काल दिवसभरात ६० उमेदवारी अर्ज

0
131

 

>> पेडण्यात आर्लेकर – आजगावकर समर्थकांत बाचाबाची
>> पार्सेकर, आर्लेकर, दिगंबर, सुदिन, दीपक आदींचे अर्ज सादर

गोवा विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालच्या चौथ्या दिवशी विविध मतदारसंघांमधून मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज भरले गेले. विविध मतदारसंघांतून काल विविध पक्षांच्या वतीने व अपक्षांचे मिळून ६० अर्ज भरले गेले. मांद्रे मतदारसंघासाठी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. पेडणे येथे भाजप उमेदवार व वनमंत्री राजेंद्र आर्लेकर आणि मगो – गोवा सुरक्षा मंचाचे उमेदवार बाबू आजगावकर हे दोघे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले असता त्या दोघांचे समर्थक आमनेसामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी व एकमेकांची हुर्यो उडवण्याचे प्रकार झाले.

श्री. आर्लेकर आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पेडण्यातील उपजिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. त्यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हेही होते. मात्र, आर्लेकर यांना अर्ज भरण्यास एक तासाहून अधिक वेळ लागल्याने बाबू आजगावकर यांचे समर्थक संतप्त झाले. पोलिसांचे कडे तोडून ते रस्त्यावर आले. आर्लेकर अर्ज भरून कार्यालयाबाहेर येताच त्यांच्या विरोधात आजगावकर समर्थकांनी घोषणाबाजी केली. पोलिसांनी यावेळी श्री. आर्लेकर, श्रीपाद नाईक तसेच श्री. सदानंद तानावडे आदींना वाट मोकळी करून दिली. परिस्थिती लक्षात येताच आर्लेकर यांनी मागे वळून निवडणूक अधिकारी हरिष अडकोणकर यांना उमेदवाराचे समर्थक कार्यालयाच्या कितपत जवळ येऊ शकतात असे विचारले असता त्यांनी शंभर मीटरच्या बाहेर असे सांगताच आजगावकर यांचे समर्थक त्याच्या आत येऊन घोषणाबाजी करीत असल्याची तक्रार श्री. आर्लेकर यांनी नोंदवली. त्यानंतर श्री. अडकोणकर यांनी पोलिसांना सूचना देऊन आजगावकर समर्थकांना दूर जाण्यास फर्मावले. अडकोणकर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना माहिती देताच पोलीस उपअधीक्षक महेश गावकर दाखल झाले. त्यानंतर जमाव पांगला.
पेडणे मतदारसंघातून मगोतर्फे माजी मंत्री बाबू आजगावकर यांनीही काल उमेदवारी अर्ज सादर केला. त्यांच्यासोबत माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष पांडुरंग परब, उद्योजक जीत आरोलकर, पंच सज्जन कोनाडकर आदी होते.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे अर्ज सादर
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मांद्रे मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे आपला उमेदवारी अर्ज काल निवडणूक अधिकार्‍यांकडे सादर केला. यावेळी त्यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पक्ष संघटक सदानंद तानावडे, हरमल जिल्हा पंचायत सदस्य अरुण बांदकर, मांद्रे भाजप मंडळ अध्यक्ष रमेश शेट मांद्रेकर हेही होते. तत्पूर्वी त्यानी पार्से व पेडणे येथील श्री भगवती मंदिरांत जाऊन आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी सौ. स्मिता पार्सेकर, कन्या शांभवी तसेच कार्यकर्ते होते.
उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी म्हापशातून भाजपातर्फे आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
काणकोणमधून खोत यांनी अर्ज भरला
