस्ता निवडला त्याच्या सुरवातीलाच मला लोकमान्य टिळकांचं घर पाहायला मिळालं. सरकार संरक्षित असलेले हे घर आणि टिळकांचे स्मारक सध्या पुरातत्व विभागाच्या ताब्यात असून पर्यटकांसाठी खुले आहे. पण मी आत गेले नाही. मला प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा होता. त्यामळे बाहेरूनच ही वास्तू पाहून मी पुन्हा पेडल मारायला सुरवात केली.
माझ्या पूर्ण प्रवासात मी कुठल्याच पर्यटनस्थळांना भेटी दिल्या नाहीत. सायकलने जास्तीत जास्त अंतर कापणे हाच मुख्य हेतू होता. त्यामुळे दुपारचं जेवणही मी टाळत होते. सकाळचा नाश्ता भरपेट करून मी सायकलिंगला सुरवात करायचे. मात्र शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी ग्लुकोजयुक्त पाणी आणि एनर्जी बार खात होते.
गणपतीपुळे मंदिर मार्गे जाताना सुरवातीलाच आरे – वारे हा विशाल समुद्रकिनारा तुमच्या स्वागतासाठी सज्ज असतो. आम्ही गोवेकर असल्याने समुद्र आम्हाला तेवढा आकर्षित करत नाही, पण का कोण जाणे या समुद्राच्या लाटांचा आवाज आणि सौंदर्य पाहून मी एका वेगळ्याच विश्वात गेले. या समुद्रकिनार्‍याचं वर्णन शब्दांत कसं करावं हेच कळत नाही. त्यावेळी मात्र मी ते गूढ सौंदर्य पाहत काही वेळे तिथे थांबून पुन्हा सायकलिंग करायला सुरवात केली.
ठीक दुपारी १ वाजता गणपतीपुळ्याला पोहोचले. पण न थांबता शीतपेयाने तहान भागवून गुहागरसाठी सायकलिंग चालूच ठेवली. गुहागरला पोचण्यासाठी फेरीसेवा आहे. गणपतीपुळ्याहून जयगड आणि जयगड फेरी क्रॉस करून तवसाळ आणि पुढे गुहागर.
या प्रवासाचा अनुभव मी कधीच विसरणार नाही. सकाळी सायकलिंग उशिरा सुरु केल्यानं आणि त्यात वाटेत चढाव आणि मासिक पाळी सुरु असल्यानं सायकलची गती कमी राहिली. त्यामुळे मी नियोजित वेळेत गुहागरला पोहोचू शकले नाही. गणपतीपुळे ते गुहागर फक्त ५० कि.मी. अंतर होतं, पण मी रात्रीचे ८ वाजले तरी लोकवस्तीत पोचले नव्हते. रस्ता पूर्ण निर्जन आणि पूर्ण अंधार. मला त्यावेळी प्रत्येक क्षणाला वाटत होतं की दोन तीन कि.मी. अंतर पार केल्यानंतर मी गुहागरला पोहोचेन. पण रस्ता आणि माझी वेळ जणू अडकून पडली होती. त्यात रस्त्याला फाटे फुटले की मी पूर्णपणे हवालदिल व्हायचे. कोणता रस्ता निवडावा हे सुद्धा कळत नव्हतं. कोणी सांगणारंही नसायचं. रस्ता चुकले तर पुन्हा मागे वळावं लागेल या कल्पनेनं भीती वाटायची. त्यातच या रस्त्यावरून जाणारे – येणारे प्रवासीही कमीच. कुणाला थांबवून रस्ता विचारेन अशीही परिस्थिती नव्हती. अंधार असल्याने ज्या गाड्या दिसायच्या त्या अवजड आणि त्या गाडयांच्या दिव्यांच्या प्रखर प्रकाशझोतामुळे काही क्षणांसाठी डोळ्यांसमोर पूर्ण अंधार यायचा.
