कडेकोट सुरक्षेत मतदानयंत्रे ठिकठिकाणी रवाना

0
63

आज होणार्‍या मतदानासाठी सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून राज्यांच्या सीमांवरच नव्हे, तर सर्व प्रमुख मार्गांवर वाहनांची तपासणी केली जात आहे. काही मतदारसंघांमध्ये अटीतटीच्या लढतींमुळे तणावाची स्थिती असली तरी परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे सांगण्यात आले.

फातोर्ड्यात परस्परविरोधी तक्रारी
मडगाव ः फातोर्डा मतदारसंघात गोवा फॉरवर्डचे उमेदवार विजय सरदेसाई यांची बदनामी करणारी पुस्तिका व सीडीचे वाटप काही जण करीत असल्याची कुणकुण पक्षाच्या कार्यकर्त्यांना लागताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी संबंधित तरुणांना ताब्यात घेतले. दुसरीकडे, दवंदे येथे कॉंग्रेसचे उमेदवार जोसेफ सिल्वा यांना शिवीगाळ केल्याची तक्रार कॉंग्रेसच्या वतीने नोंदवण्यात आली.
पर्वरीत कडेकोट सुरक्षा
पर्वरी ः संवेदनशील गणल्या गेलेल्या पर्वरी मतदारसंघामध्ये कडेकोड सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून अधीक्षक उमेश गावकर, उपअधीक्षक सेराफिन डायस व निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र गस्त घालण्यात येत आहे. मतदारसंघात सर्वत्र बंदूकधारी जवान दृष्टीस पडत आहेत. काही भागांना तर लष्करी छावण्यांचे स्वरूप आले आहे.
काणकोणमध्ये जय्यत तयारी
काणकोण ः काणकोण मतदारसंघात निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली असून मतदारसंघातील ५६ मतदान केंद्रांवर तैनात केलेले सर्व सरकारी कर्मचारी व मतदानयंत्रे काल दुपारीच रवाना झाल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी केदार नाईक यांनी दिली. अठरा बालरथ आणि तीन बसगाड्यांचा वापर त्यासाठी करण्यात आला. काही व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालयात फोन करून अमूक ठिकाणी पैसे वाटले जात असल्याच्या तक्रारी करू लागल्याने त्यांची गंभीर दखल घेतानाच बोगस फोन करणार्‍या व्यक्तींना दम देण्यात आल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. काणकोण मतदारसंघात सहा पंचायती व एक पालिका मिळून ३३,२३६ मतदार आज आपला लोकप्रतिनिधी निवडणार आहेत. काणकोणमध्ये १६,८१८ महिला मतदार आहेत.
फोंडा तालुका मतदानास सज्ज
फोंडा ः फोंडा तालुक्यातील १७२ मतदान केंद्रे निवडणुकीसाठी सज्ज झाली असून निवडणुकीची सामुग्री घेऊन अधिकारीवर्ग सर्व मतदान केंद्रांवर कालच दाखल झाले आहेत. कुर्टी येथील क्रीडा प्रकल्पाच्या आवारात काल सकाळपासून निवडणूक अधिकारी व पोलिसांची गर्दी उसळली होती. बालरथांमधून कर्मचार्‍यांना मतदानकेंद्रांवर पोहोचवण्यात आले. शिरोडा मतदारसंघात ४५, फोंडा मतदारसंघात ४३, प्रियोळमध्ये ४४ व मडकईत ४० मतदान केंद्रे आहेत. फोंड्याबरोबरच वाळपई व सावर्डे मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर देखील फोंड्यातून कर्मचार्‍यांची व्यवस्था करण्यात आली.
पेडण्यात निवडणूक सामुग्रीचे वाटप
पेडणे ः पेडणे तालुक्यातील पेडणे व मांद्रे या दोन मतदारसंघांतील ९४ मतदान केंद्रांवरील मतदानयंत्रांचे वितरण काल तालुक्याचे निवडणूक अधिकारी हरीश अडकोणकर यांनी सुमारे सहाशे कर्मचार्‍यांना केले. या दोन्ही मतदारसंघांच्या निरीक्षक कविता सिंग याही यावेळी उपस्थित होत्या. पेडणे तालुक्यात ९४ मतदान केंद्रे आहेत. तालुक्यात एकही मतदानकेंद्र संवेदनशील जाहीर करावे लागलेले नाही. प्रत्येक मतदान केंद्रात सहा कर्मचारी, दोन पोलीस शिपाई असून भरारी पथके अधूनमधून पाहणी करीत आहेत. यंदा पेडणे तालुक्यातील मतदान सामुग्रीच्या वितरणाचा कार्यक्रम आयटीआय पेडणे येथे खास उभारलेल्या शामियान्यात करण्यात आला. यावेळी पेडण्याचे मामलेदार इशांत सावंत, अमालिया पिंटो आदी हजर होते.
डिचोलीत मतदार सज्ज
डिचोली ः डिचोली तालुक्यातील डिचोली, मये व साखळी या तीन मतदारसंघांमध्ये मतदार मतदानासाठी सज्ज झाले आहेत. निवडणूक शांततापूर्ण वातावरणात व्हावी यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. डिचोली तालुक्यातील तिन्ही मतदारसंघांत मिळून ७९ हजार २६७ मतदार आहेत. सर्वत्र कडेकोट सुरक्षा असली तरी वातावरण शांततापूर्ण आहे.
सत्तरीत अटीतटीच्या लढती
वाळपई ः सत्तरी तालुक्यात अटीतटीच्या लढतींची अपेक्षा आहे. यावेळी प्रथमच काही उमेदवारांना मतदारांच्या घरापर्यंत जावे लागल्याने प्रत्यक्ष निवडणुकीबाबत चुरस निर्माण झाली आहे. सत्तरीतील मतदारसंघांचा विस्तार मोठा असल्याने काही उमेदवारांना रोज दहा किलोमीटरपेक्षा अधिक पायपीट करावी लागली.
केपे व कुडचड्यात बंदोबस्त
केपे ः केपे तालुक्यातील केपे व कुडचडे मतदारसंघातील सर्व मतदानकेंद्रे मतदानास सज्ज आहेत. केप्यात ४६ व कुडचड्यात ४१ मतदानकेंद्रे आहेत. केपे मतदारसंघासाठी एक पोलीस निरीक्षक, चार उपनिरीक्षक, एक सहायक पोलीस निरीक्षक, पाच हवालदार व ४१ शिपाई तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाचे २० जवान व ३५ गृहरक्षक अशी फौज तैनात आहे. कुडचड्यात १ निरीक्षक, ३ उपनिरीक्षक, १० हवालदार, ३१ शिपाई, १८ गृहरक्षक व राखीव पोलीस दलाचे ४८ जवान तैनात आहेत.