धावशिरे सरकारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा वर्गांवर बहिष्कार

0
63

>> इमारत दुरुस्ती ९ महिन्यांनंतरही अपूर्णच

 

धावशिरे-उसगाव येथील सरकारी हायस्कूलातील ५ वी ते १० वीच्या २०० विद्यार्थ्यांनी काल वर्गांवर बहिष्कार घातला. इमारतीचे काम गेले ९ महिने सुरू असून येत्या ८ दिवसात वर्ग सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. दरम्यान, पालकांनी दुपारी शिक्षण संचालक गजानन भट यांची भेट घेतल्यानंतर येत्या ८ दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
इमारतीच्या दुरुस्तीचे काम फक्त ३ महिन्यात पूर्ण करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र ९ महिने उलटले तरी काम पूर्ण न झाल्याने पालकांबरोबर विद्यार्थीवर्ग संताप व्यक्त करीत आहेत. सध्या केळीनी येथे एका खासगी इमारतीत सुविधा नसलेल्या ठिकाणी वर्ग घेण्यात येत आहेत. काल सकाळी सर्व विद्यार्थ्यांसोबत पालक दुरुस्ती सुरू असलेल्या इमारतीकडे आले. मात्र शिक्षक वर्ग त्याठिकाणी न आल्याने दुपारपर्यंत तेथेच थांबून विद्यार्थी घरी परतले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी खासगी इमारतीत आवश्यक सुविधा नसल्याने दहावीचा अभ्यास योग्यरित्या होत नाही. तसेच तापमान वाढल्याने त्या खोलीत बसून रहाणे कठीण होत असल्याच्या तक्रारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या. संतापलेल्या पालकांनी दुपारी पणजीत जावून शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांची भेट घेवून चर्चा केली. यावेळी भर यांनी ८ दिवसात संपूर्ण काम पूर्ण करून विद्यार्थ्यांची सोय करण्याचे आश्‍वासन दिले. मात्र शुक्रवारी सकाळी विद्यार्थी पुन्हा दुरुस्ती सुरू असलेल्या इमारतीच्या आल्यानंतर त्यांचा निर्णय कळविणार असल्याची माहिती पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष प्राण गावडे यांनी दिली. सरकारी हायस्कूलात सध्या पूर्णवेळ मुख्याध्यापक नसल्याचेही संचालक गजानन भट यांच्या नजरेस पालकांनी आणून दिले. सध्या खासगी इमारतीत मुले एकाच बाकावर तीन ते चारजण बसतात. वाढत्या तापमानामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. तसेच इमारतीच्या दोन्ही बाजूंनी जवळच दोन दारूची दुकाने आहेत. मात्र शिक्षण खात्याच्या एकही अधिकार्‍यांनी गेल्या ९ महिन्यात विद्यार्थ्यांच्या समस्येकडे लक्ष दिले नसल्याचे तुळशीदास नाणशीकर यांनी सांगितले.