काश्मीरात ४ दहशतवादी ठार ; २ जवानही शहीद

0
89

>> चकमकीत एका युवकाचाही मृत्यू : नागरिकांकडून मोठा हिंसाचार

 

श्रीनगरपासून सुमारे ७० कि.मी. वरील एका खेड्यात काल पहाटे भारतीय सैनिकांनी केलेल्या एका कारवाईत ४ दहशतवाद्यांसह एक नागरीक ठार झाला. तसेच भारताचे दोन सैनिकही शहीद झाले. ठार झालेले दहशतवादी हे लष्करे तैयबा व हिजबुल मुजाहिदीनचे सदस्य होते.
या कारवाईत स्थानिक युवक ठार झाल्याने तेथील ग्रामस्थांनी मोठा हिंसाचार माजवला. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात १५ ग्रामस्थ जखमी झाले.
पुलगाम जिल्ह्याच्या नागबल या खेड्यात एका घरात दहशतवादी दडून राहिल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय सैनिकांनी पहाटे ४ वा. या खेड्याला वेढा घातला व मोहीम फत्ते केली. ही मोहीम यशस्वी ठरल्याची माहिती पोलीस महासंचालक एस. पी. वाईद यांनी दिली. या मोहीमेदरम्यान आपले दोन जवान शहीद झाल्याचेही ते म्हणाले.
घटनास्थळी राष्ट्रीय रायफल्सची कुमक दाखल झाल्यानंतर ४ वा. प्रत्यक्ष मोहीमेस प्रारंभ झाला. दहशतवादी एका शिंप्याच्या घरात लपल्याची माहिती मिळाल्याने त्या घरात सैनिक घुसले. मात्र सुरुवातीस तेथे कोणी सापडले नाही. मात्र थोड्या वेळाने पुन्हा तेथे झडती सुरू करण्यात आली व घरमालकाच्या मुलाला घराचा आणखी भाग दाखविण्यास सांगण्यात आले त्यावेळी एके ठिकाणी लपलेल्या दहशतवाद्यांनी सैनिकांवर हल्ला केला. त्याला प्रत्त्युत्तर देताना चार दहशतवाद्यांबरोबर घर मालकाचा मुलगाही ठार झाला असे सांगण्यात आले. दहशतवाद्यांपैकी अन्य तिघेजण जखमी स्थितीत पळून जाण्यात यशस्वी ठरले. घटनास्थळावरून चार बंदुका ताब्यात घेण्यात आल्या.
यावेळी लान्स नाईक रघुवीर सिंग (उत्तराखंड) व लान्स नाईक भंडोरिया गोपाल (अहमदाबाद) हे शहीद झाले. सुमारे तीन तास चाललेल्या धुमश्‍चक्रीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे मुदास्सिर अहमद तंत्रय, वकील अहमद ठोकर (लष्करे तैयबा) आणि फारूक अहमद भट्ट व महंमद युनिस लोने (हिजबुल मुजाहिदीन) अशी आहेत. यापैकी तंत्रय हा २०१४ पासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय होता. ठोकर हा गेल्या सप्टेंबरमध्ये एलईटीत दाखल झाला
होता.
पळून गेलेल्या तिघाजणांचा शोध चालू असल्याचे सांगण्यात आले. या मोहिमेनंतर कुलगाममध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला. निदर्शक मोठ्या संख्येने जमले व त्यांनी सैनिक व सुरक्षा दलांच्या जवानांवर दगडफेक सुरू केली. परिणामी सैनिकांना गोळीबार करावा लागला. त्यात १५ नागरीक जखमी झाले.
दरम्यान दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जीतेंद्र सिंग यांनी भारतीय भूमीवरील हा दहशतवाद पाकिस्तान पुरस्कृत असल्याचा आरोप पत्रकारांशी बोलताना केला. कठीण परिस्थितीत सैनिकांनी बजावलेल्या कर्तृत्वाची त्यांनी प्रशंसा केली.