येणें वाग्यज्ञें तोषावें…

0
231

– डॉ. सोमनाथ कोमरपंत

पाच प्रज्ञावंतांची, आपल्या विचारसंपन्न वाणीने अपूर्व आनंदानुभव देणारी ही पाच व्याख्याने अंतर्मुख करणारी. कृतिप्रवण करणारी. गेल्या सोळा वर्षांतील ‘विचारवेध’ व्याख्यानमालेत अनेक नामवंतांच्या मांदियाळीने हे विचारपीठ समृद्ध केले, त्या गुणसंपन्न वारशात मौलिक भर टाकणारी. ‘गोमंत विद्या निकेतन’च्या या ‘विचारवेध’ व्याख्यानमालेत नुकत्याच झालेल्या व्याख्यानांचा हा संंक्षिप्त परामर्श…

साहित्य, कला, संगीत ही मानवी जीवनाच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण अंगे आहेत. प्रारंभी साहित्य मौखिक परंपरेने आले. कालान्तराने ते लिखित स्वरूपात सिद्ध झाले. शब्द, सूर आणि रंग-रेषा ही विविध कलाविष्काराची माध्यमे आहेत. त्यातूनच संस्कृती समृद्ध होत गेली. अनेक पूर्वसूरींनी शतकानुशतके विविध अंगांनी त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. खूप काही गवसले तरी हा शोध अपूर्णच राहिला. कारण ही प्रक्रिया अखंड आहे; निरंतर आहे. हा शोध स्वत्वाचा आणि सत्त्वाचा आहे.
इतिहासाच्या प्रवाहात अपघातामुळे राजकीयदृष्ट्या गोमंतभूमी आपल्या राष्ट्रापासून अलग राहिली. साडेचार शतके ती अखंडित प्रवाहापासून तुटली गेली. पण प्रतिकूल परिस्थितीत अनेक संस्थांनी आपली सांस्कृतिक परंपरा दुभंगू दिली नाही. या संस्थांमध्ये ‘गोमंत विद्या निकेतन’ ही संस्था अग्रगण्य राहिली. एकशे पाच वर्षांची तिला समृद्ध परंपरा लाभली. प्रज्ञा, प्रतिभा आणि परिश्रम यांच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीत तिने समर्पित भावनेने आणि निष्ठेने हे कार्य केले. नव्या पिढीसमोर हे पुनः पुन्हा अधोरेखित करायला हवे.
गोमंतकाच्या मुक्तीपूर्वी आणि मुक्तीनंतर अनेक संस्था समाजप्रबोधनाचे कार्य आपापल्या परीने करीत आलेल्या आहेत. ‘गोमंत विद्या निकेतन’च्या ‘विचारवेध’ व्याख्यानमाला आणि गोवा शासनाच्या कला व संस्कृती खात्याची डॉ. दामोदर कोसंबी व्याख्यानमाला यांची गोमंतकातील रसिक श्रोतेमंडळी प्रतीक्षा करीत असते. या वैचारिक अभिसरणामुळे विभिन्न क्षेत्रांत वावरणार्‍या मंडळीना नवी ऊर्जा मिळते. कार्यरत होण्याची नवी प्रेरणा मिळते.
या पार्श्‍वभूमीवर ‘गोमंत विद्या निकेतन’च्या ‘विचारवेध’ व्याख्यानमालेत नुकत्याच झालेल्या व्याख्यानांचा संंक्षेपाने परामर्श घ्यावासा वाटतो. या व्याख्यानमालेत पाच दिग्गजांनी जी व्याख्याने दिली ती रसिकांच्या कानामनाला तृप्त करणारी ठरली हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. त्यासाठी संस्थेचे अध्यक्ष जनार्दन वेर्लेकर आणि त्यांना सहकार्य करणारे उपाध्यक्ष सुहास नायक, सचिव सलिल कारे व कार्यकर्ते कारणीभूत ठरले.
