पर्रीकरांना केंद्रीय निवडणूक आयोगाची नव्याने नोटीस

0
92

>> आचारसंहितेचा भंग प्रकरण

निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने काल नव्याने नोटीस बजावली असून बुधवारी (दि. ९) संध्याकाळी ३ पर्यंत त्यांना उत्तर देण्याचा आदेश देण्यात आला आहे.
पहिल्या नोटिसीला उत्तर देताना आपल्या निवडणूक भाषणाचा कोकणीतून केलेला अनुवाद आयोगाने चुकीच्या पद्धतीने केल्याचे पर्रीकर यांनी म्हटले होते. आपण पैसे घेऊन मतदान करा असे वक्तव्य केले नव्हते. अनुवादात दोष असल्याचे पर्रीकर यांनी उत्तरात म्हटले होते. त्यांचा हा दावा फेटाळत केंद्रीय निवडणूक आयोगाने काल नव्याने नोटीस जारी केली.
गोव्यात विधानसभा निवडणुकीत प्रचार करताना सांताक्रुझ मतदारसंघातील चिंबल येथे २९ जानेवारी रोजी झालेल्या सभेतील पर्रीकर यांच्या भाषणाच्या ध्वनिफितीत कोणताही फेरफार करण्यात आला नसल्याचे काल पाठविलेल्या नोटिसीत केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.