केजरीवालांविरुध्द कारवाईचे निवडणूक आयोगाचे आदेश

0
51

आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील निवडणूक प्रचाराच्या जाहीर सभेत बोलताना मतदारांनी लाच स्वीकारण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गोव्यात एफआयआर नोंद करून योग्य कायदेशीर कारवाई करावी असा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने गोव्यातील निवडणूक अधिकार्‍यांना दिला आहे.

केजरीवाल यांच्यावर कोणती कारवाई केली त्याची माहिती ३१ जानेवारी रोजी दु. ३ पर्यंत देण्याचा आदेशही आयोगाने दिला आहे.
भारतीय दंड संविधान तसेच लोकप्रतिनिधी कायद्याखाली केजरीवाल यांच्या विरुध्द एफआयआर/तक्रार नोंदविण्यात यावी असे निर्देश निवडणूक आयोगाने काल या संदर्भात जारी केले.
उत्तर गोव्यात म्हापसा येथे ८ जानेवारी रोजी झालेल्या निवडणूक प्रचार सभेत केजरीवाल यानी ‘जे पक्ष तुम्हाला पैसे देतील त्यांच्याकडून पैसा घ्या, मात्र मते आम आदमी पक्षालाच द्या’ असे मतदारांना आवाहन केले होते. केजरीवालांच्या वरील वादग्रस्त वक्तव्यानंतर कॉंग्रेसच्या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक आयोगाने त्यांच्यावर नोटीस बजावली होती. त्याला केजरीवाल यांनी उत्तर देताना आपल्या सदर वक्तव्याचे समर्थन केले होते. त्याविषयी निवडणूक आयोगान असमाधान व्यक्त केले आहे.
केजरीवाल यांचे म्हणणे तथ्यहीन व असमर्थनीय असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने गोव्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना केजरीवाल यांच्याविरुध्द एफआयआर/तक्रार नोंद करण्याचे आदेश दिले आहेत.