ओबामा गेले, ट्रम्प आले; पुढे काय…?

0
106

– दत्ता भि. नाईक

चीन व पाकिस्तान ही दोन्ही कृत्रिम राष्ट्रे विघटनाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांच्या विघटनास मदत केल्यास आशिया खंडात शांतता नांदू शकते. बलवान चीन हा जगाला धोका आहे, परंतु बलवान भारत हा जगाला शांतीचा संदेश देईल हे जाणणार्‍यांनीच आतापर्यंत या सर्व गोष्टी रोखलेल्या आहेत. ट्रम्प प्रशासन याबाबतीत डोळे व कान उघडे ठेवून वावरेल अशी आशा बाळगूया.

२०१६ च्या नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकन मतदारांनी राष्ट्रपदीपदाच्या निवडणुकीत मतदान केले. एका बाजूला डेमोक्रेटिक पक्षाच्या श्रीमती हिलरी क्लिंटन होत्या, तर दुसर्‍या बाजूने रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे निवडणूक लढवत होते. जगभरातील वर्तमानपत्रे व जनमत चाचण्या घेणार्‍या संस्था हिलरी क्लिंटन यांचे पारडे जड आहे असे भविष्य वर्तवित होत्या. अमेरिकन जनतेने डेमोक्रेटिक पक्षाद्वारे सर्वप्रथम अश्‍वेत म्हणजे बिगरगोरा राष्ट्राध्यक्ष निवडून देऊन एकप्रकारे फार मोठे क्रांतिकारी पाऊल उचलले होते. आता देशाच्या इतिहासात सर्वप्रथम महिला राष्ट्राध्यक्ष निवडण्याचे आव्हान देशातील जनतेसमोर होते, परंतु हे आव्हान न पेलल्यामुळे असेल वा बदलत्या जागतिक वातावरणामुळे असेल, रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली व सर्वच भविष्यकारांना अचंबित केले.

