सत्तेचा वापर राज्यहितासाठी करायचा असतो : पवार

0
124

पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्लीत बसून गोवा सुंदर दिसतो. मग खाण बंदीमुळे गोव्याचे वाटोळे झाले, पर्यटन क्षेत्राला उतरती कळा लागली, अनेक व्यवसाय बंद पडले त्याचा राज्यावर विपरीत परिणाम झाला ते मोदीजींना दिल्लीत बसून दिसले नाही का अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले.

साखळी येथील प्रचार सभेत पवारांनी सत्तेचा वापर राज्याच्या भल्यासाठी करायचा असतो. मात्र दैनंदिन जीवन उध्वस्त करण्यासाठी त्याचा वापर ज्यांनी केला त्या भाजपाला घरी बसवून राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांना साथ द्या असे आवाहन केले.
साखळीचे राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप गावस व यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पवारानी खाण व्यवसाय मनोहर पर्रीकरांनी बंद केला असा आरोप केला. केंद्रातील कॉंग्रेस नेत्यांनी त्याला साथ दिली. त्याचे भीषण परिणाम गोवा भोगत
आहे. साखळी मतदारसंघात सर्वाधिक खाणी असून खाण अवलंबितांवर मोठी आपत्ती आली आहे. त्यातून सावरण्यासाठी राष्ट्रवादीकडे कार्यक्रम असून राष्ट्रवादीला साथ देण्याचे आवाहन पवार यांनी केले.
मोदीजींनी नोट बंदी करून देशाची अर्थव्यवस्था कोडमडून टाकली. त्यामुळे देशभरात समस्या निर्माण झाल्या. लाखो लोक बेकार झाल्याचे ते म्हणाले.
गोवा सर्वांग सुंदर प्रदेश गोवा राज्य लहान असले तरी जगाला भुरळ घालणारे. सर्वधर्मसभाव जपणारे राज्य असून संस्कृती जतन करणारे आहे. गोव्याचे भवितव्य जपणार्‍या, राज्याच्या प्रश्‍नांची जाण असलेल्या उमेदवारांना निवडून द्या. खाण बंदी, नोट बंदी लादलेल्या भाजपाला सत्तेवरून खाली खेचण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
कष्टकर्‍यांचा जगण्याचा अधिकार भाजपाने हिरावून घेतलेला आहे. भाजपाची विचारधारा ही जनहिताची नसून गोव्यात सर्व भाषा संस्कृती जपणारे लोक आहेत, परंतु एकसंघ ठेवण्याची भाजपाची इच्छा नसल्याने भाषा व इतर प्रश्‍न उपस्थित झाल्याचे पवार म्हणाले.
यावेळी प्रफुल्ल पटेल, चित्रा वाघ, प्रताप गावस, अविनाश भोसले यांची भाषणे झाली.
उमेदवार प्रताप गावस म्हणाले, जनतेचा मोठा पाठिंबा आपल्याला असून कॉंग्रेसने आम्हाला डावलून परक्याला उमेदवारी देऊन निष्ठावंतावर अन्याय केला. त्यामुळे त्यांना पराभव ठरलेला आहे.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते मतदारसंघातील पंचायत सदस्य व कार्यकर्ते हजर होते. दिगंबर नाईक यानी स्वागत केले. सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते हजर होते.