कॉंग्रेस-गोवा फॉरवर्ड बोलणी फिसकटली

0
100

येत्या दि. ४ फेब्रुवारी रोजी होणार्‍या गोवा विधानसभा निवडणुकीसंदर्भात कॉंग्रेस आणि गोवा फॉरवर्ड दरम्यान चार मतदारसंघांसाठी झालेला जागा वाटप समझोता बारगळल्यात जमा असून फातोर्डा, शिवोली आणि वेळ्ळी मतदारसंघांत कॉंग्रेसने आपले उमेदवार निवडणूक लढवतील असे संकेत काल दिले.

या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी अखिल भारतीय कॉंग्रेस सरचिटणीस व गोवा प्रभारी दिग्विजयसिंह व सरचिटणीस ऑस्कर फर्नांडिस गुरुवारी रात्री गोव्यात दाखल झाले होते. काल संध्याकाळपर्यंत प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो, विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे, माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस आमदार दिगंबर कामत यांची बैठक झाली. त्यात या प्रश्‍नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला, परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही. फातोर्डा व शिवोली मतदारसंघातील कॉंग्रेसच्या उमेदवारांना मागे घेण्याची मागणी गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई यांची होती. तर वरील मागणी पूर्ण करायची झाल्यास, वेळ्ळी व नावेली व साळगावमधून गोवा फॉरवर्डचे उमेदवार मागे घेतले पाहिजेत असा कॉंग्रेस नेत्यांचा प्रस्ताव होता. या प्रश्नावर राष्ट्रीय पक्षाची प्रतिष्ठा महत्त्वाची असल्याचे पक्षातील नेत्यांचे म्हणणे होते. हा प्रश्न सामोपचाराने सोडविण्यासाठी दिगंबर कामत यांनी शर्थीचे प्रयत्न चालविले होते.
कुंकळ्ळी येथे चार कॉंग्रेस उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे आहेत. क्लाफास डायस याला उमेदवारी दिल्याने देवेंद्र देसाई शिवसेनेत गेले. जॉन मोंतेरो गोवा विकास पार्टीत, तर माजी मंत्री ज्योकीम आलेमांव अपक्ष उभे राहिले आहेत. कॉंग्रेस नेतृत्वाने ही बंडखोरी रोखण्याचा प्रयत्न केला नाही. तीच स्थिती नावेली, बाणावली व काही प्रमाणात वेळ्ळी येथे राहिली आहे. बाणावली येथे मारिया रिबेलो या कॉंग्रेस उमेदवाराच्या विरोधात उभ्या राहिल्या आहेत. त्याशिवाय चर्चिल आलेमांव राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे उभे राहिले आहेत.