गोव्याला विशेष राज्य दर्जा कशाला हवा?

0
65

>> पर्रीकर ः भाजपला दोन तृतियांश बहुमत मिळेल

केंद्र सरकारने राज्याला भरभरून दिले आहे. त्यामुळे गोव्याला विशेष राज्य दर्जा कशाला हवा असे मत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकार परिषदेत व्यक्त केले. येत्या निवडणुकीत भाजपला दोन तृतीयांश बहुमत मिळेल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
येथील जमिनींच्या संरक्षणासाठी वेगळा कायदा करणे शक्य आहे. त्याचा नवे सरकार विचार करेल असेही त्यांनी सांगितले. मांडवी नदीतून कॅसिनो हटविण्याचे सरकारने ठरविले आहे. परंतु त्यासाठी पर्यायी जागा अद्याप मिळालेली नाही असे ते म्हणाले. सरकारच्या नेतृत्वाच्या बाबतीत पक्ष सांगेल ती जबाबदारी स्वीकारण्यास आपण तयार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीनंतर काही लोकांना सत्तेपासून बाहेर ठेवले पाहिजे, असे पर्रीकर यांनी मगोसंबंधी विचारलेल्या एका प्रश्‍नावर सांगितले. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांची सभा झाली. परंतु गोव्याला देण्यासाठी त्यांच्याकडे काहीही नव्हते.
कॉंग्रेस नेते सुटकेस
नेण्यासाठीच येथे येतात
दिल्लीतील कॉंग्रेस नेते सुटकेस घेऊन जाण्यासाठीच येथे येत असतात, असेही ते म्हणाले. गोमंतकीय जनतेला सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्थिर सरकार हवे. अस्थिरतेमुळे भ्रष्टाचारास अधिक वाव मिळतो, असे त्यांनी सांगितले.
संघाचा पाठिंबा भाजपालाच
पणजी मतदारसंघ हा प्रतिष्ठेचा मतदारसंघ असून संघ परिवाराचा भाजपलाच पाठिंबा आहे. सुभाष वेलिंगकर हे राजकीय पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या बाबतीत आपण भाष्य करीत नाही.
त्या तक्रारीवर निवडणूक
आयोग चौकशी करेल
केजरिवाल यांच्या धर्तीवरच आपल्याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार गेली आहे. त्यावर प्रतिक्रिया काय आहे असे विचारले असता, तक्रार असेल तर चौकशी करण्याचे काम आयोगाचे, आयोग चौकशी करेल. त्यावर आपण प्रतिक्रिया का देऊ असा प्रतीप्रश्‍न पर्रीकर यांनी केला.
आपण वारंवार गोव्यात येत असलो तरी संरक्षण खात्याचा कारभार सुरळीत चालतो. याबाबतीत कुणाची तक्रार आहे का, असाही प्रश्‍न पर्रीकर यांनी यासंदर्भातील प्रश्‍नावर केला.