भाजपाने गोव्यात भ्रष्टाचार वाढविला

0
99

>> म्हापशातील कॉंग्रेसच्या जाहीर सभेत राहुल गांधी यांचा आरोप

 

एक व्यक्ती किंवा एक संघटना राज्य चालवू शकत नाही; त्यासाठी युवक, महिला, पुरुषांना विधानसभेत घेऊन गेले पाहिजे. दुसर्‍याचे ऐकून घेण्याची पक्षाच्या नेत्यांमध्ये क्षमता असली पाहिजे. ती कॉंग्रेसमध्ये आहे, पण भारतीय जनता पक्षात नाही. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणाचेही ऐकून घेत नाहीत. त्यामुळे हा देश वाहत जात असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. भाजपने गोव्यात भ्रष्टाचार वाढविल्याचा आरोपही त्यांनी केला.
म्हापसा येथे श्री बोडगेश्‍वर देवस्थानच्या पटांगणात आयोजित करण्यात आलेल्या कॉंग्रेसच्या जाहीर सभेत राहुल गांधी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो. गोवा प्रभारी दिग्विजय सिंग, आमदार दिगंबर कामत, विरोधी पक्ष नेते प्रतापसिंह राणे, माजी मुख्यमंत्री रवी नाईक, खासदार शांताराम नाईक, माजी केंद्रीय मंत्री ऍड. रमाकांत खलप, सुभाष शिरोडकर, नीलकंठ हळर्णकर, शंभू भाऊ बांदेकर, माजी खासदार एदुआर्द फालेरो, माजी आमदार दयानंद सोपटे, मोती देसाई, के. सी. वेणू गोपाळ आदी उपस्थित होते.
पुढे राहुल गांधी म्हणाले की, गोव्यातील लोक शांत व मन मिळावू आहेत. त्यामुळे जगातील पर्यटक गोव्यात येतात. भाजपाने गोव्यात भ्रष्टाचार वाढविला. पाच वर्षापूर्वी त्यांनी सुशिक्षीत युवकांना नोकरी देण्याचे आमिषे दिली होती. पण ती पूर्ण करण्यास त्यांना अपयश आले. पंतप्रधान गोव्यात येतात आणि आम्ही राज्याचा विकास केला म्हणून सांगतात आणि खोटे बोलून जातात. गोव्याचा विकास करण्याची धमक फक्त कॉंग्रेस सरकारमध्येच आहे. आम्ही या निवडणुकीत सात नवे उमेदवार दिले असून ते सर्व युवक आहेत. हे करण्यामागे भ्रष्टाचार मुक्त सरकार गोव्याला देण्याची आमची धडपड असल्याचे ते म्हणाले. विरोधी नेते प्रतापसिंह राणे म्हणाले की, गोव्यातील जनता शिकलेली आहे. एकच पक्ष लोकांना पुढे घेऊन जाऊ शकतो आणि तो म्हणजे कॉंग्रेस पक्ष होय. भाजपने जनतेची पाच वर्षे फुकट घालविल्याची टिका त्यांनी केली. तर दिगंबर कामत म्हणाले की, भाजपने निवडणूकीपूर्वी ५० हजार नोकर्‍या देणार म्हणून आश्‍वासन दिले होते आणि आता म्हणतात १०वी वा त्याहून अधिक शिकलेल्यांना नोकर्‍या देणार असे सांगून युवकांची फसवणूक केली. आम्ही सत्तेवर आल्यावर त्यांची फसवणूक नाहीशी करण्यासाठी युवकांना नोकर्‍या देणार असे ते म्हणाले.
माजी मुख्यमंत्री रवी नाईक म्हणाले की, पुढील सरकार कॉंग्रेसचेच असणार आणि पंतप्रधान राहुल गांधी असतील. तसेच गोव्यात या विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेस सरकार सत्तेवर येणार. भाजपने बहुजन समाज संपविण्याचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधींच्या गळ्यात मोठा पुष्पहार घालून सर्व नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन एम्. के. शेख तर आभार बाबी बागकर यांनी मानले. या सभेला सुमारे आठ हजाराहून अधिक लोकांची उपस्थिती होती.