भडक वक्तव्ये करणारे ट्रम्प
ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी निवडून येताच भारताचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन करताना यापुढे भारत-अमेरिका संबंधांना एक नवी उभारी येईल असे म्हटले, तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेशी बिघडलेले सर्व संबंध स्थिरस्थावर करून मैत्रीचे नवीन युग सुरू होईल, अशी आशा व्यक्त केलेली आहे. ब्रिटनच्या प्रधानमंत्री थेरेजा मे यांनी त्यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे की, अमेरिका व ब्रिटन यांचे अबाधित असे संबंध आहेत. आमचे यापुढेही व्यापार, सुरक्षितता व सामरिक विषयात समर्थ आणि पक्के संबंध चालू राहतील. इस्राएलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे की, ट्रम्प हे इस्रायल देशाचे खरे मित्र असून आम्ही सुरक्षितता, स्थैर्य व शांतता याबाबतीत त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा ठेवतो.
डेमोक्रेटिक हा गुलामगिरीला विरोध करण्यासाठी नागरी युद्ध पुकारणार्‍या अब्राहम लिंकन यांचा पक्ष. त्यामुळे आतापर्यंत अमेरिकेत स्थायिक झालेले भारतीय याच पक्षाच्या बाजूने मतदान करत असत व याही खेपेला असेच होईल असे सर्वांना वाटत होते. परंतु घडले वेगळेच. या खेपेस अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांनी रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने मतदान करून एक नवीन राजकीय पायंडा पाडला. या निवडणुकीसोबतच प्रमिला जयपाल या वॉशिंग्टनमधून तर राजकृष्णमूर्ती, रोहित खन्ना, अमीबेरू हे त्यांच्या लोकप्रतिनिधी गृहामध्ये निवडून जात आहेत. याचबरोबर कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या कॅलिफोर्नियाच्या ऍटर्नी जनरल याही सिनेटवर निवडून जाणार आहेत.
ट्रम्प यांच्यासारखे भडक वक्तव्ये करणारे व्यक्तिमत्त्व साधारणपणे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून येत नाही असा आतापर्यंतचा अनुभव होता. त्यांची निवड घोषित झाल्यावर ताबडतोब त्यांना विरोध करणार्‍या मोर्चांचे आयोजन केले जाऊ लागले. ‘टाईम’ हे अमेरिकेच्या बुद्धिवंतांचे साप्ताहिक मानले जाते. त्यात त्यांचे ‘पर्सन ऑफ द इयर’ असे वर्णन करतानाच, प्रेसिडेंट ऑफ डिव्हायडेड स्टेट्‌स ऑफ अमेरिका असे नॅन्सी गिब्ज या स्तंभलेखिकेने त्यांचे वर्णन केलेले आहे.
स्थलांतरितांचा प्रश्‍न
निवडून आल्यानंतर शपथविधी होईपर्यंत देशातील निरनिराळ्या राज्यांना भेटी देणे व परराष्ट्रांशी फोनवर बातचीत करणे या गोष्टी अपेक्षित असतात. परंतु त्यातून कोणत्याही प्रकारचा गैरसमज होणार नाही याची काळजी घेतली जाते. गेली चाळीस वर्षे अमेरिकेने चीनच्या मुख्य भूमीला मान्यता देऊन तैवानशी मैत्रीपूर्ण संबंध असले तरीही ते दुसरे चिनी राष्ट्र असल्याची भूमिका मागे घेतली होती. ट्रम्प यांनी निवडून आल्यानंतर तैवानच्या राज्यकर्त्यांशी दहा मिनिटे फोनवर बातचीत केली, त्यामुळे कम्युनिस्ट चीन खवळला.
निवडणुकीच्या काळात रशियाकडून संपूर्ण प्रक्रियेत हस्तक्षेप झाल्याच्या बातम्या आल्यामुळेही वातावरण बरेच तप्त झाले होते, परंतु रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सफाई देऊन या वादावर पडदा टाकला आहे.
ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील डिफेन्स सेक्रेटरी म्हणजे संरक्षणमंत्री जेम्स मेट्टीस यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याबद्दल सावध प्रतिक्रिया दिलेली आहे. पुतीन नाटोची संघटना नष्ट करण्याकरिता प्रयत्नशील आहेत, तरीही आपण त्यांच्याशी सहकार्याने वागू असे ते म्हणाले. माईक पॉंपिओ हे सी.आय.ए.चे नूतन प्रमुखही विशेष बोलण्याचे टाळतात. जेफ सेशन्स हे नवनियुक्त ऍटर्नी जनरल आहेत. नवीन सरकार परदेशातून येणार्‍या मुसलमान स्थलांतरितांवर बंदी आणणार अशा सर्वत्र वावड्या उठतात. यासंबंधाने बोलताना त्यांनी सांगितले की, स्थलांतरितांमध्ये मुसलमान व गैरमुसलमान असा भेदभाव करता येणार नाही. सेक्रेटरी ऑफ स्टेट्‌स म्हणजे परराष्ट्रमंत्री रॅक्स टिलरसन तर अमेरिका नाटो कराराचे रक्षण करण्यास वचनबद्ध असून मुसलमान स्थलांतरितांवर नियंत्रण ही कल्पनाच ते उडवून लावतात. होमलँड सॅक्युरिटी म्हणजे अंतर्गत सुरक्षा प्रमुख जॉन केरी यांनी आतापर्यंतच्या अमेरिकन कायद्याशी आम्ही वचनबद्ध आहोत असे म्हटलेले आहे.
