सरकार-आरबीआय दरम्यान नोटाबंदीवर चर्चा गतवर्षीपासून

0
88

>> उर्जित पटेल यांची संसदीय समितीला माहिती

 

संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीच्या कालच्या बैठकीवेळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी नोटाबंदीनंतर ९.२ लाख कोटी रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्याची माहिती दिली. तसेच नोटाबंदीच्या विषयावर सरकार व आरबीआय यांच्यात गेल्यावर्षी चर्चा सुरू झाली होती अशी माहितीही त्यांनी यावेळी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
वरील समितीने पटेल यांना या संदर्भात काल पाचारण करून त्यांची साक्ष नोंदवली. यावेळी नोटाबंदीनंतर किती काळा पैसा आला या प्रश्‍नावर पटेल निरूत्तर झाले अशी माहित संसदीय समितीचे सदस्य सौगाता रॉय यांनी दिली. नोटाबंदीनंतर बँकांमध्य एकूण किती पैसा जमा झाला या प्रश्‍नाचे उत्तरही पटेल यांना देता आले नाही या संदर्भातील स्थिती सर्वामान्य होण्यासाठी किती कालावधी लागेल या प्रश्‍नावरही पटेल यांच्याकडे उत्तर नव्हते असे रॉय म्हणाले. अन्य एका प्रश्‍नावर ९.२ लाख कोटी रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आल्याची माहिती पटेल यांनी समितीसमोर दिली. आता येत्या २० रोजी उर्जित पटेल यांना संसदेच्या लोकलेखा समितीसमोर उपस्थित राहावे लागणार आहे. या समितीचे अध्यक्ष के. व्ही. थॉमस हे आहेत.
या बैठकीआधी आरबीआयने काही महत्वाच्या गोष्टींचे स्पष्टीकरण वरील संसदीय समित्यांना सादर केला आहे. केंद्र सरकारने ७ नोव्हेंबर रोजी नोटा बंदीच्या सल्ला दिला होता. त्या अनुषंगाने आम्ही नोटाबंदीची शिफारस केली व नंतर पंतप्रधान मोदी यांनी त्याविषयी घोषणा केली असे या स्पष्टीकरणात नमूद केले आहे. नोटाबंदीनंतर देशात चलनात असलेल्या एकूण नोटांपैकी ८६ टक्के नोटा रद्द ठरवण्यात आल्या. त्यांचे मूल्य १५.६ लाख कोटी एवढे होते. काल झालेल्या बैठकीवेळी समितीचे अध्यक्ष वीरप्पा मोईली तसेच भारतीय बँक संघटना, भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.