मतदान यंत्रे व व्हीव्हीपॅट्‌स बंदोबस्तात ‘स्ट्रॉंग रुम्स’मध्ये

0
102

उत्तर गोव्यातील १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये ४ फेब्रुवारी रोजी मतदान झाल्यानंतर या सर्व मतदारसंघांतील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट्‌स कांपाल येथील बाल भवन इमारतीत ‘स्ट्रॉंग रुम‘मध्ये ठेवण्यात आली आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तेथे त्रिस्तरीय कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती उत्तर गोवा जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी नीला मोहनन यांनी दिली.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे ठेवलेल्या ठिकाणी २४७ तास कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हा पहारा त्रिस्तरीय असून पहिल्या स्तरावर मतदान यंत्रे ठेवलेल्या कुलूपबंद खोलींच्या बाहेर केंद्रीय सुरक्षा दलाचा प्रत्येकी एक जवान सक्त पहारा देत आहे. दुसर्‍या स्तरावर इमारतीच्या मधल्या भागात आयआरबी पोलीस जवानांची एक तुकडी डोळ्यांत तेल घालून पहारा देत आहे. तर तिसर्‍या स्तरावर इमारती सभोवताली गोवा पोलीस पहारा देत असून त्यात एक पोलीस निरीक्षक, एक उपनिरीक्षक व ६ शिपाई आहेत.
प्रत्येक स्ट्रॉंग रुमच्या बाहेर तसेच व्हरांड्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून तिथे काय चालते ते मुख्य प्रवेशद्वारावर बसवण्यात आलेल्या स्क्रीनवर दिसते. उमेदवार तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना मुख्य गेटजवळ थांबण्याची मुभा असून त्यांच्यासाठी तिथे तंबू उभारण्यात आला आहे. स्ट्रॉंग रुम्सची सीसीटीव्ही फुटेजची दृश्ये दाखविणारी स्क्रीन मुख्य गेटजवळ लावण्यात आली आहे.