अपचनातून ‘ग्रहणी’व्याधीकडे…

0
1490

डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

ग्रहणीचे रुग्ण बर्‍याच वेळा ‘क्रॉनिक स्टेजमध्येच’ डॉक्टरांकडे धाव घेतात. तत्पूर्वी अग्निमांद्यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. रात्री उशीरा झोपल्याने किंवा काल जड खाल्ल्याने अजीर्ण झाले असेल असे स्वतःच निदान करून, लक्षणांकडे दुर्लक्ष करून ग्रहणी या व्याधीला जन्माला घालतात. तेव्हा उचित वेळी पूर्वलक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

‘मलप्रवृत्ती काही दिवस बद्ध असते तर काही दिवस द्रव असते’, असे सूचक लक्षण घेऊन रुग्ण जेव्हा दवाखान्यात येतो तेव्हा समजावे त्याला ‘ग्रहणी’ हा रोग झाला आहे. आधुनिकदृष्ट्या ‘स्प्रू’ र्(ीिीीश) या व्याधीशी ग्रहणीचे साधर्म्य आढळते. अजीर्ण, अग्नीमांद्यातून निर्माण होणारा हा व्याधी आहे. म्हणजेच पर्यायाने आधुनिक जीवनशैलीचा किंवा बदललेल्या आहार-विहारातून उत्पन्न झालेला हा व्याधी होय.
ज्या व्याधीमध्ये ग्रहणी या अवयवाची विकृती होते, त्या व्याधीस ग्रहणी असेच म्हणतात. या व्याधीमध्ये ग्रहणी या अवयवाबरोबरच तेथील प्राकृत कर्मांचीही हानी होते.
आमाशयाच्या सुषीर स्नायूपासून पुढील उंडुकापर्यंतचा भाग म्हणजे ग्रहणी (स्मॉल इंटेस्टाइन). यालाच लघ्वंत्र, पच्यमानाशय किंवा अधोआमाशय असेही म्हणतात. ग्रहणी हे अग्नी व पाचक पित्ताचे प्रमुख स्थान होय. तसेच समान वायूचेही हे अधिष्ठान आहे. बाह्य सृष्टीतील घेतलेल्या आहाराचे अग्नीच्या सहाय्याने पचन करून त्याचे शरीरभावामध्ये रुपांतर करण्याचे कार्य प्रामुख्याने या अवयवात होत असते.
अपक्व आहाराचे ग्रहण करणे, योग्य पचन होईपर्यंत तो पदार्थ ग्रहणीतून पुढील अवयवात जाऊ न देणे, पचन झाल्यानंतर सारकिट्ट भागांचे विभाजन करणे, पक्व आहाररसांचे पोषण करणे आणि अपाचित असा भाग मलस्वरूपात पक्वाशयाकडे ढकलणे या सर्व क्रिया ग्रहणीकडून घडत असतात.
पाचक पित्त व समान वायू यांचेमुळेच ग्रहणीची प्राकृत कार्ये घडतात. अपक्व आहार शरीरात शोषला जाऊ नये यासाठी ग्रहणी दक्ष असते. ग्रहणीचं प्राकृत कर्म घडून आहाराचे सम्यक् पचन झाले तरच घेतलेल्या चतुर्विध, षड्‌रसात्मक आहारापासून शरीराच्या सर्वच घटकांचे पोषण होऊ शकते. म्हणूनच ग्रहणी हा अवयव अन्नाच्या मार्गामध्ये गाळण्याचे कार्य करीत असतो, असे म्हटले आहे. कोणत्याही कारणाने या अवयवाची दुष्टी झाली असता साहजिकच शरीर पोषणाचे कार्य मंदावते व ग्रहणी व्याधीची उत्पत्ती होते.
‘ग्रहणी’ या व्याधीची कारणे ः-
* ग्रहणीमध्ये अग्निमांद्य निर्माण होणे ही प्रमुख घटना आहे. म्हणूनच अग्निमांद्याच्या कारणानेच ग्रहणी रोग उत्पन्न होतो.
* भोजन योग्य वेळी न घेणे. प्रत्येकाच्याच शाळा-काम यांच्या वेळेनुसार भोजनाची वेळ आता बदललेली आहे. ‘भूक लागल्यावर जेवणे’.. हे सूत्र कालबाह्य होऊन ‘वेळ मिळेल तेव्हा जेवणे..’ असे झाले आहे. तेव्हा यावर आता नक्कीच विचार व्हायला हवा.
* अजीर्ण झाले असता पुन्हा भोजन घेणे, रात्री उशीरा जेवून उशीरा झोपणे हे सध्या नेहमीचेच झाले आहे. तेव्हा सकाळी शौचाला योग्य होत नाही. मग नाश्ता तसाच तोंडात कोंबून प्रत्येकजण आपली घराबाहेरील वाट पकडतात.
