डोनाल्ड ट्रम्प यांचे रोखठोक निर्णय

0
106

– दत्ता भि. नाईक

डोनाल्ड ट्रम्प यांचे सर्व प्रयोग विलक्षण आहेत. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढेल की कमी होईल हे आताच सांगता येणार नाही. त्यांचा आग्रहीपणा त्यांनी विश्‍वात सुख-शांती नांदवण्यासाठी वापरला तर ती एक चांगली गोष्ट ठरेल. सध्या तरी भारत-अमेरिका संबंध सुधारतील अशी आशा बाळगणे एवढेच आपल्या हाती आहे.

शुक्रवार, दि. २० जानेवारी २०१७ या दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी विश्‍वात सर्वात समृद्ध व शक्तिशाली म्हणून ओळखल्या जाणार्‍या युनायटेड स्टेट्‌स ऑफ अमेरिका या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. बांधकाम क्षेत्रातील एक नावाजलेला व्यावसायिक, तसेच अमेरिकी दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांमधून प्रसिद्धीस पावलेले हे व्यक्तिमत्त्व अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले. सत्तर वर्षे वय असलेल्या ट्रम्पसाहेबांनी तुलनेने त्यांच्यापेक्षा बर्‍याच लहान असलेल्या महिला उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यावर मात केली हेसुद्धा मोठे आश्‍चर्यच होते. पैसेवाले समजल्या जाणार्‍या नागरिकांची म्हणून ओळखली जाणारी डोन्लाड ट्रम्प यांची पार्टी. या खेपेस मजूर व वाढत्या स्थलांतरितांच्या संख्येमुळे धास्तावलेल्या नागरिकांनी त्यांच्या रिपब्लिकन पार्टीच्या बाजूने मतदान करून एक वेगळाच विक्रम नोंदवला असे म्हणावे लागेल.
विनोदाचे गंभीर परिणाम
निवडणूक प्रचाराच्या काळात त्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप झाले. सन १९८७ पासून ते या पदासाठी धडपडत असल्याचेही वृत्त प्रसारित करण्यात आले. या वृत्तामागे त्यांची तत्त्वविहीन सत्तापिपासा उघड करणे हाच विरोधकांचा हेतू होता. १९ जुलै २०१६ रोजी त्यांची रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारी घोषित झाली तेव्हापासून हे प्रकार सुरू झाले. अनेक महिलांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले. त्याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचेही वृत्त आले. याबाबतीत त्यांच्या कन्येनेही त्यांच्या चारित्र्याबद्दल शंका व्यक्त केली. आपल्या देशात सोशल मिडिया किती पुढे गेलेली आहे याचा सर्वांनाच अनुभव आहे. हा प्रकार अमेरिकेत किती फोफावला असेल याची यावरून कल्पना येऊ शकते. पाच वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ असाच सर्वत्र पसरला गेला. महिलांशी गैरव्यवहार करण्याचा त्याला अधिकार कसा आहे याचे समर्थन करणारे त्याचे वक्तव्य या व्हिडिओमध्ये होते.
२०११ साली व्हाईट हाऊसमध्ये एका मेजवानीचे आयोजन केले होते त्यावेळी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्रम्प यांचे नाव घेऊन त्यांच्यावर विनोद केले होते. त्यानंतर ट्रम्प यांनी ओबामा हे खरेच अमेरिकेचे नागरिक आहेत का? याविषयी शंका उपस्थित केली होती. ११ सप्टेंबरच्या अमेरिकेवरील हल्ल्याचा सूत्रधार ओसामा बिन लादेन या पाकिस्तानात दडून बसलेल्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यापूर्वी काही दिवस अगोदर २०११ सालच्या मे महिन्यात आयोजित केलेल्या मेजवानीतील हा विनोद डोनाल्ड ट्रम्प यांनी इतका गंभीरपणे घेतला की त्यानी बरोबर चार वर्षानंतर रिपब्लिकन पार्टीसमोर स्वतःची उमेदवारी प्रस्तुत केली.
गंमत म्हणून ट्रम्प यांनी उमेदवारीसाठी अर्ज केला असावा असे सुरुवातीला सर्वांचेच मत होते. परंतु स्वतःच्या वक्तव्यानी त्यानी अमेरिकेच्या अनेक वर्षे जपलेल्या धर्मनिरपेक्षता व लोकशाहीच्या परंपरांना छेद देण्याचा प्रयत्न केला.
