विद्यार्थी-वाचकांचे आधारस्तंभ ‘डिचोली तालुका ग्रंथालय’

0
353

देवेश कुसुमाकर कडकडे (आतील पेठ-डिचोली)

आज सगळीकडे वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठीची धडपड किंवा सगळ्याच व्यवस्था, उद्योगाच्या शाखा फोफावत असताना वाचकसुद्धा एक ग्राहक म्हणून सामावून घ्यायला प्रशस्त जागेसाठी इथे कोणीही पुढाकार घेतला नाही… ही शोकांतिका आहे. हे ग्रंथालय विद्यार्थी-वाचकांचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्यासाठी नावीन्यपूर्ण, दर्जेदार, अधिक सक्षम आणि किफायतशीर जागा उपलब्ध करून देणे ही निश्‍चितच जिव्हाळ्याची बाब आहे!!!

डिचोली शहराला इतिहासासोबत कला, संस्कृती, क्रीडा आणि समृद्ध लोकजीवनाचा रसरशीत ठेवा लाभला आहे. डिचोलीचे छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे समस्त क्रीडाविश्‍वाचे वैभव असून ते आता नव्या साजश्रुंगाराने नटून थटून जनतेच्या सेवेस येत आहे. ही बाब समस्त डिचोलीवासियांसाठी भूषणावह आहे. मात्र डिचोलीचे सरकारी तालुका ग्रंथालय ही वाचनसंस्कृतीशी जोडलेली अग्रगण्य संस्था असूनही त्यासाठी सुसज्ज अशी जागा उपलब्ध झाली नाही, ही खेदजनक बाब आहे.
समृद्ध ग्रंथालये ही छोट्या-मोठ्या गावाचे एक अंग असते. त्या भागाचा सांस्कृतिक चेहरा त्यातून प्रतिबिंबित होत असतो. डिचोली शहरात सध्या नूतन वाचनालय आणि सरकारी तालुका ग्रंथालय अशी दोनच ग्रंथालये आहेत. डिचोली नगरपालिकेचे वाचनालय हे वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांपुरतेच मर्यादित आहे. शतकोत्तर वर्षाची परंपरा असलेल्या नूतन वाचनालयाने डिचोलीच्या वाचन संस्कृतीचा वारसा समृद्ध केला आहे. आज थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने आणि वाचकांच्या उदंड प्रेमाने मोठ्या जिद्दीने संस्थेचा कायापालट केला आहे. बोर्डे-डिचोली येथील अशोक वाचनालय आणि बाफ या फुटबॉल क्लबचे वाचनालये अस्तित्वात होती, ती कालांतराने बंद पडली.

माझे वाचन-प्रेम

गोव्यात मी अनेक ग्रंथालये पाहिली आहेत. विद्यार्थिदशेत असताना ग्रंथालयात जाण्याची सवय अंगवळणी पडल्यामुळे ग्रंथालय हा माझा सदैव औत्सुक्याचा विषय बनला आहे. त्या कुतूहलाने मी आज अनेक ग्रंथालये पाहिली आहेत. ग्रंथालय पाहणे हा माझ्यासाठी एक आगळावेगळा आनंद असतो. त्यांच्या सान्निध्याने मनात आलेले अनेक नकारात्मक विचार निघून जातात. माझ्यासाठी ‘वाचाल तर वाचाल’ हा केवळ सुविचार नसून तो मूलमंत्र आहे. मला ग्रंथांच्या सहवासात जास्त आरामदायी वाटते. आय नो ओन्ली वन कल्चर… रीडिंग कल्चर!! कुटुंबाची पार्श्‍वभूमी, सभोवतालची राजकीय-सांस्कृतिक परिस्थिती यांमुळे माझी वाचनप्रीयता पुढे अधिक वृद्धिंगत होत गेली. हे वाचनाचे आत्यंतिक प्रेम म्हणजे मित्र मंडळींना माझी मस्करी करण्यास मिळालेले एक हत्यारच आहे. जरी यातून एककल्लीपणा निर्माण झाला तरीही त्यातून श्रद्धा डोळस आणि चिकित्सक बनण्यास मदत झाली. इतरांबद्दलचा दुराग्रह कमी झाला. एकूणच या वाचनाच्या संस्कारामुळे आयुष्य सुखावह बनले आहे.

