शशिकला यांचे राजकीय भवितव्य आज होणार स्पष्ट

0
101

>> सर्वोच्च न्यायालयाचा आज निवाडा

 

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता व त्यांच्या निकटवर्तीय शशिकला यांच्या १९९० च्या दशकातील कोट्यवधींच्या मालमत्ता घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज आपला निवाडा देणार असल्याने या क्षणी तामिळनाडूत सरकार स्थापनेचा दावा करणार्‍या अभाअद्रमुकच्या नेत्या शशिकला यांचे राजकीय भवितव्यही आजच स्पष्ट होणार आहे. आज सकाळी १०.३० वा. होणार्‍या या निवाड्यावर देशभरातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले
आहे.
शशिकला यांनी याआधीच राज्यपाल राव यांच्यासमोर सरकार स्थापनेचा दावा केला असून बहुसंख्य आमदारही आपल्या बाजूने असल्याचे म्हटले आहे. मात्र राज्यपाल राव यांनी त्यांच्या या दाव्यावर निर्णय देण्याआधी वरील प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याची प्रतीक्षा करणे योग्य मानले आहे.
वरील प्रकरणी जयललिता यांच्याशी शशिकला यांचे संगनमत होते की काय यावर न्यायालय निवाडा देणार आहे. या प्रकरणात जयललिता व शशिकला यांना २०१४ साली बंगळुरूत एकत्रितपणे काही महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. तुरुंगवासातून उभय नेत्यांची सुटका झाल्यानंतर त्या निर्णयाला कर्नाटकने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सुमारे चार महिने सुनावण्या, युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर गेल्या जूनमध्ये न्यायालयाने निवाडा राखून ठेवला होता.
पनीर सेल्वमना धक्का?
दरम्यान शशिकला यांच्या बाजूने असलेल्या अभाअद्रमुकच्या ११९ आमदारांना एका रिसॉर्टमध्य जबरदस्तीने ठेवण्यात आलेले नसून ते सर्वजण स्वेच्छेन वास्तव्यास असल्याची माहिती तामिळनाडू पोलिसांनी काल मद्रास उच्च न्यायालयाला दिली. शशिकला यांचे प्रतिस्पर्धी पनीरसेल्वम यांनी शशिकला यांनी वरील आमदारांना जबरदस्तीने रिसॉर्टमध्ये ठेवल्याचा आरोप केला आहे. पनीरसेल्वम सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री असूनही पोलिसांनी वरीलप्रमाणे त्यांच्या विरोधात माहिती दिल्याने त्यांच्यासाठी ती धक्कादायक बाब मानली जात आहे. रिसॉर्टमधील सर्व ११९ आमदारांच्या जबान्या नोंदविल्याचेही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले आहे.
विधानसभा पटलावर बहुमत सिध्द करण्याच्या प्रक्रियेआधी अधिकाधिक आमदारांना आपल्या गटात आणण्यासाठी पनीरसेल्वम हे प्रयत्नशील आहेत. ऍटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी राज्यपाल राव यांना वरील प्रक्रिया आठवड्याच्या आत करण्याचा सल्ला दिला आहे.
रिसॉर्टमधून आमदार निसटले
एका नाट्यमय घडामोडीत काल अभाअद्रमुक नेत्या शशिकला नटराजन यांच्या ताब्यात असलेल्यांपैकी एक खासदार व एक आमदार यांनी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत आपला पाठिंबा ओ. पनीरसेल्वम यांना असल्याचे जाहीर केले. त्यामुळे शशिकला यांना हा झटका ठरला आहे.