नागालँडमध्ये सरकारी कार्यालयांची जाळपोळ

0
58

>> महिला आरक्षण आंदोलन चिघळले

 

नगरपालिका निवडणुकांसाठी महिलांना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी चाललेल्या आंदोलनाला मोठे हिंसक वळण लागले. आंदोलकांनी राजधानीत मोठ्या प्रमाणात जाळपोळ व लुटालूटही केली. हजारोंच्या संख्येने निदर्शकांनी राज्याच्या येथील सचिवालयावर चाल केली व नगरपालिका प्रशासनासह जिल्हाधिकारी इमारतींना आग लावली. अन्य सरकारी कार्यालयांचीही यावेळी मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर नव्या सचिवालय इमारत संकुलाला निमलष्करी जवानांनी घेरले आहे.
राज्यात गेल्या काही काळापासून हे आंदोलन चालले असून मंगळवारी दिमापूर येथील अशाच निदर्शनांवेळी पोलीस व आंदोलकां दरम्यानच्या धुमश्‍चक्रीत दोघेजण ठार तर दहाजण गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे दिमापूरमध्ये संचारबंदीही जारी करावी लागली होती.
कालच्या हिंसाचारानंतर प्रशासनाने अनिश्‍चित काळासाठी राज्यात मोबाईल इंटरनेट सेवा खंडीत केली आहे. एका महिन्यापासून राज्यात हे आंदोलन चालू आहे. महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याआधी नगरपालिका निवडणुका घेऊ नये अशी त्यांची मागणी आहे.