घोटेलीत सापडला उडता साप

0
136

सत्तरीतील घोटेली येथे गुरुदास पारवाडकर यांच्या घरातील दूरदर्शन संचावर उडणार्‍या सापाचे आगमन झाल्याने घरातील मंडळीची धावपळ उडाली. याबाबत वन्यजीव अभ्यासक विठ्ठल शेळके यांना कल्पना देताच त्यांनी सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात रवानगी केली.

पोवळा सर्प किंवा विहरणारा म्हणून ओळखला जाणारा हा साप पश्‍चिम घाटातील जगंलात व यापूर्वी म्हादई अभयारण्यात नोंद झाला आहे. उडणारा साप अशी त्याची ओळख असली तरी हा साप १०० मीटरपर्यंत आपल्या क्षमतेद्वारे विहार करत असल्याचे आढळले आहे. या सापावर आकर्षक रंगांचे ठिपके आहेत. हा साप विषारी असल्याचे सांगण्यात येत असले तरी माणसासाठी घातक नसल्याचे सांगण्यात आले. एका झाडाच्या फांदीवरून दुसरीकडे जाण्यासाठी तो उडण्याच्या क्षमतेचा वापर करतो.