‘‘काळजी घ्या दातांची’’ हिरड्या व दातांच्या आरोग्यासाठी…

0
396

– डॉ. श्रुती दुकळे (पर्वरी)

लोकांचे दात खूप संवेदनशील (सेन्सिटिव्ह) असून त्यांना खूप थंड-गरम खाल्ल्यास दात शिणशिणतात. अशा लोकांसाठी ‘सॉफ्ट’ किंवा ‘सेन्सिटिव्ह’ टूथ ब्रश उपयोगी ठरतो. शक्यतो हार्ड ब्रश वापरणे टाळले पाहिजे. त्याने दातांना नुकसान होण्याची शक्यता असते. 

आपले दात सुंदर व निरोेगी असले तर चेहर्‍यावर वेगळेच तेज दिसून येते. त्याचबरोबर आपल्या व्यक्तिमत्वातही भर पडते. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच दातांचीही काळजी घेणे खूप आवश्यक आहे. सहसा लोक दातांची दुखणी, दातांचे त्रास यांच्याकडे दुर्लक्ष करतात. दातांचे महत्त्व लोकांना जाणवत नाही. पण शरीर निरोगी असण्यासाठी दातही निरोगी असणे तेवढेच गरजेचे आहे.
काही छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी आपण पाळल्या तर सहजपणे आपण आपले दात निरोेगी ठेवू शकतो.
* दिवसातून दोन वेळा- सकाळी आणि रात्री ब्रश करणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या जेवणा-खाण्यातील चिकट, गोड पदार्थ हे दातांमध्ये अडकतात. अशा जागी किटाणू हल्ला करून एक प्रकारचे ऍसिड (आम्ल) सोडतात. त्या ऍसिडमुळे दात हळूहळू कमजोर होऊन किडू लागतात. त्याचसाठी सकाळी व रात्री झोपण्याआधी दात ब्रश करणे खूप गरजेचे आहे. रात्री जेवणानंतर लगेच दात ब्रश करणे चुकीचे आहे. जेवणानंतर किमान अर्धा तास थांबून नंतर ब्रश करावे. याचे कारण म्हणजे सायट्रीक ऍसिड असलेले खाद्यपदार्थ तशीच फळे- संत्री, द्राक्षे, लिंबू ही जातांचे एनामेल कमजोर करतात, म्हणूनच असे पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच ब्रश केल्याने दातांचे एनॅमल नष्ट होऊ शकते. हे ऍसिड आपल्या लाळेसमवेत वाहून जाण्यास अर्धा तास तरी लागतो. त्यासाठी जेवणानंतर अर्धा तास थांबूनच ब्रश करावे.
आपण जे ब्रश वापरतो, त्यांच्या ब्रित्सल्सच्या डिझाईनप्रमाणे ब्रश ‘सॉफ्ट’, ‘मिडियम’ व ‘हार्ड’ असे तीन प्रकारचे असतात. ‘मिडियम’ प्रकारचा ब्रश सामान्यतः सगळ्या लोकांसाठी योग्य असतो.
लोकांचे दात खूप संवेदनशील (सेन्सिटिव्ह) असून त्यांना खूप थंड-गरम खाल्ल्यास दात शिणशिणतात. अशा लोकांसाठी ‘सॉफ्ट’ किंवा ‘सेन्सिटिव्ह’ टूथ ब्रश उपयोगी ठरतो. शक्यतो हार्ड ब्रश वापरणे टाळले पाहिजे. त्याने दातांना नुकसान होण्याची शक्यता असते.
आपण वापरतो त्या टूथपेस्टमध्ये ‘फ्लोराईड’ स्विकृत मर्यादित प्रमाण असले पाहिजे. ब्रशवर पेस्ट लावताना फक्त एका मटाराच्या आकारात पेस्ट लावणे पुरेसे आहे. ब्रश भरून पेस्ट लावणे चुकीचे आहे. आपण ब्रश करताना पुरेशी शक्ती लावून ब्रश करावे. अधिक जोर लावून ब्रश केल्यास दातांना हानी होते. ब्रश करण्याची योग्य टेक्निक जाणून ब्रश करावे. ब्रशिंगची बरोबर टेकनिक आपल्या डेन्टिस्टकडून शिकून घ्यावी.