यंदाच्या ‘विचारवेध’ व्याख्यानमालेचे उद्घाटन केले डॉ. उज्ज्वल निर्गुडकर यांनी. चित्रपटाच्या तंत्रज्ञानाची अद्ययावत माहिती असलेल्या डॉ. निर्गुडकरांनी ‘कै. दामोदर कृष्ण वेर्लेकर’ व्याख्यानमालेत ‘चित्रपट चमत्कारांची दुनिया’ या विषयावर उद्बोधक व्याख्यान दिले. डॉ. निर्गुडकर हे चित्रपट तंत्रज्ञान या विषयात अमेरिकेचे पेटंट मिळविणारे पहिले भारतीय. त्यांना आजमितीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. चित्रपटक्षेत्राचा इतिहास त्यांनी कथन केला. जगातील पहिला चित्रपट २८ डिसेंबर १८९५ रोजी पॅरिसमध्ये दाखविण्यात आला, तर भारतातील पहिला चित्रपट मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीसमोरील जागेत दाखविला. त्यांनी यावेळी चित्रपटनिर्मितीत क्रमाक्रमाने झालेल्या प्रगतीचा आलेख सचित्र सादर केला. त्यामुळे श्रोत्यांना त्या काळात त्यांनी नेले. ‘टायटॅनिक’ या प्रसिद्ध चित्रपटासंबंधीची उद्बोधक माहिती त्यांनी दिली. अमेरिकेतील हॉलिवूड परिसरात कार पार्किंगची जागा होती. तेथे या चित्रपटाचे चित्रिकरण करण्यात आले. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात आला. टायटॅनिक जहाजाचा आकार साधारणतः दोन ते तीन फूट इतका असावा; मात्र तंत्रज्ञानाच्या आधारे हा आकार मोठा करण्यात आला. त्यामुळे प्रेक्षकांना टायटॅनिक जहाज दुर्घटना समुद्रात घडल्यासारखी वाटते असे डॉ. निर्गुडकर यांनी सांगितले. त्रिमितियुक्त (थ्री डायमेन्शन) चित्रपटाचे रहस्यही त्यांनी उलगडून दाखविले. लहान मुले त्यामुळे कशी रमतात हेही त्यांनी नमूद केले. ‘स्पेशल इफेक्ट’ची माहिती देण्यासाठी त्यांनी काही व्हिडिओ प्रेक्षकांसमोर सादर केले. श्रोत्यांना त्यांनी अक्षरशः खिळवून ठेवले.
दुसरे व्याख्यान पत्रकार, कवी, साहित्यिक आणि विचारवंत विजय कुवळेकर यांनी दिले. ‘माणसाच्या मोठेपणाचा शोध’ या विषयावरील हे विचारप्रवर्तक भाषण दत्ता गोविंद पै रायतूरकर यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आले होते. वृत्तिगांभीर्य, नर्मविनोद आणि श्रुतयोजनकौशल्य यांच्या त्रिवेणी संगमामुळे…… रसिक श्रोत्यांना त्यांनी प्रभावित केले. विचारांची ही मैफल संपूच नये असे वाटत राहिले. व्यासंगाचे क्षितिज किती विस्तीर्ण असू शकते याचा प्रत्यय त्यांनी आणून दिला. पत्रकाराला जीवनाच्या सर्वांगांचे भान कसे असायला हवे याचा तो आदर्श वस्तुपाठ होता. ‘नर करणी जाय तो नर का नारायण हो जाय‘ हा त्यांच्या सम्यक चिंतनाचा केंद्रबिंदू होता. ज्ञानेंद्रियांची कवाडे सतत उघडी ठेवावीत असे त्यांनी आवाहन केले. आजच्या सांस्कृतिक अराजकाच्या आणि माणसांच्या आत्मकेंद्रित मनोवृत्तीच्या संदर्भात त्यांनी मांडलेले विचार मौलिक स्वरूपाचे होते. नियती व निसर्ग हा सदैव आपल्याला सर्वतोपरी मोठे करण्यासाठी उत्सुक असतो. आपण त्यासाठी ज्ञानेंद्रियांची कवाडे निरंतर उघडी ठेवणे आवश्यक आहे. आपल्या सभोवताली जे काही घडत असते, त्यातील अमृतकण आपल्याला टिपावे लागतात. माणसाचे माणूसपण हे किती तेजाळलेले आहे, मोठेपण मिळवून देणारे आहे याचा अंतर्मुख होऊन शोध घेणे आवश्यक आहे. त्यासाठी कठोर आत्मविश्‍लेषणाची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. ते असेही म्हणाले की, जितका माणूस मोठा होतो, तितकाच तो विनम्र होत जातो. पद, पैसा आणि प्रतिष्ठा या बाबी क्षणभंगूर ठरू शकतात. गुण, प्रतिभा आणि प्रज्ञा दुसर्‍यांना देत असताना मोठी माणसे आपल्या आत्म्याच्या आनंदाशी प्रतारणा करीत नाहीत. या संदर्भात विवेचन करताना ज्ञानेश्‍वर, तुकाराम, बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विविधांगांनी विकसित झालेल्या व्यक्तिमत्त्वांचा वेध घेतला. पत्रकारितेत असताना वि. स. खांडेकर, विश्राम बेडेकर, आचार्य अत्रे, आशा भोसले, श्रीनिवास खळे, आर. के. लक्ष्मण व इंदिरा संत यांच्या समृद्ध सहवासातील आनंददायी क्षणांचा त्यांनी उल्लेख केला. महात्मा गांधींच्या विचारातील प्रामाणिकपणाची त्यांनी आवर्जून आठवण करून दिली.
