आणखी काय हवे?

0
124

गेला महिनाभर जिची रणधुमाळी चालली आहे, ती गोवा विधानसभेची निवडणूक आज होणार आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष विरुद्ध सर्व राजकीय पक्ष असा हा बहुरंगी सामना आहे. भाजपासाठी दिलासादायी बाब म्हणजे विरोधकांत एकजूट होऊ न शकल्याने प्रत्येकजण स्वतंत्रपणे रिंगणात उतरलेला आहे आणि त्यामुळे या निवडणुकीत मतविभाजनाला मोठा वाव राहणार आहे. गेली पाच वर्षे सक्षम विरोधकाची भूमिका बजावू न शकलेल्या कॉंग्रेसने निवडणूक जवळ येताच आपली सर्व शक्ती पणाला लावली आणि भाजपला तुल्यबळ जाहिरातयुद्ध छेडल्याचे यावेळी पाहायला मिळाले. मात्र, युतीची आणि आघाडीची बोलणी लांबवत समविचारी पक्षांना शेवटच्या क्षणी दूर लोटण्याचे कारण काय हे मात्र कॉंग्रेसचे श्रेष्ठीच जाणोत. सत्ताधारी भाजपाचा पाडाव हेच नकारात्मक उद्दिष्ट समोर ठेवून गोवा सुरक्षा मंचाचा घाट या निवडणुकीच्या तोंडावर घालण्यात आला. भाजपाला सत्तासोबत केलेल्या मगोने शेवटच्या क्षणी भाजपाची साथ सोडली आणि ‘किंग’ नाही तर ‘किंगमेकर’ बनण्याची स्वप्ने तो पाहू लागला आहे. या निवडणुकीत एक नवी राजकीय संस्कृती गोव्यात पाय रोवू पाहते आहे ती आहे आम आदमी पक्षाची. या मंडळींनी सोशल मीडियावर एवढा गदारोळ माजविला आहे की सांगता सोय नाही. हा फुगवलेला फुगा झेप घेणार की फुटणार तेही ही निवडणूक सांगणार आहे. गेल्या निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसशी युतीत राहिलेला, परंतु आपल्या संघटनात्मक बांधणीकडे दुर्लक्ष केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही या निवडणुकीत पुनरागमन करण्याची धडपड चालवली आहे. प्रादेशिक पक्षांचा सुळसुळाट हे या निवडणुकीचे एक वैशिष्ट्य म्हणता येईल. गोवा फॉरवर्ड, गोवा विकास पक्ष, युनायटेड गोवन्स, गोवा सुराज याबरोबरच नीज गोंयकार, बहुजन मुक्ती वगैरे वगैरे नवी मंडळीही रणात उतरलेली आहेत. अपक्षांची संख्या गेल्या निवडणुकीपेक्षा कमी असली, तरीही बर्‍यापैकी मोठी आहे आणि या मतकाप्यांचा परिणाम अन्य उमेदवारांवर कितपत होतो हे पाहावे लागणार आहे. या निवडणुकीत भाजपाचा भर गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासावर व राजकीय स्थैर्यावर आहे, तर कॉंग्रेसने भाजपाच्या विविध प्रश्नांवरील यू टर्नला प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनवलेले आहे. आम आदमी पक्षाने सरकारच्या योजना दामदुप्पट करण्याचे आमीष मतदारांना दाखवले आहे. गेले वर्षभर गाजणारे माध्यम प्रश्नासारखे काही विषय एव्हाना पिछाडीवर गेले, तर काही नवे ऐरणीवर आले. मतदारांना चक्रावून टाकतील एवढे विकल्प आज प्रत्येक मतदारसंघामध्ये रिंगणात उभे आहेत. या बहुरंगी लढतींची परिणती काय होणार, कोण कोणाची मते खाणार याच्या अटकळी बांधण्यात राजकीय निरीक्षक दंग असले, तरी सामान्य जनतेला हवे आहे ते एक स्थिर, कार्यक्षम सरकार. अल्पमतातले सरकार असेल तर मुजोरी आणि गुर्मी डोके वर काढू शकत नाही हे जरी खरे असले, तरी त्यातून निर्माण होणार्‍या अस्थैर्याचे चटके नव्वदच्या दशकात गोव्याने पुरेपूर सोसले आहेत. तत्त्वहीनांच्या निलाजर्‍या मिठ्या आणि बघता बघता पाठीत खुपसले गेलेले खंजीर याचे ते विदारक चित्र गोव्याच्या भूमीमध्ये पुन्हा निर्माण होऊ नये अशीच मतदाराची इच्छा आहे. सामान्यजनांना हवा आहे त्यांच्या रोजच्या जगण्याला मदतीचा हात. त्याच्या अपेक्षा काही फार मोठ्या नसतात. मूलभूत गरजांची पूर्तता, महागाईच्या चटक्यांपासून संरक्षण आणि समाधानी जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले शांत, सौहार्दपूर्ण वातावरण एवढीच त्याची अपेक्षा असते. या निवडणुकीतील मंथनाअंती राज्यात कोणीही सत्तेवर येवो, सत्तारूढ होणार्‍यांनी जनसामान्यांच्या या अपेक्षांचे भान ठेवले तरी पुरे!