इथे एकच गोष्ट चांगली घडली माझ्या बाबतीत, ती म्हणजे मला पूर्ण उतार मिळाला. पेडल मारायची गरज नव्हती. पण मी वेग घेऊ शकत नव्हते, कारण रस्ता अंधारात दिसत नव्हता. माझ्याजवळच्या इमर्जन्सी लाईटचा उजेड रस्ता दिसण्यासाठी अपुरा होता. म्हणून थोड्यावेळाने मी सायकल न चालवता पायी चालायचं ठरवलं.
इतक्यात मागून स्कूटरचा आवाज आला. मी ठरवलं की, जो कुणी असेल त्याला अडवायचं आणि मदत घ्यायची. पण ते नाही थांबले. मला अक्षरशः रडू आलं. ना फोनला रेंज, ना रस्त्याचा अंदाज.
लहानपणी मला मी एका बंद आणि अंधार असलेल्या खोलीत असल्याची स्वप्नं पडायची, तशाच खोलीत असल्यासारखं मला वाटलं. या भीतीने मी पुढेही सरकत नव्हते आणि स्वतःला सावरूनही घेऊ शकत नव्हते. भीती होती ती फक्त अंधाराची. एकदम भूतकाळात गेल्यासारखं वाटलं. इतक्यात त्या शांत ठिकाणी पुन्हा गाडीचा आवाज ऐकू आला.
चेहर्‍यावर भीतीचे भाव न ठेवता मी पुन्हा हात दाखवला आणि ते थांबले. त्याचं कारण होतं. त्यांनी मला दुपारी गणपतीपुळे मंदिराजवळ सायकलवर पाहिलं होतं. त्यांनी आपली स्कूटर थांबवताच मला प्रश्न विचारला, ‘एवढा प्रवास एकटीने कसा केला?’ ‘झालं!’ एवढंच उत्तर मी त्यांना दिलं आणि गुहागर अजून किती लांब आहे असं विचारलं.
अवघ्या काही मिनिटांत पोहचणार असं सांगून त्यांनी मला धीर दिला. मी कोणतीही मदत मागितलेली नसताना त्यांनी स्वतः मला ‘तुम्ही पुढे व्हा, मी मागून येतो’ असं सांगून आपली स्कूटर माझ्या सायकलच्या गतीने चालवून मला गुहागरला पोहोचवलं! गुहागरचे लोक चांगले आहेत, घाबरू नका, असं सांगून मला त्यांनी बसस्थानकासमोर असलेल्या लॉजवर जाण्यास सुचवलं आणि निघून गेले. मी एवढी घाबरले होते की, त्यांना थँक यू म्हणण्यापलीकडे मी अजून काहीच बोलू शकले नाही.
रात्रीचे १० वाजले होते. भीती अजून होती, पण आजूबाजूला माणसं दिसत होती, त्यामुळे थोडं निवांत वाटत होतं. लॉजवर खोली घेतली. खूप थकले होते आणि मला माझ्या आईशी बोलायचं होतं. फक्त तिचा आवाज ऐकण्यासाठी. पण मोबाईलला रेंज नव्हती. त्या रात्री मी खूप रडले! अंधार हा माझा ‘विकपॉइंट’ होता. मला कुठेतरी मी अपयशी ठरत असल्यासारखं वाटलं आणि या विचाराने मी कधी झोपले मलाच कळलं नाही…

पाचवा दिवस :

पाचव्या दिवशी गुहागर ते हरिहरिश्वर हे जवळपास १०० कि. मी. चे
अंतर मला कापायचं होतं. पण ते मी करू शकेन की नाही असा विचार पहिल्यांदाच मनात आला, तो सुद्धा प्रवासाच्या पाचव्या दिवशी. रत्नागिरी ते गुहागर या दरम्यान झालेल्या चुका आणि अनुभव मी कधीही विसरू शकणार नाही. मी पहाटे ५ ला उठले. समोर दोन पर्याय पुन्हा आले. एकतर बसमधून गोव्याला परत यायचं किंवा लगेच फ्रेश होऊन सायकलची पेडल मारायला सुरवात करायची. वेळ कमी आणि अंतर जास्त. माझ्यासाठी सरळ रस्त्यावर १०० कि. मी. ही सोपी गोष्ट होती, पण