तालुका ग्रंथालयाची वाटचाल…

१५ फेब्रुवारी १९८४ रोजी डिचोली तालुका ग्रंथालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्या दिवसापासून या ग्रंथालयाने फार मोठी झेप घेतली आहे. ही ३३ वर्षांची वाटचाल केवळ वाचन संस्कृतीच्या चळवळीची नव्हे तर डिचोलीच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जीवनाचा, त्याच्या जडणघडणीचा अविभाज्य भाग आहे. सरकारी प्राथमिक शाळेच्या इमारतीच्या दोन वर्गखोल्यांमध्ये या ग्रंथालयाचा पसारा पसरला आहे. संपूर्ण गोव्यात प्राथमिक शाळेची एकमेव दोन मजली भव्य अशी ही इमारत असून ती आता नव्या स्वरूपात साकारत आहे. तिची पायाभरणी नुकतीच झाली आहे. तिथेच ग्रंथालयाला सुसज्ज जागा देण्याचे संबंधितांनी मान्य केले आहे. मात्र ही इमारत पाडल्यानंतर पर्यायी जागेसाठी अजूनही प्रश्‍नचिन्ह आहे.
बालपणीच्या शाळेची इमारत आणि कळत्या वयापासून मनमंदिराच्या गाभार्‍यात आरूढ झालेल्या या ग्रंथालयाविषयी लिहावं असं कुणाला वाटणार नाही?? ग्रंथालयाच्या वाचनसंस्कृतीच्या पटलावरच्या बदलत्या रंगांचा एक साक्षीदार या नात्याने ही वाटचाल शब्दबद्ध करावी या उद्देशाने हा लेखन प्रपंच!!
इथे तालुक्याच्या काना-कोपर्‍यातून वाचक येत असतात. ‘दिवसेंदिवस वाचकांची संख्या रोडावते आहे…’ असा जो काही सूर ऐकू येतो, तो इथे तकलादू वाटतो. इथे वाचकांची सदैव वर्दळ असते. या ग्रंथालयाने वाचन-संस्कृतीच्या क्षेत्रामधील चैतन्य टिकवले आहे. एवढेच नव्हे तर ते वृद्धिंगत होत आहे. इथे केवळ जाणता वाचक वर्ग येतो असे नाही तर निबंध लिहिण्यासाठी, संदर्भ शोधणारे, अभ्यास करणारे विद्यार्थीही भेटतील. तसेच वाचनाबरोबर टिपण, लेखन करणारेही भेटतील. इथे तुम्हाला ग्रंथांसोबतच नितांत सुंदर अविस्मरणीय असा अनुभवही मिळतो… केवळ तशी दृष्टी हवी.

ग्रंथपाल कसा असावा?

