मृत्यूच्या जवळ नेणारे… तीन रिपू!

0
392

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

आहार-विहारातील योग्य बदल, साधे-सरळ राहणीमान, सकारात्मक जीवन आणि योग्य ती काळजी घेतल्यास हृदयविकार, फुफ्फुसांचे आजार व पक्षाघात यांसारख्या तीन रिपूंवर आपण नक्कीच विजय मिळवू शकतो.

जागतिकीकरण, वाढते औद्योगीकरण या सर्वांमुळे आपली जीवनशैली बदलत चालली आहे, हे तर सर्वांनाच ज्ञात आहे. या बदलत्या जीवनशैलीचे, प्रदूषणकारी वातावरणाचे परिणाम आरोग्यावर दिसू लागले आहेत. सध्या हृदयरोग, फुप्फुसाचे रोग, पक्षाघात, मूत्रपिंडाचे रोग, मधुमेह यांसारख्या असाध्य रोगांनी माणसाचे जीवन त्रस्त झाले आहे. वरीलपैकी कोणत्यातरी रोगाने मनुष्य मृत्युमुखी पडत आहे. वदललेला आहार, व्यायामाचा अभाव व तणावग्रस्त जीवन या कारणांनी असंख्य आजार निर्माण होत आहे. मुलांची निरागसता, स्वच्छंदीपणा, खोडकरपणा कधी पालकांनी हिरावून घेतले, त्यांचे त्यांनाच कळले नाही.
प्राचीन काळी जी मुलं शिक्षणात हुशार नसत ती स्वतःच्या आवडीनुसार काम निवडायची व तेच काम करत असत. कुठलाही कोर्स न करता, मेहनतीचे काम करूनही सदोदित आनंदी. आज पालकांनी मुलांना रेसमधील घोडा बनवला आहे… फक्त धावत सुटायचे. मुलं शिक्षणात, खेळात, नृत्यात, गायन-वादन, वक्तृत्व, स्पर्धात्मक परीक्षेत सगळ्यातच अव्वल पाहिजे. त्यासाठी हवे तेवढे पैसे मोजून विविध क्लासेस. हे हवे तेवढे पैसे कमवायला मग पालकही स्वतःची ओढाताण करून फक्त पैशांच्या मागे नोकरी-व्यवसाय करण्यामागे, स्वतःचे अस्तित्व, जीवन जगणेच विसरून जातात. पण पालकहो, अष्टपैलू गुण असलेले बालक एखादेच जन्माला येते, ते आपलेच असावे हा हट्ट कां?
घरात आई-वडील, आजी-आजोबा चांगले सुशिक्षित असतानादेखील वेळेअभावी मुलांना ‘संस्कार वर्गाला’ पाठवावे लागते. काय हे दुर्भाग्य! या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून आजची पिढी ऐन तारुण्यातच उच्च रक्तदाबसारख्या आजारांना बळी पडते आहे व त्यातूनच हृदयरोग व इतर रोगांची उत्पत्ती होत चालली आहे.
हृदयविकार, फुप्फुसांचा आजार व पक्षाघात या तीन आजारांचे प्रमाण आणि त्यामुळे होणारे मृत्यू यांचे प्रमाण वाढले आहे. आहारात योग्य तो बदल, व्यायाम व तणावरहित जीवन जगणं हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे. व्यायामामध्ये घाम येईपर्यंत खेळणे, चालणे, धावणे, योगासने व तणावरहित जीवनासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संतुष्ट किंवा आनंदी राहणे, यशाच्या मागे न धावता ध्यान-धारणा-प्राणायामाचा अवलंब स्वतःही करावा व मुलांनाही हे शिकवावे.

– हृदयविकार –

भारताबाबत विचार केल्यास कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकाराचा झटका येणे हे सामान्य कारण झाले आहे. आपल्या आजूबाजूस वजन व कोलेस्ट्रॉल वाढणार्‍यांचीच गर्दी होताना दिसत आहे. आपली जीवनशैली एकाच वेळी धावपळीची आणि एकाच जागी बसून तासन्‌तास काम करण्याची झालेली आहे. बैठ्या कामामुळे वजन वाढणे, मेदवृद्धी होणे, कोलेस्ट्रॉल वाढणे यांसारखे बदल शरीरात होतात.
आहाराच्या सवयीं – जंक फूड, एरिएटेड ड्रिन्क्स, अतितिखट, तळलेले, खारट, पाकीटबंद पदार्थ खाण्याकडे लोकांचा कल अधिक दिसतो. त्यामुळे हृदयविकारासारख्या आजारांना निमंत्रण मिळते.
व्यायामाचा अभाव – रोजच्या धावपळीमुळे व्यायामालाही वेळ नसतो, असे सांगणार्‍यांचे प्रमाण जास्त आहे.
व्यसनाधीनता – अति काम किंवा स्पर्धात्मक आव्हाने पेलताना दारू, सिगरेटचे प्रमाणही वाढत चालले आहे.
ताणतणाव – कामाच्या अतिरिक्त वेळा, कमी झोप, आराम व व्यायामाचा अभाव या सर्वांमुळे ताण वाढतो आहे. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे हृदयावर येणारा ताण. लहान वयातच हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे.

