शेळवण येथे नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत

0
103

बेतकाटो, शेळवण येथील हितेश हनुमंत नाईक (१४) या नववीत शिकणार्‍या मुलाचा नदीत बुडून दुर्दैवी अंत झाला.

हितेश हा कुडचडे येथील सर्वोदया हायस्कुलात शिकत होता. गुरुवार दि. ९ रोजी संध्याकाळी ४ वा. ही दुर्घटना घडली.
शिकवणी चुकवून १२ ते १५ वयोगटातील काही मुले येथील जुवारीच्या उपनदीवर आंघोळीसाठी गेली होती. सर्व मुले पाण्यात उतरली. पण हितेशने थेट पाण्यात उडी मारली व त्यानंतर तो वर आलाच नाही. त्याच्या बरोबर असलेल्या किर्तीकेश याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण पाय गाळात रुतल्याने तो पुढे सरकू शकला नाही.
अर्ध्या तासानंतर किर्तीकेश याचे वडील तिथे पोचले व त्यांनी मुलांना शिकवणी चुकवून नदीवर आंघोळ करण्यासाठी आल्याबद्दल दटावले. वडिलांच्या भीतीने मुलांनी तेथून पळ काढला. पण घाबरून हितेश बुडाल्याचे कोणीही सांगितले नाही. त्यानंतर साडेसहाच्या सुमारास याची कल्पना त्यांनी घरच्यांना दिली. अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर रात्री आठ वाजता शोधमोहीम सुरू झाली. पण रात्री बारापर्यंत हितेशचा थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर कुडचडे पोलीस स्थानकात तक्रार नोंद करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पण रात्रीच्या काळोखात शोध लागला नाही.
काल शुक्रवारी (ता. १०) सकाळी ७ वा. हितेशचा मृतदेह सापडला. उडी मारल्यानंतर दगडाला आपटल्याने त्याला थोडे खरचटले होते. मात्र, हितेशचा मृत्यू हा बुडूनच झाल्याचे शवचिकित्सा अहवालात स्पष्ट झाले आहे असे कुडचडे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अरुण एंड्रो यांनी सांगितले. निरीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.

हितेशचा वाढदिन
साजरा झालाच नाही!
हितेशचा येत्या मंगळवारी वाढदिवस होता व त्याला कपडे आणण्यासाठी त्याची आई बाजारात गेली होती. त्यावेळी तो आपले बांधकाम सुरू असलेले घर शिंपत होता. त्यावेळी त्याच्या मित्रांनी त्याला बोलावून नदीवर नेल्याचे सांगण्यात येते. तो शिंपणी करत असलेल्या जागी नसल्याने त्याच्या वडीलांनी त्याला शोधण्याचा प्रयत्नही केला होता. दुर्दैवी हितेशच्या मागे एक लहान भाऊ आहे.