तिसरे व्याख्यान होते ज्येष्ठ रंगकर्मी आणि नामवंत प्राध्यापक प्रा. माधव वझे यांचे. कै. श्रीनिवास नायक यांच्या स्मृतीला ते वाहिले होते. त्यांचा विषय होता ‘प्रायोगिक नाटक आणि जीवन.’ त्यांनी आपला विषय व्युत्पन्नतेने, रसमयतेने आणि तन्मयतेने खुलविला. या व्याख्यानातून बाराव्या वर्षी ‘श्यामची आई’मधील श्यामची निरागस भूमिका वठविणारे माधव वझे आणि आजचे परिणतप्रज्ञ आणि चित्तवृत्तीतील प्रसन्नता कायम ठेवणारे माधव वझे जाणवले. नाटक आणि नाट्यकला यांतील अन्योन्यसंबंध त्यांनी उलगडून दाखविला.
आपल्या प्रभावी व्याख्यानात सुरुवातीला जीवन म्हणजे काय याची संज्ञा आणि संकल्पना उलगडून दाखविली. रंगभूमीचे माणसाच्या जीवनावर पडलेल्या प्रभावाचे विश्‍लेषण त्यांनी वृत्तिगांभीर्याने आणि नर्मविनोदी शैलीत केले. माणसामधील बदलांचे व परिवर्तनाचे चित्रण नाटकात येणे अपेक्षित होते. प्रायोगिक रंगभूमीने धाडसी पावले टाकत नाटकाला नवी दिशा दाखविली. संस्कृत नाटक आशावादी होते. या नाटकात शोकांतिका नव्हत्या. ग्रीक रंगभूमी मात्र शोकांतिकासाठी गाजली. माणसाची जीवनशैली बदलली. त्यानुसार अनेक परिवर्तने झाली. आत्मिक संघर्ष व स्त्रियांचे हक्क यांची चर्चा नाटकात व्हायला लागली. त्यानुसार रंगभूमी बदलत गेली.
आजच्या वास्तवावर प्रकाश टाकताना माधव वझे म्हणाले की, आजच्या नाटकाला आणि रंगभूमीला दोन-दोन सेन्सॉरशिपच्या तावडीतून जावे लागते. संस्कृतीच्या नावाखाली काही लोक नाट्यकलाकारांची तोंडे बंद करू पाहताहेत. ते योग्य नव्हे, असे प्रा. वझे म्हणाले. स्वागतशील वृत्तीने त्यांनी वास्तवाचा वेध घेणार्‍या प्रयोगशील नाटकांतील अंतःप्रवाहाचे स्वागत केले. त्यासाठी त्यांनी सोदाहरण विवेचन केले. विजय तेंडुलकर यांच्या ‘मित्राची गोष्ट’, ‘सखाराम बाईंडर’, ‘धाडे’ आणि ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकांचा उल्लेख केला. पाश्‍चात्त्य रंगभूमीवर झालेल्या परिवर्तनाची अनेक नाटकारांची उदाहरणे देऊन चर्चा केली. शेवटी विजय तेंडुलकरांच्या उद्गारांचा समुचित उल्लेख करून आपले विचारशिल्प त्यांनी परिपूर्ण केले.
चौथे विचारपुष्प गुंफणारे डॉ. राहुल पै पाणंदीकर तरुण प्रज्ञावंत. गोव्याचे- मडगावचे- सुपुत्र. ‘आर्ट ऑफ स्ट्रेटजी’ या अभिनव संकल्पनेवर आधारलेले त्यांचे प्रभावी व्याख्यान झाले. हे व्याख्यान दत्तात्रय एन. हेमाडी यांना वाहिलेले होते. डॉ. राहुल पै पाणंदीकर हे सध्या तेल व वायू उद्योगात स्वतःचा ठसा उमटविलेले व बॉस्टन …….. लटिंग समूहाचे संचालक आहेत. गतिमान जगात झपाट्याने बदल होत असतात. अशा वेळी वेगळी धोरणे, बुद्धिमत्ता आणि व्यूहरचना याबाबतीत मानवाला आपल्या प्रज्ञेचा अवलंब करावा लागतो हे त्यांनी पटवून दिले. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, गोवा व सिंगापूर यांचा राजकीय व आर्थिक प्रवास एकाच वेळी सुरू झाला. ज्यावेळी गोवा मुक्त झाला त्याच काळात सिंगापूर राष्ट्राची निर्मिती झाली. सुरुवातीला गोव्याचा जीडीपी सिंगापूरहूनही चांगला होता. पण दलदलीचा भाग असलेल्या व निसर्गाचे वरदान नसलेल्या सिंगापूरने गोव्याला मागे टाकले. आज सिंगापूरचा जीडीपी पंचावन्न हजार अमेरिकन डॉलर्स एवढा आहे, तर गोव्याचा पाच हजार अमेरिकन डॉलर्स जीडीपी आहे. सिंगापूरला हे सारे नियोजनबद्ध कार्यक्रम, योग्य व्यूहरचना आणि योग्य कौशल्य यांमुळे शक्य झाले.