सरकारी कार्यालय आणि तत्पर सेवा… तसेच परिपूर्ण सहकार्य ही फारच दुर्मीळ गोष्ट आहे, किंबहुना असे एखादेच उदाहरण देता येईल, ते म्हणजे सरकारी ग्रंथालये. अन्य सरकारी कार्यालयापेक्षाही इथे वेगळे विश्‍व असते. कोणत्याही नजरेने ते सरकारी वाटत नाही. इथे स्वतःच्या मर्यादेत राहूनच आणि नियमांचे काटेकोर पालन करूनच तत्पर आणि परिपूर्ण सेवा दिली जाते. त्यामुळे सेंट्रल लायब्ररी आणि त्यांनी विणलेल्या जाळ्याविषयी वाचकांमध्ये प्रचंड कुतूहल आहे.
सेंट्रल लायब्ररी म्हणजेच कृष्णदास श्यामा ग्रंथालय हे वाचन संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि प्रसारासाठी कार्यरत असलेली एक संस्था आहे. ‘गाव तिथे ग्रंथालय’ या हेतूने तालुका, पंचायत पातळीवरील ग्रंथालयांमधून ही वाचन चळवळ गोव्याच्या तळागाळामध्ये पोहोचलेली आहे. १९९४ साली गोवा विधानसभेत ग्रंथालय विधेयक संमत झाले आणि २००४ सालापासून ग्रंथालयाची सामाजिक उपयुक्तता ओळखून कर्मचार्‍यांच्या संख्येत आणि अनुदानात वाढ झाली आणि खर्‍या अर्थाने ग्रंथालये बहरू लागली. १९८९ साली मी या डिचोली ग्रंथालयाचा १० रुपये शुल्क भरून सभासद झालो, त्यावेळी अश्रफुद्दीन शेख हे ग्रंथपाल ग्रंथालयाचा कारभार पाहत होते. हे एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व. ते पूर्वाश्रमीचे शिक्षक असल्यामुळे आणि मुळातच वाचनाची आवड यामुळे त्यांनी एकट्याने मोठ्या हातोटीने कार्यभार सांभाळला. दांडगा लोकसंपर्क आणि उत्साही स्वभावाने त्यांनी अनेकांना सभासद केले. सुरवातीला आम्हा मुलांना कपाटातील पुस्तकांचा खजिना बघून यातलं कोणतं पुस्तक निवडावं, असा प्रश्न पडायचा. त्यामुळे पुस्तके धुंडाळताना चाळत राहण्याच्या सवयीमुळे कधी कधी त्यांच्याकडून प्रेमळ दमही मिळत असे.
त्यांच्यानंतर थळी मॅडम, बेहरे मॅडम यांनीही एकछत्री कारभार सांभाळून आपला अनुभव आणि मनमिळाऊ प्रतिमेच्या आधारे चिरस्थायी स्वरूपाचे कार्य केले. ते वाचकांच्या अजूनही स्मरणात आहे. ग्रंथपाल कसा असावा… याचे ठसठशीत उदाहरण. अगत्य, बोलघेेवडेपणा आणि वाचकांना का हवे ते ओळखण्याची क्षमता आणि त्यासाठी करावी लागणारी धडपड यामुळेच त्यांनी केलेले कार्य चिरस्थायी स्वरूपाचे ठरले. सुरवातीला वाचक आणि सभासदांची संख्या संथ गतीने वाढत होती. त्यात नंतर नेत्रदीपक अशी वाढ होत गेली. याचे श्रेय निश्चितच त्यांना द्यावे लागेल. हीच कार्यक्षमतेची परंपरा पुढे विजय पावसकर, सौ. दीप्ती सावंत मयेकर यांनी निष्ठेने पार पाडली आणि आता विद्यमान ग्रंथपाल सौ. लक्ष्मी पुराणिक आपल्या ३० वर्षांच्या अनुभवाच्या शिदोरीवर ही परंपरा पुढे चालवत सहकार्‍यांच्या साथीने कारभारात त्यांनी सुसूत्रता आणली. समृद्ध ग्रंथालये जशी वाचकांच्या हृदयासारखी असतात तसाच कार्यक्षम ग्रंथपाल हा ग्रंथालयाचा प्रमुख घटक असतो. ग्रंथालयाचे सर्व कर्मचारी कर्तव्यभावनेने सेवा देतात. खास करून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळते. त्याचेच फलित म्हणून काही वर्षांत इथे शाळकरी मुलांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
सध्या इथे सर्वसामान्य वाचकांना परवडेल असे फक्त ५० रुपये शुल्क भरून ग्रंथालयाचा आजीवन सदस्य बनता येते. सध्या ग्रंथालयात २३९० सभासदांची नोंदणी झाली आहे. रोज ४०-५० वाचकांना ग्रंथ वितरित केले जातात. तसेच वाचन-कक्षाला दररोज ६०-७० वाचक भेट देत असतात. हा वाचनकक्ष सदैव वाचकांनी बहरलेला असतो. इथे १२ मराठी, ६ इंग्रजी, १ कोंकणी, १ हिंदी वर्तमानपत्रे आहेत. तसेच या चारही भाषेची वृत्तपत्रे, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, त्रैमासिके आहेत. ग्रंथांची संख्या २० हजाराहून अधिक आहे. रोजगार पत्रिका, कार्यालयीन गॅझेट्‌स, मराठी-कोंकणी-हिंदी-इंग्रजी भाषांमधील कादंबर्‍या, कथासंग्रह, काव्यसंग्रह, नाटकं, एकांकिका, प्रवासवर्णनं, ललित, चरित्र, आत्मचरित्रं, ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक, वैचारिक, वास्तुशास्त्रविषयक, पर्यटन, ज्योतिष, आरोग्य, पाककला, संगीत, राजकीय, क्रीडा, विविध खंड, संदर्भ ग्रंथ, ज्ञानकोश, विश्‍वकोश, भारतीय संस्कृती कोश, शब्दकोश, कायदेविषयक ग्रंथ आणि स्पर्धात्मक परीक्षार्थींना मार्गदर्शक असे विविध भाषांचे ग्रंथ उपलब्ध आहेत.
