उतावळे नवरे

0
106

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अद्याप महिनाभर अवकाश असला, तरी विविध राजकीय पक्षांनी सत्तेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे पाहावयास मिळते. मुख्यमंत्रिपदाच्या विविध दावेदारांनी तर त्यासाठी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. या निवडणुकीत बहुतेक मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढती झाल्याने मतांच्या कापाकापीमुळे कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही असे ढोल काही राजकीय निरीक्षक पिटत असल्याने आपल्या आगामी व्यूहरचना करण्यात राजकीय नेते दंग झालेले दिसतात. मुख्यमंत्रिपदासाठी सर्वांत आतुर दिसतो तो मगो पक्ष. सरकार कोणाचेही येवो, पण मुख्यमंत्री आमचाच असायला हवा असे मगोच्या महाभागांनी सरळ सांगून टाकले आहे. गेल्या काही निवडणुकांनंतर मगोची भूमिका उगवत्या सूर्याला दंडवत घालण्याचीच राहिली. आधी कॉंग्रेसची सत्तासोबत केली आणि नंतर भाजपाची. परंतु गोव्याच्या स्थैर्यासाठी तसे करणे भाग पडल्याचा आव मगो नेते आणत आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपासोबत सत्तेत सामील होऊन ऊठसूट टीका चालवली आहे आणि ‘मग तुम्ही सत्तेत सामील का झालात?’ या प्रश्नावर महाराष्ट्राला स्थैर्य देण्यासाठीची ती गरज होती! असे सेना नेते सांगतात, तसलाच हा प्रकार आहे. ज्याच्यापाशी मताधिक्य असेल, त्यांच्यासोबत मगो जाईल हे आताच स्पष्ट झाले आहे. मग आजवर सोबत चालणार्‍या गोवा सुरक्षा मंचाचे काय? गोवा सुरक्षा मंचही कॉंग्रेस किंवा भाजपाला मगोसमवेत सोबत करणार आहे काय? गोवा सुरक्षा मंचाची एकंदर भूमिका ही ‘मी तर मरेनच, पण तुलाही रंडकी करीन’ या म्हणीसारखी आहे. भाजपाचा पराभव हा एकमेव नकारात्मक कृतिकार्यक्रम घेऊन गोवा सुरक्षा मंच या निवडणुकीत वावरला आहे. त्यामुळे राजकीय अस्थैर्य निर्माण झाले तर त्याची जबाबदारी गोसुमंलाही घ्यावी लागेल. दुसरीकडे, कॉंग्रेसचे मनोबल बरेच वाढलेले दिसते. निकालाचे कोणतेही स्पष्ट चित्र समोर नसताना प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरोंनी स्वतःच्या मुख्यमंत्रिपदाचे घोडे पुढे दामटवायला सुरूवात केलेली आहे. प्रतापसिंह राणे आणि दिगंबर कामत हे दोन दिग्गज व्यस्त असताना आमदारांची बैठक घेण्यामागील फालेरोंचे इरादे स्पष्ट दिसतात. कॉंग्रेसला स्वबळावर रिंगणात उतरवण्याची कल्पना काही झाले तरी त्यांची होती. त्यामुळे यदाकदाचित विजय मिळाला तर यशाचे श्रेय त्यांच्याकडेच चालून येणार आहे. त्या दृष्टीने त्यांनी ही तयारी चालवली आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला अजूनही स्पष्ट बहुमताची आशा आहे, पण तिथेही मुख्यमंत्रिपदासाठी मनोहर पर्रीकर यांची दावेदारी धोरणीपणाने पुढे करण्यात आलेली आहे. स्वबळावर सत्ता आली तर ठीक, परंतु जर स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर मगोसाठी बंद केलेली दारे पुन्हा उघडली जाणार आहेत का, याचे उत्तर भाजपा नेत्यांनी द्यायला हवे. ती उघडावी लागली तर अर्थात मगोच्या मागणीनुसार मनोहर पर्रीकर हा दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा दुवा असेल, कारण पार्सेकरांच्या मुख्यमंत्रिपदाविषयी नापसंती व्यक्त करूनच मगोने भाजपाची साथ सोडली होती. एकंदरीत उतावळ्या नवर्‍यांच्या या गोतावळ्याकडे हताशपणे पाहण्याखेरीज गोमंतकीय मतदाराच्या हाती आता काही उरलेले नाही. गोव्याची सारी भिस्त आहे ती मतदाराच्या कौलावर. पेराल ते उगवते म्हणतात त्याप्रमाणे मतदारांनी जसा कौल मतदानयंत्रातून दिलेला असेल, तसेच सरकार पदरी पडणार आहे. त्यामुळे जे काही समोर येईल त्याबाबत उसासे सोडण्याला आता अर्थ नसेल. निवडणुकीचा निकाल काहीही येवो, तो जर कोणत्याही एका पक्षाच्या बाजूने आला नाही, तर तत्त्वशून्य हातमिळवण्या आणि स्वार्थी तडजोडींचे एक नवे पर्व गोव्यात पाहायला मिळेल असे दिसते.