निवडणूक आयोगाकडून पर्रीकरांना सौम्य शब्दात समजवजा सल्ला

0
57

>> ‘त्या’ वक्तव्याने आचार संहिता भंग

 

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या चिंबल येथील भाजपच्या एका बैठकीवेळी मतदारांनी लाच म्हणून पैसे घेण्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल भारतीय निवडणूक आयोगाने संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना सौम्य शब्दात समज दिली आहे.
आयोगाचे सचिव सुमित मुखर्जी यांनी या संदर्भात पर्रीकर यांना समज देणारे हे पत्र पाठविले आहे. अशाच प्रकारचे वक्तव्य केल्याप्रकरणी आयोगाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुध्द म्हापसा पोलिसात एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले होते. घटनात्मक उच्च पदावर असलेल्या व्यक्तीने असे वक्तव्य करू नये. पर्रीकर यांनी भविष्यात याविषयी काळजी घ्यावी असा सल्ला पत्रात देण्यात आला आहे.
चिंबल येथील सदर प्रचार बैठकीवेळी पर्रीकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन झाले असल्याचे आयोगाने या पत्रात स्पष्ट केले आहे.
पर्रीकर यांच्या सदर वक्तव्याविरुध्द आयोगाकडे तक्रारी दाखल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्याला उत्तर देताना पर्रीकर यांनी आपल्या ‘त्या’ मूळ कोकणीतील वक्तव्याचे चुकीचे भाषांतर करण्यात आल्याचा दावा केला होता. मात्र आयोगाने त्यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. आयोगाने भाषा तज्ज्ञांचा समावेश असलेल्या त्रिसदस्यीय समितीने भाषांतरात कोणतीही चूक नसल्याचे निरीक्षण नोंदविले. तर उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी सदर वक्तव्याच्या कोकणी सीडीत कोणतीही बनवेगिरी नसल्याचा अहवाल दिला याकडे आयोगाने पत्रात लक्ष वेधले आहे. … तुम्ही कोणाकडून तरी २००० रु. घेऊन मत देता. ते ठीक आहे. कोणी तरी रॅली काढेल त्यात गैर नाही, तेथे कोणी ५०० रुपये घेऊन फिरत असेल तरी आपली हरकत नाही. मात्र तुम्ही एक लक्षात ठेवावे की मत कमळालाच द्यायचे आहे असे पर्रीकरांचे ते वक्तव्य आहे असे आयोगाने पत्रात नमूद केले आहे.