वाचकांच्या तत्पर सोयीसाठी वर्तमानपत्रातील सरकारी नोकरभरतीच्या जाहिरातींच्या कात्रणांची धारिका (फाईल) आणि मुलांच्या संदर्भासाठी विविध विषयांवरील माहितीची विशेष धारिका, खास वेगळी ठेवलेली आहे.
विविध ग्रंथपालांशी सतत संबंध आल्यामुळे ग्रंथपाल आणि ग्रंथालय याविषयीच्या आगळ्यावेगळ्या विश्‍वाचा उलगडा झाला. बहुतेक जणांचा समज ग्रंथपाल हा केवळ पुस्तकं वितरित करणारा असा असतो. ग्रंथपाल या पदाचे पदवीधर शिक्षण किंवा अभ्यासक्रमाचा पदवीधर असावा लागतो. ग्रंथपालाचा मूळ पिंड वाचकाचा असावा लागतो. पुस्तकांवर प्रेम, सर्वांशी मिळून-मिसळून वागण्याची वृत्ती, वाचकांबद्दल आपुलकी, सहनशीलता, कामाची जबाबदारी पेलण्याची कुवत या बाबी महत्त्वाच्या असतात. ग्रंथपाल आपल्या माध्यमातून समाजाला घडवीत असतो. वाचकांना पुस्तकांकडे आकर्षित करणे हाच ग्रंथपालाच्या कलेचा मूलभूत पाया असून वाचकांच्या जाणिवेची भाषा नीट समजून घेतल्याशिवाय परिपूर्ण ग्रंथपाल होऊच शकत नाही. शालेय विद्यार्थी जेव्हा एखादी माहिती मागेल तेव्हा त्यांना ती कोणत्या ग्रंथात सापडेल, ग्रंथ कसा शोधावा, त्यातून माहिती कशी शोधावी… याबाबत मार्गदर्शन करावे लागते. त्याचबरोबर माहिती उपलब्ध नसेल तर कोणत्या ग्रंथालयातून मिळेल याची माहिती देणे अथवा ती स्वतः पुरविणे या सर्व बाबी इथे कटाक्षाने पाळल्या जातात. त्यामुळे विद्यार्थी मोठ्या संख्येने इथे येतात.. असे इथल्या ग्रंथपालांनी सांगितले. उत्कृष्ट संदर्भ सेवेमुळे विद्यार्थी आणि ग्रंथपाल यांच्यात नाते दृढ होण्यास मदत होऊन आदर निर्माण होतो. या नोकरीपेशाला विधायक कामाची जोड दिली तरच हे शक्य आहे.
आजच्या बदलत्या वाचनसंस्कृतीचा वेध घेत ग्रंथालयाने आपल्या कारभारात बदल केला. नव्या पिढीची नाळ वाचन संस्कृतीशी जोडण्यासाठी अनेक उपक्रम राबविले गेले. बालदिनाचे औचित्य साधून मुलांच्या माध्यमातून नवीन वाचक तयार करण्यासाठी, त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा, तर्क बांधता यावा, बुद्धीला चालना मिळावी म्हणून सेंट्रल लायब्ररीच्या संयुक्त विद्यमाने ‘यो यो वाचूया’ सारखे बहुचर्चित उपक्रम राबविले. दिवाळी अंक प्रदर्शन हा तर ग्रंथालयाचा सोहळा असतो. दिवाळी अंक घ्यायला वाचकांची झुंबड उडते. २०१४ साली ग्रंथालयाचा त्रिदशकपूर्ती सोहळा विविध कार्यक्रमांनिशी… लौकिकाला साजेल अशाच दणक्यात साजरा केला होता. यावेळी समुद्रविज्ञान संस्थेचे माजी ग्रंथपाल गजानन सायनेकर यांचे तालुक्यातील सर्व ग्रंथपाल तसेच वाचकांना मोलाचे मार्गदर्शन लाभले होते. तसेच ग्रंथालयाच्या प्रथम सभासद दिवंगत डॉ. सौ. सुनंदा कोटकर आणि वाचक भिकाजी दत्तोबा गावकर यांचा विशेष सत्कार केला होता. यावेळी डिचोलीचे तत्कालीन आमदार नरेश सावळ आणि प्रमुख वक्ते नवप्रभाचे माजी संपादक सुरेश वाळवे यांनी ग्रंथालयाच्या आजवरच्या कार्यपद्धतीबद्दल गौरवोद्गार काढून पोचपावती दिली होती. जागतिक पुस्तकदिन, जागतिक वाचकदिन या दिवशी ग्रंथप्रदर्शन भरविले जातात ज्यामुळे ग्रंथाबद्दलची माहिती वाचकांपर्यंत पोहचते. ग्रंथपालदिनासारखे कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते साजरे होतात.
सेंट्रल लायब्ररीच्या अधिकार कक्षेत या ग्रंथालयाचा कारभार चालत असल्यामुळे वाचकांच्या साहित्याविषयीच्या विविध सूचना स्वीकारून तेथील व्यवस्थापनाकडे पाठविले जातात. सेंट्रल लायब्ररीचे समन्वयक कार्लुस फर्नांडिस यांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि पूर्ण सहकार्य लाभते. सेंट्रल लायब्ररीचे विश्‍व अधिकाधिक अर्थपूर्ण आणि सुदृढ करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते.