हृदयाच्या आरोग्यासाठी…

* पोषक षड्‌रस आहार सेवन. हृदयविकारात आहार हा द्रव, लघु व संतर्पण करणारा हवा. तांदळाची किंवा रव्याची खीर, द्राक्ष, दाडिम इत्यादीे फळांचे रस, लिंबू सरबत हे पथ्यकर आहेत. शालिलाष्टिक, मूग, यव, पडवळ, कारले हेही हृदयरोगात पथ्यकर द्रव्ये आहेत. त्याबरोबर आक्रोड, मासे ज्यामध्ये ओमेगा नावाचे फॅटी ऍसिड मुबलक प्रमाणात असते. तसेच तंतुमय पदार्थ, ई जीवनसत्व, फॉलिक ऍसिड हे घटक असतात. शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी उपयोग होतो.
तसेच सध्या ब्रोकोली ह्या परदेशी भाजीचा जास्त वापर होताना दिसतो. यात मुबलक प्रमाणात अँटीऑक्सीडन्टस् असल्याने हृदयाच्या आरोग्यासाठी हितकर आहे.
* नियमित आरोग्य तपासणी. आपला रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, हृदयाचे ठोके, रक्तातील साखर आणि बीएम्‌आय् यांची नियमित तपासणी करणे.
* वजनावर लक्ष. जसजसे आपले वय वाढत जाते तशी आपली चयापचय क्रिया मंदावते. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे चरबीत रुपांतर होऊन वजनात वाढ होते. वाढणार्‍या वजनाला अटकाव करण्यासाठी व हृदयासाठी योग्य आहार आणि भरपूर व्यायाम करावा.
* तणावाचे नियंत्रण. आपल्यावरील ताणाचे व्यवस्थापन करण्याची तंत्रे आपण शिकून घेतली पाहिजेत. जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. आपल्या आवडीच्या छंदासाठी आवर्जून वेळ काढावा.
* व्यायाम. पहिल्यापासूनच व्यायामाचे एक वेळापत्रक ठरवून घ्या. विविध प्रकारचे आणि प्रेरक व्यायाम करा.
वरील उपायांनी आपल्या हृदयाचे आरोग्य जपण्यास नक्कीच मदत होईल.
फुफ्फुसाचे आजार