* प्रत्येक आहारानंतर पाण्याने चूळ भरणे गरजेचे आहे. असे केल्यास दातांमध्ये अडकून राहिलेले खाद्यपदार्थ निघून बाहेर पडतात व दात किडण्याची शक्यता कमी होते.
* चिकट, गोड पदार्थ, चॉकलेट्‌स, जंक फूड, चिप्स वगैरे खाणे कमी करावे आणि ते खाल्ल्यास लगेच चूळ भरावी. असे पदार्थ दातांना चिकटून राहतात व दात किडतात. त्याचप्रमाणे सॉफ्ट ड्रिन्क्स प्यायल्याने आपले दात कमजोर होतात, म्हणून शक्यतो ती टाळावीत.
* कधी कधी जेवणातील चिकट पदार्थ दोन दातांच्या मध्ये अडकून राहतात. टूथ ब्रश वापरल्यासही ते साफ करणे अशक्य होते. अशा ठिकाणी आपण ‘डेन्टल फ्लॉस’ वापरले पाहिजे. डेन्टल फ्लॉस हे धाग्यासारखे दिसणारे पांढरे असते. वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉसेस बाजारात मिळतात. फ्लॉसचा वापर करण्याची पद्धत आपल्या डॉक्टरकडून शिकून घ्यावी व त्यांच्याच सल्ल्याने त्याचा वापर करावा.
* दात व हिरड्या निरोगी राखण्यासाठी (आणखी जास्त सुरक्षित ठेवण्यासाठी) आपण माऊथवॉश वापरू शकतो. माऊथ वॉशचा वापर केल्याने दातांचे किडणे कमी होण्याव्यतिरिक्त हिरड्या बळकट होतात. तसेच श्‍वासाची दुर्गंधीही कमी होण्यास मदत होते. आपल्या डेन्टिस्टच्या सल्ल्यानेच माऊथवॉशचा वापर करावा.
* सहा महिन्यातून एकदा आपल्या डॉक्टरकडे चेकअपसाठी जाणे खूप फायदेशीर ठरते. काही दातांच्या समस्या ज्या आपल्याला कळत नाहीत त्या आपल्या डेन्टिस्टला आढळून येतात. व त्यांचा योग्य वेळी योग्य तो उपचार ते सुचवतात.
आपण काहीही खाल्ल्यानंतर दातांवर त्या जेवणाचा एक थर जमतो. तो योग्य रितीने ब्रश करून साफ करता येतो, असे न केल्यास तो थर दातांवर साठून खडा (कॅलक्युलस) जमतो. खडा फक्त ब्रश करून काढता येत नाही. तो खूप घट्ट असून दातांना चिकटून राहतो. यासाठी आपण डेन्टिस्टकडे जाऊन डेन्टल टिथ क्लिनिंग (स्केलिंग) केले पाहिजे. नियमितपणे डेन्टल क्लिनिंग केल्यास दात व हिरड्या बळकट व निरोेगी राहतात. दातांभोवती खडा साठून राहिल्यास दातांना आधार देणार्‍या हाडाची पातळी खालावते व दात हलू लागतात. अखेरीस दात हलायला लागतात व गळून पडतात. तसेच हिरड्यांना संसर्ग होऊन हिरड्या सुजतात. कमजोर व फुसफुशीत होतात. यासाठी डेन्टल क्लिनिंग करून साचलेला खडा नियमितपणे साफ करून घेतला तर त्यामुळे होणारे नुकसान आपण टाळू शकतो.
* दात व हिरड्यांसोबतच आपली जिभसुद्धा स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे असते. आपल्या जिभेवर साचलेला पांढरा थर नियमितपणे टंग क्लिनर वापरून साफ केला पाहिजे. असे न केल्याने श्‍वासाची दुर्गंधी वाढते. तसेच जिभेचे संसर्ग होऊ शकतात.
म्हणूनच दात आणि हिरड्यांबाबतीत कसलीही समस्या आढळल्यास वेळ न घालवता आपण लगेच डेन्टिस्टचा सल्ला घेऊन त्याचे समाधान केले पाहिजे. कारण ‘‘उपचारांपेक्षा प्रतिबंध बरा’’- प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर… तशीच अजून एक म्हण आहे…
‘‘डेन्टल ट्रीटमेंट इज नॉट एक्स्पेन्सिव्ह बट निग्लेक्ट इज!’’