शशिकला दोषी ः ४ वर्षे तुरुंगवास

0
115

>> मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न उद्ध्वस्त ः तातडीने शरण येण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

 

अखेर तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदावर आरूढ होण्यासाठी आतूर असलेल्या अभाअद्रमुकच्या महासचिव शशिकला नटराजन यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार झटका दिला. १९९० च्या दशकातील कोट्यवधींच्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी शशिकला यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवित आधीच स्थानिक न्यायालयाने ठोठावलेली चार वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा कायम केली. त्यासाठी तातडीने बंगळुरुतील न्यायालयाला शरण येण्याचा आदेशही न्यायमूर्ती पी. सी. घोष व न्यायमूर्ती अमितावा रॉय यांच्या खंडपीठाने जारी केला. त्यांच्याबरोबरच व्ही. एन. सुधाकरन व इलावारसी या त्यांच्या दोन नातेवाईकांनाही खंडपीठाने असाच आदेश दिला. या प्रकरणातील प्रमुख आरोपी जयललिता यांचे निधन झाल्याने त्यांचा विषय संपविण्यात आला.

बंगळुरुतील न्यायालयाने माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता, शशिकला व त्यांचे दोन नातेवाईक यांना दोषी ठरविले होते. त्यापैकी जयललिता यांना चार वर्षे तुरुंगवास व १०० कोटी रु. दंड, तर शशिकला व अन्य दोघांना चार वर्षे तुरुंगवास व प्रत्येकी १० कोटी रु. दंड अशी शिक्षा ठोठावली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडले होते. त्याआधी त्यांनी चार महिन्यांचा तुरुंगवास भोगला होता. निर्दोष सोडण्याच्या उच्च न्यायालयाच्या निवाड्याला नंतर सर्वोच्च न्यालयात आव्हान देण्यात आले.
या प्रकरणाच्या आरोपपत्रानुसार राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनी सहआरोपी शशिकला, इलावरासी व सुधाकरन यांच्या संगनमताने ६६.६५ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमवली. या प्रकरणात जयललिता या मुख्य आरोपी असून व अन्य तिघांनी त्यांना या गुन्ह्यात साथ दिली असा दावा ङ्गिर्यादी पक्षाने केला होता. त्यासाठी त्यांनी ३२ खाजगी आस्थापनांच्या बेनामी मालकांची भूमिका बजावली होती.
अभाअद्रमुक पक्षावर ताबा मिळवण्यासाठी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्याशी कडवा संघर्ष चाललेला असतानाच सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा जाहीर झाला आहे. त्यामुळे पक्षात ङ्गूट पडण्याची स्थितीही निर्माण झाली आहे.
काही दिवसांपूर्वी पनीरसेल्वम यांनी
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शशिकला त्या पदावर बसण्याच्या तयारीत होत्या. मात्र त्यांच्या विरोधातील प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा जवळ असल्याने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केले नाही.

मला न्याय मिळेल ः शशिकला
चेन्नई ः सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शशिकला म्हणाल्या, ‘भूतकाळात जेव्हा अम्मा संकटात असायच्या तेव्हा मलाही त्रास व्हायचा. आताही हा त्रास मी सोसणार आहे. मला न्याय मिळेल.’
पनीरसेल्वमची पक्षातून हकालपट्टी
चेन्नई ः अभाअद्रमुकच्या महासचिव शशिकला यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री असलेल्या ओ. पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी करीत असल्याचे जाहीर केले. त्यांचे पक्षातील प्राथमिक सदस्यत्व रद्द केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इ. पलानीस्वामी यांची
विधीमंडळ नेतेपदी निवड
चेन्नई ः शशिकला यांचे समर्थक असलेले इ. पलानीस्वामी यांची अभाअद्रमुकच्या
विधीमंडळ नेतेपदी निवड केल्याचेही जाहीर करण्यात आले. शशिकला यांच्या अध्यक्षतेखालील आमदारांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
पलानीस्वामींच्या निवडीस आक्षेप
चेन्नई ः विधीमंडळ नेते म्हणून पलानीस्वामी यांच्या निवडीस पनीरसेल्वम समर्थक शालेय शिक्षणमंत्री के. पंडियाराजन यांनी आक्षेप घेतला. असे करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे ते म्हणाले.

शशिकला समर्थक पलानीस्वामी
यांचा सरकार स्थापनेचा दावा

अभाअद्रमुकचे शशिकला समर्थक नवनियुक्त विधीमंडळ नेते ई. के. पलानीस्वामी यांनी काल संध्याकाळी राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. यावेळी त्यांच्यासमवेत काही ज्येष्ठ नेते व मंत्रीही होते, असे सूत्रांनी सांगितले.
शशिकला यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरविल्याचा निवाडा जाहीर झाल्यानंतर शशिकला समर्थक आमदारांच्या झालेल्या बैठकीत पलानीस्वामी यांची विधीमंडळ नेते म्हणून निवड करण्यात आली. या बैठकीस उपस्थित राहिलेल्या आमदारांची नेमकी संख्या कळू शकली नाही.
गेल्या आठवड्यात पनीरसेल्वम तसेच शशिकला या दोघांनीही राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला होता. सोमवारी मद्रास उच्च न्यायालयात सरकारी वकिलांनी एका रिसॉर्टमध्ये अभाअद्रमुकचे ११९ आमदार स्वेच्छेने राहत असल्याची माहिती दिली होती. पनीरसेल्वम यांनी त्या आमदारांना जबरदस्तीने तेथे ठेवल्याचा आरोप केला होता.
दरम्यान, ऍटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी सरकार स्थापनेसाठी एकाहून अधिक दावेदार असल्यास राज्यपालांनी विधानसभेच्या पटलावर बलाबल अजमावण्याची प्रक्रिया करावी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरम्यान, पनीरसेल्वम यांच्या समर्थक गटानेही राज्यपाल विद्यासागर राव यांची काल भेट घेतली. सध्या पनीरसेल्वम यांच्या बाजूने अभाअद्रमुकचे ११ आमदार आहेत. तर शशिकला गटाकडे ११९ आमदार आहेत. त्यांचे काही आमदार पनीरसेल्वम यांच्या बाजूने आल्यास शशिकला गटाला विधानसभेत बहुमत सिद्ध करणे कठीण जाईल असा निरीक्षकांचा अंदाज आहे.