* विषम-असात्म्य असा आहार. हॉटेलिंग हा प्रकार वाढीस लागल्याने मांसाहारानंतर आईस्क्रीम किंवा फ्रूटसलाड खाणे… अशा विरुद्ध आहार-सेवनाचा जन्म झालेला आहे.
* अधिक मात्रेमध्ये आहार सेवन करणे, तेलकट, चटपटीत, जिभेला सुख देणार्‍या पदार्थांची सर्वांनाच चटक लागल्याने आहार हा प्रमाणापेक्षा जास्त खाल्ला जात आहे.
* देश-काल-ऋतू यामध्ये वैषम्य उत्पन्न होणे.
* मल-मूत्र आदी आधारणीय वेगाचे धारण करणे.
* मंदाग्नी असताना अहितकर आहाराचे सेवन चालूच ठेवणे.
* अतिसारासारखा व्याधी बरा झाल्यानंतरही अहितकर आहारसेवन तसेच चालू ठेवले तर त्यानेही ग्रहणी रोग होतो.
‘ग्रहणी’ व्याधीची सामान्य लक्षणे ः-
ः- अन्नपचनाचेच कार्य बिघडल्याने ग्रहणी रोगात खाल्लेल्या अन्नाचे पचन न होता ते अपक्वावस्थेत मलावाटे बाहेर पडते. मलप्रवृत्ती ही पातळ, दुर्गंधीयुक्त व सवेदना असते. ज्यावेळी अन्नाचे थोडेफार पचन होते त्यावेळी ती थोडीशी पक्व, किंचितशी बांधून होते. याकरिताच ग्रहणीच्या सामान्य लक्षणांमध्ये – ‘मुहुर्बद्धं मुहुर्द्रवं’ असे म्हटलेले आहे. मलप्रवृत्ती जेव्हा पक्व असते तेव्हा बद्ध व जेव्हा अपक्व, क्षारयुक्त असते तेव्हा ती द्रव, दुर्गंधित असते. घेतलेल्या आहाराची मात्रा, स्वरूप व अग्नीची त्यावेळची स्थिती यावर ही पक्व वा आम मलप्रवृत्ती अवलंबून असते.
ः- अवयवांची दुर्बलता हीसुद्धा या लक्षणाला कारणीभूत ठरते. अवयवाची दुर्बलता जितकी अधिक तितकी द्रव व बद्ध या स्थितीतील अंतर कालदृष्ट्या अगदी कमी होत जाते. जेव्हा ग्रहणी हा अवयव अत्यंत दुर्बल होतो त्यावेळेस केवळ द्रव-मल प्रवृत्तीच होते.
ः- ग्रहणी रोगात मलाचे वेग फार असत नाहीत. परंतु प्रत्येक वेळी मलाचे प्रमाण मात्र अधिक असते. मलाचे वेग जे येतात ते सकाळच्या वेळीच अधिक असतात. दुपारी व रात्री त्यामानाने मलाचे फारसे वेग येताना दिसत नाहीत. हे या रोगाचे वैशिष्ट्य समजता येईल.
ः- या रोगात अग्निमांद्य असल्याने तोंडाला रुची नसणे, डोळ्यांसमोर अंधेरी येणे, भ्रम, तोंडाला पाणी सुटणे, कडू-आंबट- आम वा लोहगंधी अशा ढेकरा येणे. उलटी होणे ही लक्षणेही अधूनमधून दिसायला लागतात.
ः- सर्व पचनक्रियाच बिघडल्याने आहाररस योग्य प्रकारे निर्माण होत नाही. साहजिकच शरीराच्या सर्वच घटकांची – सप्तधातूंची उत्पत्ती सुयोग्य अशी होऊच शकत नाही. त्यामुळेच अतिप्रमाणात दौर्बल्य, कार्श्य व वजन कमी होणे ही लक्षणेही निर्माण होतात.
ः- या सर्व लक्षणांबरोबर नाभीप्रदेशी दुखणे, तीव्र स्पर्शासहत्व व तोंड येणे ही लक्षणेही ग्रहणीच्या सर्व रुग्णांमध्ये आढळतात.
ः- व्याधी अधिक प्रमाणात वाढल्यास पायांना सूज येते.