यंदाच्या निवडणुकीत जगभरातून येणारे स्थलांतरित हा एक मोठा विषय होता. स्वतः उद्योगपती असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी तो बरोबर ओळखला. त्यांचा रोष प्रामुख्याने पश्‍चिम आशियामधून येणार्‍या मुसलमान निर्वासितांवर होता हे खरे असले तरी अमेरिकी तरुणांना रोजगार मिळत नाही हे समाजाचे खरे दुःख होते.
मॅक्सिकोच्या सीमेवर भिंत?
२० जानेवारीपासून डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे हातात घेतल्यावर अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात कोणकोणते बदल होतील यासंबंधाने सर्वत्र उत्सुकता लागून राहिली आहे. माझे रशियाशी कोणत्याही प्रकारचे संंबंध नाहीत. कोणताही व्यवहार नाही वा कर्जाची देवाण-घेवाण नाही. मला रशियासंबंधाने काहीही म्हणायचे नाही असे ट्रम्प यांनी ट्विटरवर लिहिले आहे. त्यांच्या निवडीमागे रशियाचा हात आहे या प्रकारच्या प्रश्‍नांना ट्रम्प यांना यापुढेही उत्तरे द्यावी लागतील. त्यांचा जागतिक पातळीवरचा व्यवसाय त्यांनी बंद करावा यासंबंधाने त्यांच्यावर सर्व बाजूनी दबाव आहे व त्यादृष्टीने त्यांनी पावले उचलण्यास सुरुवात केल्याचेही वृत्त आहे.
सियान स्पायसर हे ट्रम्प यांचे व्हाईट हाऊसमधील प्रेस सेक्रेटरी आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प वेतनाच्या रूपाने वर्षाला फक्त एक डॉलर घेणार हे सांगताना त्यानी ओबामा यांनी दुर्लक्षित केलेल्या मूलभूत सेवांकडे लक्ष पुरवण्याचे काम ट्रम्प प्रशासन करेल असे सांगितले आहे. रस्ते, पूल इत्यादी सर्व गोष्टी नव्याने उभ्या करण्याची गरज असून मॅक्सिकोमार्गे येणार्‍या स्थलांतरितांना रोखण्यासाठी सर्व प्रकारची काळजी घेतली जाईल असेही ते म्हणाले. मॅक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधायचा प्रस्तावही प्रचारकाळात पुढे आला होता. त्यासंबंधाने सध्यातरी कोणीही काही बोलण्यास तयार नाही.
बदलते परमाणू धोरण
डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचारकाळातच पाकिस्तानने दहशतवाद्यांचे तळ बाळगता कामा नये अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानचे प्रधानमंत्री नवाज शरीफ यांच्याशी यासंबंधाने बातचीत केल्याचे वृत्त आहे. त्यानी चीनच्या साऊथ चायना सी मधील घूसखोरीस विरोध केलेला आहे. तैवानला अघोषित मान्यता देऊन त्यानी चीनला डिवचले आहेच, याशिवाय उत्तर कोरियावर नियंत्रण ठेवण्याचे चीनला आवाहन करून चीनला त्याची जागा दाखवून दिली आहे. इस्राएलचे प्रधानमंत्री नेतान्याहू यांनी ज्यापद्धतीने त्यांच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे यावरून ते इस्राएलच्या बाजूने झुकते माप ठेवतील असे वाटते. सध्या संपूर्ण युरोप व अमेरिका इस्लामिक स्टेटच्या अमानुष कृतीमुळे भेदरून गेलेले आहेत. इस्लामिक स्टेटला संपवायचे असेल तर सिरियाला मदत केली पाहिजे असे ट्रम्प यांचे मत आहे. सिरियाला एकटे पाडल्यामुळेच अमेरिकेने हे युद्ध ओढवून घेतलेले आहे हे तितकेच खरे आहे. सिरियाला मदत करणे म्हणजे रशियाला सहकार्य करणे. यामुळे अमेरिकेचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता उद्भवते. अमेरिका व रशिया या दोन्ही परस्परविरोधी सत्ता हातात हात घालून वावरल्यास जगात शांततेच्या युगाची सुरुवात होईल यात शंका नाही.
ट्रम्प यांनी अमेरिका भारताचे मित्रराष्ट्र बनणार असेल तर चीन व पाकिस्तान यांना नुसता तोंडदेखला विरोध दर्शवून चालणार नाही. यासाठी ठोस परराष्ट्र नीतीची आवश्यकता आहे. चीन व पाकिस्तान ही दोन्ही कृत्रिम राष्ट्रे विघटनाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांच्या विघटनास मदत केल्यास आशिया खंडात शांतता नांदू शकते. बलवान चीन हा जगाला धोका आहे, परंतु बलवान भारत हा जगाला शांतीचा संदेश देईल हे जाणणार्‍यांनीच आतापर्यंत या सर्व गोष्टी रोखलेल्या आहेत. ट्रम्प प्रशासन याबाबतीत डोळे व कान उघडे ठेवून वावरेल अशी आशा बाळगूया.