प्रचार संपला; उद्या मतदान

0
106

>> निवडणुकीची सर्व सज्जता

 

उद्या शनिवार दि. ४ फेब्रुवारी रोजी होणार्‍या गोवा विधानसभा निवडणुकीसाठीची सर्व सज्जता झाली असून जाहीर प्रचाराची मुदत काल संपुष्टात आली. आज शुक्रवारी दुपारपासून निवडणुकीची सामुग्री घेऊन निवडणूक अधिकार्‍यांना संबंधित मतदानकेंद्रांवर पाठविले जाईल. उद्या शनिवारी सकाळी सात ते संध्याकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे.
निवडणुकीसंदर्भात सुरू असलेल्या तयारीची माहिती उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. या निवडणुकीच्या प्रचारकाळात उत्तर गोव्यात दीड कोटी रुपयांची रोकड, तर पस्तीस हजार लीटर मद्य जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत एक कोटी ६६ लाख रुपयांची रोकड जप्त केली गेली असून पंचावन्न लाखांचे दागिने व घड्याळे जप्त करण्यात आली आहेत.
या निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले असून दिव्यांगांसाठी वेगळ्या मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघात एक मतदानकेंद्र पूर्णपणे महिलांतर्फेच हाताळले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
काल संध्याकाळपासून मद्यालये बंद करण्यात आली असून मतदान पूर्ण होईपर्यंत ती बंद राहील. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले. बुधवारी रात्री पर्वरी येथे टाकलेल्या एका छाप्यात पंधरा लाख रुपये जप्त करण्यात आले असून त्याची चौकशी चालू आहे, असे पत्रकार परिषदेस उपस्थित असलेले उत्तर गोवा पोलीस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी सांगितले. सर्व मतदानकेंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूक प्रचारकाळात उत्तर गोव्यात पस्तीस दखलपात्र, तर ३० अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २४ कंपन्या तैनात करण्यात आल्या असून राज्यात सर्वत्र प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. खर्चाची योग्य नोंद न ठेवणार्‍या ६४ उमेदवारांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती यावेळी मोहनन यांनी दिली.