ग्रहणी ः सामान्य चिकित्सा व विशेष उपचार
ग्रहणीमध्ये अग्नीमांद्य या महत्त्वाच्या घटकाचा विचार करून दीपन, पाचन अशी चिकित्सा करावी. यामध्ये ‘आमा’ची उत्पत्ती असल्याने मृदू अनुलोमक हरीतकी, आमलकी, त्रिफळा, आरग्वध यासारख्या द्रव्यांचा वापर करावा. अनुलोमनानंतर थोडासा ‘अग्नी दीप्त’ झाल्यावर दीपन, पाचन, ग्राही व ग्रहणी या अवयवाला बल देणारी औषधे वापरावीत. द्रव मलप्रवृत्ती आहे म्हणून स्तंभन द्रव्ये मात्र देऊ नयेत. अत्याधिक प्रमाणात पातळ शौचास सुरू झाल्यास फक्त स्तंभन औषधे द्यावीत यामध्ये अहिफेन, जायफळ, कापूर यांचे कल्प वापरावे.
ग्राही औषधांमध्ये सुंठ, नागरमोथा, शंखभस्म, कपर्दिका भस्म, विविध प्रकारचे पर्पटी कल्प व ताक हे विशेष कार्यकारी आहे. कपर्दिका भस्म ग्रहणी या अवयवावर विशेष कार्यकारी असल्याने कपर्दिकेचाच कल्प लोकनाथ रस हा ग्रहणी रोगात अत्यंत उपयोगी ठरतो.
* सर्वच पर्पटी कल्प हे ग्राही, दीपन, पाचन व ग्रहणी या अवयवांना बल देणारे असतात. रसपर्पटी, पंचामृत पर्पटी, लोहपर्पटी, सुवर्णपर्पटी अशा विविध पर्पटींचा उपयोग ग्रहणीतील वेगवेगळ्या अवस्थांनुसार करावा लागतो.
* जेव्हा दौर्बल्य व भारक्षय फारच असतो तेव्हा पंचामृत पर्पटी किंवा सुवर्णपर्प वापरणे अधिक फायद्याचे असते.
* जेव्हा रक्तक्षय होऊन पांडूता येते तेव्हा लोहपर्पटी.
* कफज ग्रहणीत ताम्र पर्पटी अधिक उपयुक्त ठरते.
* दीपन, पाचन, ग्राही व ग्रहणीला बल देणारे हे पर्पटी कल्प अन्य ग्राही औषधांबरोबर मिसळूनही वापरता येतात. पर्पटी कल्प, लोकनाथ रस व सुंठ हे मिश्रणही ग्रहणी रोगावरील उत्कृष्ट औषध आहे.
* अनुपानामध्ये तूप वापरल्यास पर्पटी कल्पाचे गुण अधिक पटीने वाढतात.
* ताकाचा उपयोग – ताक हे जरी आहार द्रव्यं असले तरी ग्रहणीच्या रुग्णांत त्याचा औषधांइतकाच कार्यभाग असतो. आणि म्हणूनच चिकित्सेचा विचार करताना औषधांइतकाच ताकाचा विचार महत्त्वाचा ठरतो. ताक हे उत्तम, दीपन, ग्राही व लघु गुणांचे आहे. सर्व प्रकारच्या विकृतींचा नाश हा ताकामुळे होतो. ताक हे मधुर विपाकी असल्याने पित्ताचा प्रकोप होत नाही. कषाय अनुरस, उष्ण, विकासी व रुक्ष असल्याने कफघ्न आहे. लोणी काढलेलं ताक हे रुक्ष व कफघ्न असते. मधुर व अम्ल गुणांचे ते वातघ्नही असते.
ग्रहणीच्या रूग्णास द्यावयाचे ताक हे ताजे, फार आंबट नसलेले पूर्ण विरजलेले असावे. असे हे ताक स्वतंत्रपणे औषध वा अन्न यासाठी वापरावे किंवा आहारात ज्वारी-बाजरीची भाकरीवगैरे बरोबर द्यावे.
ग्रहणी रोगातील पथ्यापथ्य ः
ग्रहणीतील आहार हा दीपन, पाचन करणारा व लघु असावा. तक्राहार हा आवश्यक आहे. अन्य आहारद्रव्यांपैकी मध, लोणी, मूग, शालिषाष्टिक, गायीचे बिनसायीचे दही, साळीच्या लाह्या विशेष पथ्यकर.
पचण्यास जड, कठीण व पिच्छील पदार्थ टाळावेत.
ग्रहणीचे रुग्ण बर्‍याच वेळा ‘क्रॉनिक स्टेजमध्येच’ डॉक्टरांकडे धाव घेतात. तत्पूर्वी अग्निमांद्यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. रात्री उशीरा झोपल्याने किंवा काल जड खाल्ल्याने अजीर्ण झाले असेल असे स्वतःच निदान करून, लक्षणांकडे दुर्लक्ष करून ग्रहणी या व्याधीला जन्माला घालतात. तेव्हा उचित वेळी पूर्वलक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या.