स्थलांतरितांवर रोख
बराक ओबामा हे सलग दोन कालखंड म्हणजे आठ वर्षे देशाचे अध्यक्ष होते. त्यांनी अमेरिकेच्या जनतेसमोर निरोपाचे भाषण करताना म्हटले की, गेली आठ वर्षे तुम्ही मला सहकार्य दिले याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मी व माझ्या पक्षाने जी काही मूल्ये जपली त्यांना नेमके आव्हान देण्याचे काम सध्याचे नूतन अध्यक्ष करत आहेत. प्रचाराच्या काळात मुसलमान धर्मीयांना देशात येण्यापासून रोखू, तसेच स्थलांतरितांना त्यांच्या देशात परत पाठवू यांसारखी वक्तव्ये माझ्या विरोधकांकडून केली गेली. राजकारणात बहुतेक प्रश्‍न सारखेच असतात, परंतु आमच्या देशाची आधारस्तंभ असलेली काही मूल्ये सध्या संकटात सापडलेली आहेत, असेही ते म्हणाले.
ट्रम्प यांचा स्थलांतरितांवर एवढा रोष आहे की सत्ता हातात घेतल्यानंतर त्यांनी परदेशी नागरिकांद्वारा केल्या जाणार्‍या गुन्ह्यांसंबंधाने साप्ताहिक वृत्त तयार करण्याचे आदेश गृहखात्याला दिले. ‘इन्डिपेंडन्ट’ या अमेरिकी दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार त्यांनी अशा गुन्हेगारांवर हद्दपारीचे आदेश काढण्याबाबतीत चालढकल करणार्‍या ‘आश्रयदात्या’ शहरांचीही यादी बनवण्याचे आदेश दिलेले आहेत.
अमेरिकेशी दक्षिणेस सीमा भिडत असलेला मॅक्सिको देश. या देशातून प्रचंड मोठ्या प्रमाणात स्थलांतरित घूसखोर देशात घुसतात हे लक्षात आल्यामुळे ही घूसखोरी रोखण्यासाठी मॅक्सिको सीमेवर भिंत बांधण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने ताबडतोबीने घेतला. त्यामुळे अमेरिका-मॅक्सिको संबंध ताणले गेले आहेत. मॅक्सिकोमधून कामाच्या शोधार्थ मजूरच येतात असे नव्हे तर ड्रग्सची तस्करीही या मार्गे चालते. त्यामुळे हा निर्णय राष्ट्रहितार्थ घेतल्याचे नूतन अध्यक्षांचे म्हणणे आहे. याउलट हा त्यांच्या राष्ट्राचा अपमान आहे असे मॅक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष एरिक पेना नियेतो यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांची ठरलेली अमेरिका भेटसुद्धा सध्यापुरती स्थगित ठेवण्यात आलेली आहे.
‘एच-वन-बी’ हा एक व्हिसाचा प्रकार आहे. अमेरिकेतील उद्योगांना हव्या असलेल्या- विशेषकरून आय.टी. क्षेत्रातील कर्मचार्‍यांना देशात प्रवेश देण्याची तरतूद यामध्ये आहे. नवीन प्रशासन यावर नियंत्रण आणील की काय याबद्दलची शंकाही सध्या व्यक्त केली जात आहे.
तुलसी गब्बार्ड यांचा सिरिया दौरा
हे सर्व चालू असताना भारतीय वंशाची व दक्षिण कॅरोलिना राज्याची गव्हर्नर निक्की हॅले यांची ट्रम्प प्रशासनाने संयुक्त राष्ट्रात अमेरिकेची राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. निक्की हॅले या अमेरिकेत स्थलांतरित होऊन स्थायिक झालेल्या, शीख कुटुंबात जन्माला आलेल्या असून त्यांना त्यांच्या स्थलांतरित पूर्वजांचा अभिमान आहे. उत्तम धिल्लन हेही असेच भारतीय वंशाचे अमेरिकन ऍटर्नी आहेत. त्यांची डोनाल्ड ड्रम्प यांनी आपले नैतिकता व अधिकारांच्या मर्यादांचे पालन या विषयाचे सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.
तुलसी गब्बार्ड याही अशाच भारतीय वंशाच्या अमेरिकन आहेत. त्या तर ‘हिंदू’ म्हणूनच अधिक ओळखल्या जातात. अमेरिकेत सत्तांतर होताच अमेरिकन कॉंग्रेसच्या म्हणजे लोकसभेच्या खासदार असलेल्या तुलसी सिरियाला भेट देऊन आल्या. सिरियाचे अध्यक्ष बशर-अल्-असद यांची त्यांनी भेट घेतली. आतापर्यंत असद हा स्वतःच्याच प्रजेवर रासायनिक शस्त्रे वापरून अत्याचार करतो असा अमेरिकन प्रशासन प्रचार करीत आले आहे. तुलसी गब्बार्ड यांच्या मते अखेरीस असद हा सिरियाचा राष्ट्राध्यक्ष आहे व शांतता प्रक्रियेत त्याला सहभागी करून घेणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा होतो की, अमेरिका असद याला पदच्युत करण्याच्या कारवाया थांबवेल व एक प्रकारे शांततेच्या प्रक्रियेला नवीन सुरुवात होईल.
