योगसाधना २९२ योगमार्ग – राजयोग ईश्‍वरप्रणिधान – २३

0
116

– डॉ. सीताकांत घाणेकर

‘‘वैयक्तिक प्रतिज्ञा व निष्ठा यांच्यामुळे कार्याला हानी पोचत असेल तर कार्यरक्षणापुढे वैयक्तिक निष्ठा किंवा प्रतिष्ठेला मुळीच महत्त्व देऊ नका’’.
दुर्योधनासारख्या अहंकारी व्यक्तीला वाटत होते की तो सर्वज्ञानी व समर्थ आहे. कृष्णासारख्या गवळ्याच्या पोराच्या युक्तीच्या गोष्टी त्याला महायुद्धात काय कामाच्या?..

ईश्‍वर प्रणिधान – भगवंताला प्रेमाने, भावपूर्ण समर्पण. हा शब्दच एवढा गोंडस आहे की प्रत्येक भक्ताला त्यात अत्युच्च रस असायला हवा. आणि त्यातल्या त्यात योगसाधकाला तर परमानंद सहजरीत्या मिळायला हवा. अर्थात त्याची योगसाधना शास्त्रशुद्ध असणे अत्यावश्यक आहे.

आजकाल तथाकथित योगसाधक बहुतेक करून अष्टांगयोग ह्या योगमार्गातील – आसने, प्राणायाम, क्रिया करतात. काहीजण ‘ध्यान’ देखील करतात. पण ते ध्यान खरेच अपेक्षेप्रमाणे होते की नाही हा फार मोठा प्रश्‍न आहे. कारण फक्त कसले तरी आसन- पद्मासन, वज्रासन, सुखासन… करून डोळे मिटून राहणे म्हणजे ध्यान लागेलच असे नाही. त्या अवस्थेत संपूर्ण विचारहीनता असणे अत्यावश्यक आहे. म्हणून तर आपल्या पूर्वजांनी ‘बकध्यान’ ही अगदी योग्य उपमा दिली आहे- नदीत एका पायावर डोळे मिटून उभा राहणारा बगळा ध्यान करतो असे भासते. तरी त्याचे खरे लक्ष त्याच्या आजूबाजूच्या पाण्यात फिरणार्‍या मासळीवर असते. अगदी जलद गतीने चोच खाली मारून तो त्या माशाला अलगद उचलतो व गट्ट करून खाऊन टाकतो.
अर्थात- निसर्गानेच स्वतःहून बगळ्याला दिलेली ही कला आहे. कारण त्याचा उदरनिर्वाह त्याच्या ह्या कर्तृत्वशक्तीवरच अवलंबून असतो. नपेक्षा तो बिचारा पक्षी भुकेमुळे तडफडून मरून जाणार. पण योगसाधकाकडून शास्त्रशुद्ध ध्यान अपेक्षित आहे. तसे झाले तरच तो ध्यानाच्या सातव्या पायरीवरून ‘समाधी’ ह्या अत्त्युच्च व अत्यंत कठीण अशा पायरीवर पोहोचेल.
हे सर्व घडण्यासाठी काही गोष्टी अत्यावश्यक आहेत. त्या म्हणजे- योगाच्या सर्व मार्गांचा – ज्ञानयोग-भक्तियोग-कर्मयोग-राजयोग (अष्टांगयोग) व्यवस्थित अभ्यास व त्यानुसार साधना तसेच अष्टांग योगातील प्रथम दोन पायर्‍या – यम-नियम ह्यांचे पालन केल्याशिवाय मनुष्य जीवनाच्या ध्येयापर्यंत पोहोचायचा विचारच सोडून दिलेला बरा- आत्मा+परमात्मा मीलन!!
कदाचित ही गोष्ट माहीत नाही किंवा जमणार नाही म्हणूनच अनेकजण ‘योगसाधना’ हा शब्द न वापरता ‘मी योगाचे व्यायाम करतो’… असे म्हणतात. ज्या संस्थेमध्ये अशा पद्धतीने विविध तंत्रे शिकवतात त्यांना ‘योग व्यायामशाळा’ अशा नावाने संबोधतात.
