आता मद्य व्यावसायिक जाणार सर्वोच्च न्यायालयात

0
119

>> पुनर्विचार याचिका दाखल करणार

 

राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गांपासून ५०० मीटर अंतरापर्यंत असलेली दारूची दुकाने बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे मद्य विक्रेते संघटनेने काल पत्रकार परिषदेत सांगितले.
११ मार्चनंतर राज्यात सत्तेवर येणार्‍या सरकारचीही हा कायदेशीर लढा लढण्यासाठी मदत घेण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत दत्तप्रसाद नाईक, गौरीश धोंड व मायकल कारास्को यांनी सांगितले. अबकारी खाते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढत आहे असे सांगून आम्ही गप्प बसू शकत नाहीत, असे ते म्हणाले. त्यामुळेच या आदेशाविरुध्द लढा देण्यासाठी ‘गोवा हायवे अफेक्टेड लिकर वेन्डर्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आल्यास राज्यातील ७० टक्के दारूची दुकाने बंद करावी लागणार असल्याचे वरील द्वयीनी सांगितले. पणजी, वास्को, म्हापसा, फोंडा, मडगाव या प्रमुख शहरांबरोबरच अन्य शहरे व गावातील दारूची दुकाने मोठ्या संख्येने बंद करावी लागतील. त्यामुळे दारूविक्री व्यवसायातील लोक बेरोजगार बनतील. त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी येईल. तसेच राज्य सरकारचा शेकडो कोटींचा महसूल बुडेल, असे ते म्हणाले. दारूची दुकाने ज्या ठिकाणी आहेत अशा बर्‍याच ठिकाणी नंतर राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग बांधण्यात आले याकडेही कानाडोळा करता येणार नसल्याचे ते म्हणाले.
वेगळ्या अबकारी धोरणाची मागणी यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने वेगळे अबकारी धोरण तयार करावे. तसेच महामार्गांची अधिसूचना मागे घेण्यात यावी, अशी मागणीही असल्याचे धोंड व नाईक यांनी सांगितले. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा सुस्पष्ट असा नाही. आदेशाबाबत आम्ही ऍडव्होकेट जनरलना विचारले तेव्हा दारूची विक्री करणारी सर्वच दुकाने (महामार्गांपासून ५०० मीटर अंतरावर असलेली) बंद करावी लागणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, असे नाईक यांनी सांगितले.
याप्रश्‍नी लढा देण्यासाठी ङ्गगोवा हॉटेल ऍण्ड रेस्टॉरन्टस् असोसिएशनफ, ङ्गबार ओनर्स असोसिएशनफ व ङ्गगोवा दारू विक्रेते संघटनाफ या संघटना एकत्र आल्या असल्याचे दत्तप्रसाद नाईक यांनी स्पष्ट केले.
अभ्यासाठी समिती
या आदेशाचा वेगवेगळ्या तालुक्यातील किती दारू विक्रेत्यांना फटका बसेल त्याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समितीचे सदस्य खालीलप्रमाणे आहेत.
तिसवाडी- मंगलदास नाईक, पेडणे- फेलिक्स फर्नांडिस, फोंडा- भास्कर खांबी, केपें- हर्षल तेंडुलकर, काणकोण- प्रताप पेडणेकर, मुरगाव- फ्रान्सिस पेरेरा, वास्को- ज्योकिम रॉड्रिग्स, वाळपई- तुकाराम हळदणकर, सत्तरी- अंजू सिमेपुरुषकर व सासष्टी- एस्. व्ही. डांगी.