पाकिस्तानकडून अपेक्षा
पाकिस्तानचे अफगाणिस्तानमधील माजी राजदूत शाह मोहमद यांनी अमेरिकेचे पाकिस्तानविषयक धोरण फारसे बदलणार नाही असे म्हणत असतानाच अमेरिका भारताच्या अधिक जवळ सरकेल अशी भीती व्यक्त केली आहे. अमेरिकेला यापुढे ज्याप्रकारच्या भागीदाराची आवश्यकता आहे ती पूर्ण करण्याची कुवत भारतात आहे असेही त्यांनी म्हटले आहे. अमेरिका जितकी भारताच्या जवळ जाईल तितकीच ती पाकिस्तानपासून दूर जाईल अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.
यापूर्वी ओबामा प्रशासनाने पाकिस्तानला देऊ केलेली तीस कोटी डॉलर्सची मदत थांबवली होती व एफ-१६ ही फायटर विमाने स्वस्त दरात विकण्यास नकार दिला होता. तालिबानशी संबंधित हक्कानी नेटवर्कसारख्या व अफगाणिस्तानमध्ये हिंसाचार माजवणार्‍या पाकिस्तानमधून कारवाया करणार्‍या दहतवादी संघटनांवर नियंत्रण ठेवण्यात पाकिस्तानला आलेल्या अपयशामुळे अमेरिका पाकिस्तानवर नाराज आहे. पेशावर येथील विद्यापीठात एरिया स्टडी सेंटरचे संचालक असलेले प्रा. सर्फराज खान यांनी अफगाणिस्तानमधील तालिबानवर कारवाई करावी ही अमेरिकी प्रशासनाची पाकिस्तानकडून अपेक्षा आहे, असे म्हटले आहे.
मुस्लिमबहुल राष्ट्रांवर रोख
सिरिया, इराक, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान व येमेन या सात मुस्लिमबहुल देशांतून येणार्‍या निर्वासितांवर १२० दिवसांची व नागरिकांवर ९० दिवसांची बंदी घालून ट्रम्प यांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रसिद्धीच्या झोतात आल्यापासून ट्रम्प हे मुसलमानविरोधी आहेत अशी सर्वत्र चर्चा होती. सध्या पश्‍चिम आशियात जे हत्याकांड चाललेले आहे व मुसलमानांमध्ये यादवी माजलेली आहे, त्यामुळे कित्येक मुसलमान निर्वासित युरोप-अमेरिकेच्या दिशेने पळत सुटले आहेत. हा निर्वासितांचा ओघ असाच चालू राहिल्यास आपल्या देशाची ओळखच बदलेल, अशी भीती युरोपमधील देशांना भेडसावीत आहे. अमेरिका हा देश मुळातच स्थलांतरितांनी वसवलेला असल्यामुळे येथील स्थलांतरितविषयक कायदे ठिसूळ आहेत. म्हणून त्यांचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो ही ट्रम्प प्रशासनाची भीती रास्त अशीच आहे.
अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने ट्रम्प यांच्या या निर्णयाला मान्यता देण्याचे नाकारल्याने देशासमोर नवे वैधानिक संकट उभे राहिले आहे. निर्णय कितीही योग्य वाटत असला तरी तो मानवाधिकारविरोधी आहे असे बर्‍याच विचारवंतांचे मत आहे. ट्रम्प यांनी या निकालावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, यापुढे काहीही घडल्यास त्याला देशाचे न्यायाधीश जबाबदार असतील. कुवेत हा अरब म्हणजे मुसलमानांचा देश, परंतु या देशानेही पाकिस्तान व इतर काही मुसलमान देशांतील नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घातली. त्यामुळे हे लोण आता जगभर पसरेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. जगभरातील विचारवंतांकडून निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहेत. ऑस्ट्रेलियातील एक वैज्ञानिक ऍलन फिंकेल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची तुलना सोव्हिएत रशियाचा कम्युनिस्ट नेता क्रूरकर्मा स्टॅलिनशी केलेली आहे.
ट्रम्प यांचे सर्व प्रयोग विलक्षण आहेत. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढेल की कमी होईल हे आताच सांगता येणार नाही. त्यांचा आग्रहीपणा त्यांनी विश्‍वात सुख-शांती नांदवण्यासाठी वापरला तर ती एक चांगली गोष्ट ठरेल. सध्या तरी भारत-अमेरिका संबंध सुधारतील अशी आशा बाळगणे एवढेच आपल्या हाती आहे.