आज विविध शैक्षणिक संस्थांमध्ये योग विषय शिकवतात. पण तिथे शारीरिक पैलूंचाच उपयोग करतात. मग योगसाधनेचा योग्य फायदा कसा होणार?
ध्यान व समाधीवस्थेमध्ये जाण्यासाठी अत्यंत उपयुक्त म्हणजे सर्व यम-नियम व मुख्यत्वे करून ‘ईश्‍वरप्रणिधान’ जेव्हा प्रेमपूर्वक घडते तेव्हा ते सहज होते. साधकाला अपूर्व आनंदाचा अनुभव नव्हे तर अनुभुती येते. अशा स्वानंदाची व आत्मानंदाची गोडी लागली की साधक कुठल्याही परिस्थितीत सुखशांतीचा अनुभव घेऊ शकतात.
अशा समर्पणासाठी अर्थातच त्याची ईश्‍वरावर अढळ श्रद्धा असायला हवी. म्हणूनच आपण या विषयावर विचार करताना भारतीय संस्कृतीला अत्यंत प्रिय अशा पूर्णपुरुषोत्तम – श्रीकृष्णावर चिंतन करीत आहोत.
श्रीकृष्णाचे जीवन व त्याचे सिद्धांत अमूल्य आहेत. आमच्यासारख्या सामान्यांना तर ते मूळ स्वरूपात समजणे किंवा त्यातील तत्त्वज्ञान ज्ञात होणे जवळजवळ अशक्यच आहे. तथाकथित ज्ञानी व तत्त्ववेत्ते ह्यांनादेखील वेगवेगळ्या समयी श्रीकृष्णाचे वागणे बरोबर समजले आहे की नाही ह्याबद्दल संशयच आहे. म्हणून ह्या महान पुरुषावर विविध आरोप केले जातात.
काही महापुरुष मात्र या विषयावर सखोल व अभ्यासपूर्ण चिंतन करतात. श्रीकृष्णाच्या जगावेगळ्या वागण्याचा अर्थ समजून घेतात. त्यांच्यावर अन्याय होऊ देत नाहीत. त्यापैकीच एक आधुनिक तत्त्ववेत्ते म्हणजे पू. पांडुरंगशास्त्री आठवले- वैश्‍विक स्वाध्याय परिवाराचे मार्गदर्शक व प्रेरणास्रोत.
शास्त्रीजी म्हणतात – * वैयक्तिक प्रतिज्ञा व निष्ठा यांच्यामुळे कार्याला हानी पोचत असेल तर कार्यरक्षणापुढे वैयक्तिक निष्ठा किंवा प्रतिष्ठेला मुळीच महत्त्व देऊ नका.
या संदर्भात ते अनेक सुंदर उदाहरणे देतात.
* कुरुक्षेत्रातील युद्धापूर्वी श्रीकृष्णाने वचन दिले होते की ते कुठल्याही शस्त्राचा युद्धात उपयोग करणार नाहीत. ते फक्त युक्तीच्या चार चांगल्या गोष्टी सांगतील. त्याचबरोबर ज्यावेळी अर्जुन व दुर्योधन त्याच्याकडे मदतीसाठी आले तेव्हा दोघांना काहीतरी द्यायला हवे म्हणून त्यांनी विचारले की तुम्हाला ‘मी’ हवा की ‘यादव (माझे) सैन्य’ हवे?
दुर्योधनासारख्या अहंकारी व्यक्तीला वाटत होते की तो सर्वज्ञानी व समर्थ आहे. कृष्णासारख्या गवळ्याच्या पोराच्या युक्तीच्या गोष्टी त्याला महायुद्धात काय कामाच्या?.. तसेच त्याचा गोड गैरसमज होता की युद्धामध्ये असलेल्या सैन्याच्या संख्याबळामुळे किंवा रथी-महारथींमुळे जय किंवा विजयश्री प्राप्त होत असते. त्याला कुठे माहीत होते की युद्धे जिंकण्यासाठी सत्य व धर्माचरण आवश्यक असते! म्हणून तो श्रीकृष्णाकडे सरळ यादव सेना मागतो व आनंदाने परत जातो. मूर्ख व्यक्ती अशाच असतात.
