आंधळेपणाने कोणालाही पाठिंबा नाही ः गोवा फॉरवर्ड

0
103

गोवा फॉरवर्ड पार्टीचे तीन उमेदवार विजयी होणार असून सरकार स्थापनेसाठी जर कुणी आमच्याकडे पाठिंबा मागितला तर आम्ही आंधळेपणे कुणालाही पाठिंबा देणार नसून जे कोण गोवा, गोमंतकीय व गोमंतकीय संस्कृतीच्या भल्यासाठी काम करण्याचे वचन देतील, त्यांनाच पाठिंबा देणार असल्याचे गोवा फॉरवर्डचे प्रमुख प्रवक्ते प्रशांत नाईक यांनी काल सांगितले. सत्ता मिळावी यासाठी आम्ही उगाच कुणालाही पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फातोर्डा, साळगाव व शिवोली या मतदारसंघांत पक्षाचा विजय निश्‍चित आहे. फातोर्ड्यात गोवा फॉरवर्डला ३ हजारांचे मताधिक्य मिळेल. साळगाव मध्ये २५०० ते ३ हजारांचे मताधिक्य मिळेल, तर शिवोलीत तब्बल ४ हजारांचे मताधिक्य मिळणार असल्याचा दावा प्रशांत नाईक यांनी केला. शिवोलीत दयानंद मांद्रेकर यांच्या विरोधात मोठी लाट होती. त्या लाटेचा गोवा फॉरवर्डला फायदा झाल्याचे ११ मार्च रोजी दिसून येणार असल्याचे नाईक म्हणाले. शिवाय वेळ्ळीत पक्षाने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलेला असून तोही विजयी होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे ते म्हणाले.
पक्षाने आणखी जागा लढवायला हव्या होत्या असे आता वाटते आहे काय, असे विचारले असता आम्ही योग्य विचार करूनच कमी जागा लढवल्याचे ते म्हणाले. जास्त जागा लढवल्या असत्या तर त्या त्या मतदारसंघात जाऊन प्रचार करता आला नसता. त्यामुळे आम्ही कमी जागा लढवल्याचे नाईक म्हणाले