मी जसं म्हणाले की, चढावामुळे वेगावर बराच परिणाम होतो. या गोष्टीमुळे नकारात्मक विचार मनात सुरू होते आणि ह्या सगळ्याचा विचार मनात सुरू असताना माझ्या लक्षात आलं की, माझं लक्ष्य हे आता मुंबई आहे आणि मला तिथे पोहोचायचं आहे. हे अंतर मला कुठल्याही परिस्थती पूर्ण करायचं आहे. लगेच ताजीतवानी झाले. लॉजची खोली सोडली आणि तिथेच हलका नाश्ता केला व हरिहरेश्वरसाठी निघाले. आजच्या दिवशी मी बर्‍यापैकी सायकलची गती घेतली होती आणि शारीरिकदृष्ट्‌याही मला पाचव्या दिवशी सायकल चालवणं खूप सोपं वाटत होतं. जणू बंद असलेले मशीन सर्व्हिसिंगनंतर पुन्हा सुरु झालं. स्वाभाविक चढाव मिळाले, पण मी वेळकाढूपणा अजिबात केला नाही. संध्याकाळी ७ च्या दरम्यान मी हरिहरेश्वरला पोहोचले. हा संपूर्ण रस्ता रत्नागिरीजवळच्या आरे – वारे समुद्र किनार्‍याची आठवण करून देणारा ठरला, कारण इथूनही सायकलिंग करताना डोंगरावरून अथांग पसरलेल्या समुद्राचं दृश्य आणि लाटांचा आवाज प्रवासात साथ देतो. हरिहरेश्व्र हे पर्यटनस्थळ असल्यानं पर्यटकांची ये – जा या रस्त्यावरून बर्‍यापैकी सुरू होती आणि हळूहळू माझ्या प्रवासादरम्यान गायब झालेली माणसांची गर्दी आता वाढू लागली होती…

सहावा दिवस ः

आतापर्यंत ३३३ कि. मी. चा रस्ता मी पूर्ण केला होता. मुंबई गाठण्यासाठी अजून फक्त १०० कि. मी. चा पल्ला मला गाठायचा होता, कारण पुढे अलिबागहून मला सायकलिंग करण्याची गरज नव्हती, कारण अलिबागहून फेरीसेवा मला थेट मुंबईच्या ‘गेट वे’ ला पोचवणार होती. त्यामुळे तसा सायकलिंगचा हा शेवटचा दिवस. मुंबईच्या मी तशी जवळ येऊन पोहोचले होते, पण अजून २४ तास वाट पाहायची होती. हरिहरेश्वरहून अलिबाग हे माझे मुक्कामाचे ठिकाण होते. सकाळी हरिहरेश्वरहून निघताना मात्र या ठिकाणी न राहण्याचा पश्चाताप झाला, कारण या परिसरातील किल्ले आणि इतर पुरातन वारसास्थळे मला पाहता येणार नव्हती. पण आवर्जून या ठिकाणी पुन्हा येण्यासारखं हे स्थळ आहे. सायकलिंग करताना एक गोष्ट लक्षात आली की इथे डोक्यात नकारात्मक विचार येत नाहीत. डोक्यात येणार्‍या विचारांना आपोआप पूर्णविराम देऊन आपण एकाग्रतेने सायकलिंग करू शकतो. सुरवातीचे तीन – चार दिवस मला हे जाणवलं नाही, कारण मी लवकरात लवकर कशी पोहचेन या विचारानेच मनावर ताण यायचा. पण नंतर जाणवलं की, फक्त प्रवासाचं अंतिम ठिकाण गाठणं महत्त्वाचं नसतं, तर प्रवासात येत असलेले आणि येणार असलेले अनुभव अधिक महत्वाचे आहेत. माझ्या वाट्याला आलेल्या काही वाईट अनुभवांपासून मी पळू शकले नाही तर त्या वाईट अनुभवांना बरोबर घेऊन पुढे जावं लागलं. अशा अनुभवापासून आपण लपूही शकत नाही आणि टाळूही शकत नाही, पण शेवट हा नेहमीच सकारात्मक असतो आणि म्हणूनच हरिहरेश्वर ते अलिबाग हे अंतर मी सहज पार करू शकले, कोणताही ताण न घेता!

