आतापावेतो ४०५ अर्ज दाखल; आज छाननी

0
120

>> प्रताप गावस यांचे बंड; राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे रिंगणात

>> केप्यात तवडकर समर्थक कृष्णा वेळीप अपक्ष

येत्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या कालच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ४०५ अर्ज दाखल झाले असून आज दि. १९ रोजी अर्जांची छाननी होईल, तर शनिवार दि. २१ जानेवारी हा उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्या दिवशी सर्व मतदारसंघांतील चित्र स्पष्ट होईल. काल दिवसभरात एकूण २०१ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती अतिरिक्त निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी दिली.

काल माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, विश्वजीत राणे आदींसह अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. कॉंग्रेसशी युती फिस्कटलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही विविध मतदारसंघांतून आपले उमेदवारी अर्ज काल दाखल केले. फातोर्डा मतदारसंघात जोसेफ सिल्वा यांनी गोवा विकास पार्टी आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांतर्फे अर्ज दाखल केला आहे. एक उमेदवार दोन पक्षांच्या वतीने अर्ज दाखल करू शकत नसल्याने तांत्रिकदृष्ट्या असा उमेदवार निवडणूक लढविण्यात अपात्र ठरतो. छाननीवेळी निर्वाचन अधिकारी योग्य तो निर्णय घेतील असे नावती यांनी सांगितले. काल सर्वाधिक उमेदवारी अर्ज सांत आंद्रेमधून भरले गेले.
प्रताप गावस यांचे बंड
साखळी मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने माजी कॉंग्रेस आमदार प्रताप गावस यांनी अर्ज दाखल केला आहे. कॉंग्रेस पक्ष विरोधात असतानाही पाच वर्षे पदरमोड करून संघटना मजबूत केली. निवडणूक जवळ येताच कॉंग्रेसची उमेदवारी निश्‍चित झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, दिल्लीत उमेदवारी बदलली कशी असा सवाल करून श्री. गावस यांनी कॉंग्रेस श्रेष्ठींवर टीकेची झोड उठवीत राणे पिता – पुत्र स्वार्थी राजकारण करीत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला.
कॉंग्रेसने आपली पत गमावली असून जनतेच्या आग्रहाखातर आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसच साखळीची उमेदवारी स्वीकारीत असल्याचे त्यांनी सांगितले. कॉंग्रेसची सारी यंत्रणा आपल्यासोबत असून राज्यात कॉंग्रेसला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. स्थानिक उमेदवाराला डावलून परप्रांतीय उमेदवाराला (धर्मेश सगलानी) उमेदवारी देण्यामागे मोठे ‘सेटिंग’ असल्याची टीकाही गावस यांनी केली. निष्ठावंतांची कॉंग्रेसला कदर नसल्याचे ते
म्हणाले.
केप्यात तवडकर समर्थक वेळीप अपक्ष
केपे मतदारसंघात माजी क्रीडामंत्री रमेश तवडकर यांचे खंदे समर्थक असलेले माजी खोला जिल्हा पंचायत सदस्य कृष्णा वेळीप यांनीही बंडाचा झेंडा रोवत भाजपाचा त्याग करून केपे मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी काल दाखल केली. तवडकर यांना भाजपाची उमेदवारी न दिल्यास पक्षत्याग करण्याचा इशारा त्यांनी यापूर्वीच दिला होता. तवडकर यांना उमेदवारी नाकारली गेल्यानंतर त्यांच्यासह २० कार्यकर्त्यांनी भाजपाला रामराम ठोकला होता.
या निवडणुकीत वेळीप यांनी केप्यातून स्वतःसाठी उमेदवारी मागितली होती. त्यांना तवडकर यांनी पाठिंबाही दिला होता. भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर मगोने आपल्याला उमेदवारी देऊ केली होती, पण आपण ती नाकारल्याचे वेळीप यांनी सांगितले.
अर्ज दाखल करण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी केप्यातून ४, सांग्यातून २ व कुडचड्यातून २ उमेदवारी अर्ज दाखल झाले. फोंड्यात काल ५ अर्ज दाखल झाले. फोंडा तालुक्यातील चार मतदारसंघांतून आजवर २० अर्ज दाखल झाले असून त्यात शिरोड्यात सर्वाधिक ६ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
मुरगावमधून ७, कुठ्ठाळीतून ११, वास्कोतून १० तर दाबोळीतून ३ अर्ज दाखल झाले आहेत. बार्देश तालुक्यातील सात मतदारसंघांतून आतापर्यंत एकूण ३६ अर्ज दाखल झाले आहेत. वाळपईतून काल ४ तर पर्येतून ४ अर्ज दाखल झाले.

कॉंग्रेसचे ३६ मतदारसंघांत उमेदवार

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने अखेर ३६ मतदारसंघांतून आपले उमेदवार उभे केले आहेत. पणजी, पर्वरी, फातोर्डा व शिवोली या चार मतदारसंघांत पक्षाने उमेदवार उभे केलेले नाहीत अशी माहिती पक्ष उपाध्यक्ष एम. के. शेख यांनी दिली.
गोवा फॉरवर्डसाठी जागा सोडण्याच्या विषयावरून काल बराच गोंधळ उडाला. कॉंग्रेसने काल दुपारी शिवोली येथे रोशन चोडणकर यांना व फातोर्डा येथे जोसेफ सिल्वा यांना पक्षातर्फे उमेदवारी अर्ज भरण्यास फर्मावले. मात्र, त्यानंतर झालेल्या वेगवान राजकीय घडामोडींनंतर वरील दोघांनाही माघार घेण्याची सूचना करण्यात आली. मात्र, जोसेफ सिल्वा यांनी पूर्वी गोवा विकास पार्टीतर्फे अर्ज भरला होता व काल कॉंग्रेसच्या आदेशानंतर त्यांनी कॉंग्रेसतर्फे अर्ज भरल्याने तांत्रिक समस्या निर्माण झाली. छाननीवेळी निवडणूक अधिकारी काय निर्णय घेतात त्याकडे लक्ष लागले आहे. कॉंग्रेसने पणजीची जागा युनायटेड गोवन्सचे उमेदवार बाबूश मोन्सेर्रात यांच्यासाठी, पर्वरीची जागा अपक्ष उमेदवार रोहन खंवटे यांच्यासाठी सोडली आहे, तर फातोर्ड्याची जागा गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई आणि शिवोलीची गोवा फॉरवर्डचे विनोद पालयेकर यांच्यासाठी सोडली आहे.