अगदी ह्याविरुद्ध अर्जुन आहे. त्याला श्रीकृष्णाचे सामर्थ्य माहीत होते. म्हणून त्याने श्रीकृष्णाला आपल्या पक्षात येण्याची विनंती केली. आणि त्याचे व पांडवांचे परम भाग्य म्हणून श्रीकृष्ण त्याच्या रथाचे सारथीच झाले. त्यामुळे युद्धाचा परिणाम सर्वज्ञात आहे.
आता मुख्य मुद्दा ‘न शस्त्र धरी मी करी’ ह्या वचनाचा. त्यासाठी कुरुक्षेत्रातील महायुद्धाचा थोडा आवश्यक असा आढावा घ्यायला हवा.
कौरव-पांडवांच्या दोन्ही पक्षांत रथी-महारथी होते. त्यातील कौरवांकडील अत्यंत महाप्रतापी म्हणजे भीष्म पितामह. योद्ध्यांची योग्यता बघितली तर कौरवांचा पक्ष प्रबळ होता. पण त्यांचा पक्ष अधर्माचा होता. त्याचवेळी पांडवांची मुख्य शक्ती होते श्रीकृष्ण. युद्धाची हवा दर दिवशी गरम होत होती. दुर्योधन विजयासाठी अधीर होत होता. त्याला वाटत होते की परशुराम शिष्य पराक्रमी भीष्म त्याला नक्की विजयाकडे नेतील. पण भीष्म कुणाही पांडवांचा वध करत नव्हते. त्याला तशी संयुक्तिक कारणेसुद्धा विविध होती. कुरुकुलाच्या गादीच्या रक्षणाच्या वचनात सापडलेल्या भीष्मांना माहीत होते की दुर्योधन दुष्ट व स्वार्थी आहे. त्याला नीतिमत्तेचे पालन करता येत नाही. त्याच्याकडून धर्माचरण होत नसे. तो म्हणायचासुद्धा…
* जानामि धर्मं न च मे प्रवृत्ति |
जानामि अधर्मं न च मे निवृत्ति ॥
पण एक दिवस रात्री शिबिरात भरलेल्या बैठकीत दुर्योधनाने पितामहांचा भयंकर अपमान केला. नको ते आरोप त्यांच्यावर केले. ते सहन न होऊन भीष्म भयंकर संतापले आणि त्यांनी प्रतिज्ञा केली की दुसर्‍या दिवशी युद्धात अर्जुन किंवा ते जिवंत राहतील. तसेच कृष्णाला प्रतिज्ञा मोडायला लावीन.
खरेच, दुसर्‍या दिवशी निकराचे युद्ध चालले होते. एका क्षणी भीष्म अर्जुनाचा वध करणारच होते… आणि तसे घडले असते तर अधर्माचा विजयच झाला असता… पण श्रीकृष्ण तर धर्मयुद्ध लढत होते. आपले सुदर्शन घेऊन ते भीष्मांच्या अंगावर त्यांचा वध करण्यासाठी धावून गेले. सर्वांना वाटले की आता श्रीकृष्ण भीष्मांचा नक्की वध करणार.
त्याचक्षणी भीष्मांनी आपले धनुष्य खाली ठेवले आणि ते म्हणाले –
* भक्तासाठी वचन आपुले प्रभू तू मोडियले… धन्य मजसि केले, धन्य मजसि केले!
या घटनेमध्ये अनेक गोष्टी समोर येतात.
१. प्रेमाने, आत्मियतेने समर्पित झालेल्या भक्तांचे (अर्जुन) रक्षण करायला ईश्‍वर बांधिल असतो. ते सुद्धा धर्मयुद्धात!
२. भीष्म वैयक्तिक प्रतिष्ठा सांभाळत होते. त्यामुळे अधर्माची बाजू असूनदेखील ती वरचढ दिसत होती. तर श्रीकृष्णांनी कार्याच्या रक्षणासाठी वैयक्तिक प्रतिष्ठा बाजूला ठेवली.
इथे मुख्य गोष्ट म्हणजे भीष्मदेखील श्रीकृष्णाला समर्पित होते. पण आम्हांला काय समजणार या दोन्ही महारथी, महापुरुषांची शक्ती? त्यासाठी हवा शास्त्रशुद्ध अभ्यास व साधना!