अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प शपथबध्द

0
95

अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी काल एका भव्य, शानदार सोहळ्यात शपथग्रहण केले. सुमारे ९० हजारांच्या उपस्थितीत अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्टस यांनी त्यांना शपथ दिली. ट्रम्प यांच्याबरोबरच उपराष्ट्राध्यक्षपदी माईक पेन्स यांचाही शपथविधी झाला. ट्रम्प यांनी आपल्या भाषणात इस्लामी कट्टरतावाद नष्ट करणार असे प्रतिपादन करत असतानाच अमेरिकी नागरिकांपासून हिरावलेला रोजगार पुन्हा मिळवून देण्याचा निर्धारही व्यक्त केला.

संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या दिमाखदार सोहळ्यास मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनसह ट्रम्प यांच्या विरोधात निवडणूक लढविलेल्या हिलरी क्लिंटन अन्य माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश, जिमी कार्टर ट्रम्प यांच्या पत्नी मेलनिया व कुटुंबिय तसेच अनेक महनीय, अतीमहनीयांची उपस्थिती होती. या सर्वांच्या उपस्थितीत ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.
हा क्षण तुमचा, येथे उपस्थित प्रत्येकाचा आणि अमेरिकेतील कानाकोपर्‍यात हा सोहळा पाहणार्‍यांचा आहे असे उद्गार ट्रम्प यांनी काढले. या सोहळ्यानंतर मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सोहळ्याच्या ठिकाणाहून हेलिकॉप्टरने निघाले.

* शपथविधीआधी व्हाईट हाऊसमध्ये मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व मिशेल ओबामा यांच्यासमवेत डोनाल्ड ट्रम्प व त्यांची पत्नी यांच्या चहापानाचा कार्यक्रमही झाला.
* डोनाल्ड ट्रम यांच्या शपथविधी सोहळ्याची लगबग सुरू असतानाच वॉशिंग्टनमध्ये ट्रम्पविरोधकांची निदर्शनेही सुरू झाली होती. न्यूयॉर्कमध्येही हजारोंच्या संख्येने ट्रम्पविरोधकांनी निदर्शने केली.