अस्नोडा, मालपेंत भीषण अपघातांत दोन ठार

0
88

अस्नोडा पुलावर काल सकाळी खडीची पावडर घेऊन येणार्‍या ट्रकचे ब्रेक निकामी होऊन ट्रक उलटून त्याच्याखाली चिरडून गुरुदास शेटकर (वय २४) हा दुचाकीस्वार ठार झाला. अवजड ट्रक दुचाकीसह अंगावर कोसळल्याने दुचाकीस्वाराच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. क्रेनच्या सहाय्याने अग्निशामक दलाच्या वाहनांची मदत घेऊन मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृत दुचाकीस्वार कासारवर्णे येथील असल्याचे सांगण्यात आले.

याबाबत वृत्त असे, सकाळी जीए- ०२ जे- ६०५२ क्रमांकांचा ट्रक दोडामार्गहून अस्नोडाकडून उतरणीवरून खडी पावडर घेऊन येत असताना ब्रेक निकामी झाल्याने चालकाने ट्रक डाव्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला असता तो उलटला. समोरून येणारा जीए- ० ए- ६७२४ क्रमांकाच्या मोटरसायकल चालक शेटकर या ट्रकखाली सापडल्याने तो ठार झाला.
सदर अपघाताचे दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते. या अपघातात बाजूला पार्क करून ठेवलेल्या एका दुचाकीचीही मोठी हानी झाली. घटनेचे वृत्त समजताच डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी माजीक व त्यांचे सहकारी दोन वाहनांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर क्रेनचा वापर करून स्थानिक नागरिक व अग्निशामक दलाच्या जवानांने गाडीखाली सापडलेल्या दुचाकीस्वाराचा मृतदेह बाहेर काढला व रस्ता मोकळा केला.
डिचोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक चिमुलकर यांनी पंचनामा केला. ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिथीलेश शहा असे चालकाचे नाव आहे. स्थानिक नागरिकांनी अस्नोडा उतरणीवरून येणार्‍या अवजड वाहनाना बंदी असतानाही वाहने येत असल्याने इथे वारंवार अपघात होत असून विद्यार्थी व नागरिकांच्या जीवाला धोका असल्याने त्वरित कारवाई. अन्यथा रस्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.

मालपेतील अपघातात
पुण्यातील युवक ठार

मालपे-पेडणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ वर २० रोजी पहाटे १.५० वाजता ट्रक व टाटा सफारी यांच्यात अपघात होवून हेमंत कामटे (पुणे) हा ठार झाला. तसेच एकूण ५ जण जखमी झाले. त्यापैकी दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टाटा सफारी एमएच- १४ बीके- ००१४ हे वाहन पत्रादेवीमार्गे पेडण्याला येत होते तर त्याच बाजूने जीए- ०५ टी- १८०५ हा ट्रक जात होता. या ट्रकचे ब्रेक निकामी होऊन टाटा सफारीला त्याने जबरदस्त धडक दिली. त्यात हेमंत कामटे हा उपचारांसाठी नेताना मरण पावला.
टाटा सफारी वाहनातील आकाश कामटे (२५), स्वप्नील मादीक (२१), धीरज फुलकर (२२), रोहित फाटे (२३), हेमंत कामटे (३२), प्रतीक दारेकर हे जखमी झाले असून त्या सर्वांना उपचारासाठी बांबोळी येथे गोमेकॉ इस्पितळात पाठवण्यात आले.