आजच्या युगात यश मिळवायचे असेल तर त्यासाठी नियोजनाची अत्यंत आवश्यकता आहे. ग्राहकांची मागणी काय आहे यानुसार आपण आपल्या उत्पादनात जर बदल करत राहिलो, तरच आजच्या व्यवसायातील स्पर्धेत टिकून राहणे शक्य आहे. तसेच आजच्या संगणकीय आधुनिक जगात प्रत्येकाला संगणकीय ज्ञान असायला हवे. संगणकीय ज्ञान जर नसेल तर त्याला अज्ञानी गणले जाईल असे डॉ. राहुल पै पाणंदीकर यांनी प्रतिपादन केले.
शेवटचे पाचवे पुष्प प्रख्यात व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी गुंफले. ‘रेषा, भाषा आणि हशा’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. प्रो. बाबुसो कामत यांच्या स्मृतीना समर्पित करण्यात आले होते. आपल्या नर्मविनोदी शैलीत जीवनाच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकून रसिक श्रोत्यांना त्यांनी हसविले; तसेच अंतर्मुख व्हायला लावले.
आजच्या क्रीडाक्षेत्रात ऑलिंपिक स्पर्धेत भारताला पदके कमी का मिळतात याचे विश्‍लेषण त्यांनी मितरेषांच्या सहाय्याने दाखवून दिले. क्रिकेट पाहणे हा भारतीयांचा आवडता खेळ आहे. त्यांनी आपल्या कल्पक कुंचल्याच्या बळावर आजीचे नातवावरील प्रेम, शिक्षणक्षेत्रातील सुबत्ता, करमणुकीची साधने, सामाजिक व्यवस्था, खेळ इत्यादी जीवनाची अंगोपांगे शतकापूर्वी कशी होती आणि आजच्या घडीला त्यांचे स्वरूप काय आहे यांची तुलनात्मक चित्रे दृकश्राव्य माध्यमातून स्पष्ट केली. त्यांची अमोघ शब्दशक्तीही समांतरपणे श्रोत्यांच्या प्रत्ययास आली. संगणकाचा सतत वापर झाल्यामुळे हस्ताक्षर म्हणजे काय? पाठांतर म्हणजे काय असे प्रश्‍न भावी पिढीला पडणार आहेत असे त्यांनी विशद केले. माणसांचे विविध नमुने त्यांनी सादर केले. उदा. शब्दकोड्यात बोलणारी माणसे, अघळपघळ, आलंकारिक, बोलणे अर्धवट सोडणारी माणसे, जहाल वक्तव्य करणारी माणसे, इंग्रजी व मराठी यांची भेसळ करून बोलणारी माणसे यांवर त्यांनी मिताक्षरांत प्रभावी भाष्य केले. समाजातील जात, धर्म, आरक्षण तसेच नोटाबंदी झाल्यावर माणसांची झालेली ससेहोलपट इत्यादी बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला तेव्हा त्यांनी श्रोत्यांमध्ये खसखस पिकविली. शरद पवार, लालूप्रसाद यादव, राबडीदेवी, सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे, सोनिया गांधी आणि लालकृष्ण अडवाणी यांची व्यंगचित्रे आणि जोडीला त्यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करून त्यांनी श्रोत्यांना हसविले. व्यंगचित्रकार हा समकालीन जीवनाचा प्रभावी भाष्यकार कसा ठरू शकतो याचे दर्शन प्रशांत कुलकर्णी यांनी घडविले.
आपल्या क्षेत्रातील आर. के. लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे, शि. द. फडणीस आणि वसंत सरवटे या प्रथितयश व्यंगचित्रकारांमुळे आपण घडत गेलो. मूळ व्यवसाय व्यंगचित्रकाराचा नसताना केवळ छंदापायी ही कला आपण आत्मसात करू शकलो असे त्यांनी प्रांजळपणे सांगितले.
पाच प्रज्ञावंतांची, आपल्या विचारसंपन्न वाणीने अपूर्व आनंदानुभव देणारी ही पाच व्याख्याने अंतर्मुख करणारी, कृतिप्रवण करणारी. गेल्या सोळा वर्षांतील ‘विचारवेध’ व्याख्यानमालेत अनेक नामवंतांच्या मांदियाळीने हे विचारपीठ समृद्ध केले, त्या गुणसंपन्न वारशात मौलिक भर टाकणारी. सम्यक विचार चिमटीत कसा मावणार? ज्ञानदेवांच्या शब्दांत या गुणवंतांचे बोल आठवताना एवढेच म्हणावेसे वाटते- ‘येणें वाग्यज्ञें तोषावें!’