आपल्याला जिवंत राहण्यासाठी निरंतर श्‍वास घ्यावा लागतो. त्यासाठी फुफ्फुसाच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे. अस्थमा, निमोनिया, फ्लू, फुफ्फुसाचा कर्करोग, क्षयरोग आदी दीर्घकालीन आजारांमुळे जगभरात कित्येक लोक मृत्युमुखी पडतात. गरीब आणि वयस्कर व्यक्तींमध्ये फुफ्फुसाचे रोग होण्याचे प्रमाण अधिक असते. ऑक्सीजनचा पुरवठा हा फुफ्फुसावर अवलंबून असतो. त्यामुळे फुफ्फुसाला मारक ठरणार्‍या गोष्टींचे सेवन केल्याने त्याचा थेट परिणाम फुफ्फुसावर होतो.
* वातावरणीय प्रदूषण. घरात आणि घराबाहेरही प्रदूषित हवा असल्याने फुफ्फुसावर त्याचा लगेच परिणाम होऊ शकतो. स्वयंपाकासाठी चुलीचा वापर, धूम्रपान, तंबाखू अशी व्यसने यामुळे फुफ्फुसाशी निगडित आजार होतात. या रोग्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. पण योग्य जीवनशैली ठेवली तर फुफ्फुसाला संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होईल.
फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी…
* धूम्रपान टाळावे. दीर्घकालीन धूम्रपानाच्या सवयीमुळे फुफ्फुसाला सूज येते किंवा फुफ्फुसाचा कर्करोग होतो. त्यामुळे सिगारेट ओढणे किंवा तंबाखूशी निगडित कोणतेही व्यसन असेल तर ताबडतोब बंद करावे.
* श्‍वसनाचे व्यायाम. फुफ्फुसाची ताकद वाढविण्यासाठी प्राणायामासारखे श्‍वसनाचे व्यायाम करावे. त्यामुळे फुफ्फुसे मजबूत होतात व त्यांची क्षमता वाढते.
* योग्य प्रमाणात पाणी प्यावे. पाण्यामुळे फुफ्फुसात ओलावा टिकून राहतो. तसेच विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत मिळते.
* ऋतुमानानुसार काळजी. अति थंड हवामानात अति थंड, आंबट, तुरट पदार्थांचे सेवन टाळावे. त्यामुळे फुफ्फुसावर सूज येऊ शकते.
* हवेच्या प्रदूषणापासून बचाव. धुळीच्या ठिकाणी किंवा अति प्रदूषणाच्या ठिकाणी जाणे टाळावेच. बाहेर जाताना मेडिकेटेड मास्कही लावावा.
* घराची स्वच्छता. वासाचा त्रास होत असल्यास एअरफ्रेशनरसारख्या गोष्टी टाळाव्यात. त्याशिवाय घरात हवा खेळती राहील याकडे लक्ष द्यावे. घरात धूळ साठू देऊ नये.
* पौष्टीक आहार. अँटीऑक्सीडन्टयुक्त खाद्य पदार्थ फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी हितकर असतात. उदा. कोबी, ब्रोकोली, फ्लॉवर, मनुका, द्राक्षे, अंजीर, लसूण, मध त्याचबरोबर जेष्ठमध व तुळशीसारखे औषधी द्रव्ये सर्व प्रकारच्या फुफ्फुसाच्या तक्रारींवर श्रेयस्कर आहे.
पक्षाघात किंवा पॅरालिसिस

हल्ली तरुण वयातही पक्षाघाताचे रुग्ण पहायला मिळत आहेत. पक्षाघातामुळे एक तर मृत्यू किंवा शरीर लुळे पडू शकते. जीवनशैलीतील बदल हे याचे प्रमुख कारण मानले जात आहे. मेंदूला होणारा रक्तपुरवठा कोणत्याही कारणाने खंडित होतो तेव्हा मेंदूतील पेशी मृत होतात. त्याचा परिणाम म्हणून मेंदूत गाठी होतात. काही वेळा रक्तस्राव होतो.
मधुमेही रुग्ण व उच्चरक्तदाब, अति स्थूल व्यक्तीचा पक्षाघाताला बळी पडण्याचे प्रमाण जास्त आहे.
काळजी कशी घ्याल?
पॅरालिसिस अथवा पक्षाघाताची प्राथमिक लक्षणे वाटल्यास ताबडतोब रुग्णालयात भरती करावे.
ज्यांना पक्षाघाताचा झटका आला आहे त्यांना पोषक आहाराची नितांत आवश्यकता असते. त्यामुळे मेंदूच्या ज्या नसांवर परिणाम झाला आहे त्या पूर्वस्थितीत येण्यास मदत होते. जीवनसत्वे सी, ई आणि ए असणारा तसेच अँटीऑक्सीडन्ट गुणधर्म असणारा असा योग्य आहार घ्यावा. तंतुमय पदार्थांचे सेवन करावे. ओमेगा ऍसिड असलेले मासे, आक्रोड, सोयाबीनसारखे पदार्थ खावे. त्याशिवाय गाजर, टोमॅटो, हिरव्या भाज्या यांचा आहारात समावेश करावा.
* सकारात्मक बदल घडवा. ताण येऊ देऊ नये म्हणून ध्यान-धारणा करा. धूम्रपान-दारुचे व्यसन टाळा. नियमित व्यायाम करणे सुरू करा. वजनावर नियंत्रण ठेवा. दीर्घकाळ गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन टाळावे. मीठाचे प्रमाण नियंत्रित ठेवावे. हृदयविकार व मधुमेही यांनी विशेष काळजी घ्यावी.
आहार-विहारातील योग्य बदल, साधे-सरळ राहणीमान, सकारात्मक जीवन आणि योग्य ती काळजी घेतल्यास हृदयविकार, फुफ्फुसांचे आजार व पक्षाघात यांसारख्या तीन रिपूंवर आपण नक्कीच विजय मिळवू शकतो.