प्रशस्त जागा उपलब्ध व्हावी!

ग्रंथालय शास्त्राचे जनक रंगनाथन यांनी ग्रंथालयाची व्याख्या – वर्धिष्णू संस्था अशी केली आहे. बघता बघता डिचोली तालुका ग्रंथालयाचा विस्तार होत गेला मात्र तो या दोन वर्गांच्याच खोल्यांमध्ये! आज जगात विविध ज्ञानशाखांचा उदय होत असल्यामुळे अनेक उत्तमोत्तम ग्रंथांचा सेंट्रल लायब्ररीकडून पुरवठा होत असतो. वाचकांनी देणगी स्वरूपात दिलेले ग्रंथही स्वीकारले जातात. असे वैविध्यपूर्ण ग्रंथांचे दर्शन घडविण्याच्या दृष्टीने त्याची विषयानुरूप मांडणी करण्यासाठी ही जागा अपुरी आहे. त्यासाठी प्रशस्त जागा, उत्तम फर्निचर, संगणकीकृत तत्पर सेवा या सुविधा पुरविणे काळाची गरज आहे. वाचन कक्ष, देवाण-घेवाण विभाग, ग्रंथबांधणी कक्ष, ग्रंथ संस्कार कक्ष तसेच प्रकल्प, गटचर्चा यासाठी संदर्भ ग्रंथ, अवांतर वाचन अनिवार्य असल्यामुळे मुलांची कायम गर्दी असते. विद्यार्थ्यांचा नैसर्गिक कल जाणून त्याचा विचार करून त्याला पोषक असे साहित्य देण्यासाठी वेगळ्या बालकक्षाची आवश्यकता आहे. कारण मुलांना एकदा चांगले साहित्य वाचण्याचे व्यसन लागले तर ते न सुटणारे असून त्यात दिवसेंदिवस वाढ होते. अनेक वाचकांना अथवा विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील माहिती संग्रहित ठेवायची असते. त्यासाठी झेरॉक्स मशीन, स्कॅनर उपलब्ध असेल तर वाचकांचा वेळ आणि श्रम वाचतात. परंतु जागेच्या कमतरतेमुळे या सुविधा देणे अशक्य आहे.
ग्रंथालये ही केवळ वाचन आणि ग्रंथ देवाणघेवाण करण्याचे साधन या दृष्टिकोनातून न पाहता एक शैक्षणिक, संस्कृतीच्या अनुषंगाने विचार व्हायला हवा. कोणतीही माहिती हवी?… नेटवर शोधा यापेक्षा ग्रंथालयात मिळेल… हे उत्तर महत्त्वाचे आहे. डिचोलीचे हे ज्ञानमंदिर जागेअभावी ग्रंथ आणि वाचकांच्या दाटीवाटीने संकोचलेले आहे. आज सगळीकडे वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठीची धडपड किंवा सगळ्याच व्यवस्था, उद्योगाच्या शाखा फोफावत असताना वाचकसुद्धा एक ग्राहक म्हणून सामावून घ्यायला प्रशस्त जागेसाठी इथे कोणीही पुढाकार घेतला नाही… ही शोकांतिका आहे. हे ग्रंथालय विद्यार्थी-वाचकांचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्यासाठी नावीन्यपूर्ण, दर्जेदार, अधिक सक्षम आणि किफायतशीर जागा उपलब्ध करून देणे ही निश्‍चितच जिव्हाळ्याची बाब आहे!!!