दिवस सातवा:

आज मी निवांत होते. मला अजिबात घाई नव्हती. सायकलिंग तर करायचंच नव्हतं. तसंच आज मी मुंबईला पोहचणार होते अजिबात ताण न घेता. मी उशिराच बाहेर पडले. शेवटच्या टप्प्यातला अलिबाग ते मांडवा हा ३५ ते ४० कि.मी. चा प्रवास मी वेळ वाचवण्यासाठी पुन्हा बसने केला. ठीक एक वाजता मी जेटीजवळ पोहोचले. सायकल फेरीत टाकली आणि एक – दीड तासात मला दूरहून गेटवे ऑफ इंडिया दिसला. समुद्रातून गेटवे आणि शेजारचे ताजमहाल हॉटेल पाहतानाचा तो अनुभव खरंच मी शब्दांत नाही वर्णन करू शकत! कधी एकदा फेरी धक्क्याला लागते आणि उतरते याची मी आतुरतेने वाट बघत होते. भर उन्हाच्या कडाक्यात मी मुंबईला पोहोचले.
पण जो उत्साह समुद्रातून गेटवेकडे पाहताना होता, तो धक्क्यावर उतरलल्यावर अचानक कमी झाला! माणसांची गर्दी आणि त्या गर्दीत मी सायकलसह एकटी! डोक्यात काय सुरू होतं तेच कळेना. पर्यटकांनी विचारलं कुठून आलीस, का आलीस, काही उद्देश? गोव्याहून सायकलने एकटी आले हे ऐकून त्यांना आश्चर्यच वाटलं! एकीनं तर माझ्यासोबत फोटोही काढला आणि विचारलं, ‘भीती नाही वाटली?’ एका मुलाने सायकल कोणती, कितीची असे अनेक प्रश्न विचारले आणि कौतुकही केलं!
एवढे दिवस जिथे पोहोचायचं म्हणून हा आटापिटा केला होता, त्या ठिकाणी मी शेवटी पोहोचले होते, पण डोक्यात विचारांचा वेगळाच खेळ सुरू होता! मला मी चालवलेली पहिली सायकल आठवली. त्या सायकलवरून मी किती तरी वेळा पडले होते. मित्र मैत्रीणींशी लावलेल्या सायकल शर्यती आठवल्या. आज मात्र या क्षणी कुणीही माझ्यासोबत नव्हतं. मी काही तरी प्रयत्न करून साध्य केलं याची जाणीव होती, पण त्याचबरोबर येथे एकटं असल्याचं भानही होतं. मुळात या प्रवासातून मी फार काही यश गाठलं असं नव्हे, पण हा प्रवास माझ्यासाठी काही मिळवण्यासाठी नसून एक आत्मशोध होता. काही त्यातून साध्य झालं नसेल, पण खूप काही शिकले. आधी म्हटल्याप्रमाणे प्रवास कसा केला हे महत्वाचं नव्हतं, पण प्रवासाचा अनुभव महत्त्वाचा होता. ज्या गोष्टी मिळवायच्या होत्या त्या त्या मला त्यातून मिळत गेल्या. वेळेचं महत्त्व, माणसांचा सहवास आणि स्वतःवर विश्वास!