काणकोण मतदारसंघातून भाजपची उमेदवारी जाहीर झालेले माजी आमदार विजय पै खोत यांनी निर्वाचन अधिकारी केदार नाईक यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावर सूचक म्हणून वैजावाडा येथील उल्हास वेळीप यांनी, तर अनुमोदक म्हणून शांताजी गावकर यांनी सह्या केल्या आहेत. आपली एकूण मालमत्ता पाच कोटी ७७ लाख ७७०३१ एवढी असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. काणकोण मतदारसंघातून आतापर्यंत हा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. भाजपने उमेदवारी नाकारलेले काणकोणचे आमदार रमेश तवडकर कोणता पवित्रा घेतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
डिचोली व साखळीतून ४ अर्ज
डिचोली तालुक्यातील साखळी व डिचोली विधानसभा मतदारसंघांतून प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज काल दाखल करण्यात आले. साखळी मतदारसंघातून भाजपतर्फे डॉ. प्रमोद सावंत, तर गोवा सुरक्षा मंचातर्फे डॉ. सुरेश आमोणकर यांनी काल उमेदवारी अर्ज सादर केले. निवडणूक अधिकारी महादेव आरोंदेकर यांनी हे अर्ज स्वीकारले. डॉ. सुलक्षणा प्रमोद सावंत यांनी साखळीतून डमी अर्ज भरला आहे.
डिचोली मतदारसंघातून मगोचे उमेदवार नरेश सावळ व भाजपचे उमेदवार राजेश पाटणेकर यांनीही काल उमेदवारी अर्ज सादर केले. निर्वाचन अधिकारी ब्रिजेश मणेरीकर यांनी अर्ज स्वीकारले. चारही उमेदवारांचे समर्थक मिरवणुकीने कार्यालयापाशी आले होते. त्यांनी घोषणांनी आसमंत दणाणून सोडला. पाटणेकर यांनी बोर्डे येथील भाजप कार्यालयापासून मिरवणूक काढली, तर नरेश सावळ यांनी आपल्या कार्यालयापासून सिंह निशाणीसह मिरवणूक काढली.
मुरगाव तालुक्यातून ६ अर्ज
मुरगाव तालुक्यातील चार मतदारसंघांतून एकूण सहाजणानी काल उमेदवारी अर्ज सादर केले. आधीचा एक अर्ज मिळून आजपर्यंत एकूण सात अर्ज सादर झाले आहेत. वास्को मतदारसंघातून भाजपचे कार्लोस आल्मेदा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जुझे फिलीप डिसोझा, अपक्ष हेन्रिक गांधी यांनी अर्ज सादर केले. कुठ्ठाळी मतदारसंघातून युनायटेड गोवन्स पक्षातर्फे रमाकांत बोरकर, दाबोळी मतदारसंघातून तारा केरकर व प्रीतम केळुस्कर (अपक्ष) यांनी अर्ज भरले. मुरगाव मतदारसंघातून एकही अर्ज सादर झालेला नाही. अपक्ष उमेदवार दाजी साळकर यांनी गुरुवारी आपला अर्ज सादर केला होता. उमेदवारी अर्ज भरताना केवळ चार कार्यकर्त्यांना उमेदवारासमवेत कार्यालयात प्रवेश देण्यात येत होता.
सांगे, कुडचडेतून प्रत्येकी ३ अर्ज
केपे मतदारसंघातून काल एक, तर कुडचडे मतदारसंघातून तीन व सांगे मतदारसंघातून तीन अर्ज सादर झाले. केपे मतदारसंघातून भाजपतर्फे प्रकाश शंकर वेळीप यांनी आपला अर्ज दाखल केला. त्यांच्यासमवेत यावेळी उदयपूरचे खासदार अर्जुनलाल मीणा उपस्थित होते. कुडचडे मतदारसंघातून विद्यमान आमदार नीलेश काब्राल यांनी अर्ज भरला. कुडचडेचे मगो – गोवा सुरक्षा मंच युतीचे उमेदवार श्याम सातार्डेकर यांनीही अर्ज सादर केला, तर आम आदमी पक्षातर्फे जेम्स फर्नांडिस यांनीही अर्ज भरला. सांगे मतदारसंघातून विद्यमान आमदार सुभाष फळदेसाई यांनी उमेदवारी अर्ज भरला, तर आम आदमी पक्षातर्फे रवींद्र वेळीप व अपक्ष उमेदवार दत्तप्रसाद सावर्डेकर यांनीही आपले अर्ज सादर केले आहेत.
फोंडा तालुक्यातून ६ अर्ज
फोंड्याच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात काल सहा उमेदवारांनी अर्ज सादर केले. त्यात कॉंग्रेसचे शिरोड्याचे उमेदवार सुभाष शिरोडकर, भाजपाचे शिरोड्याचे उमेदवार व माजी मंत्री महादेव नाईक यांनी अर्ज सादर केले. प्रियोळमधून मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर व भाजप समर्थित अपक्ष उमेदवार गोविंद गावडे यांनीही आपले अर्ज सादर केले आहेत. मडकई मतदारसंघातून मगोचे सुदिन ढवळीकर व आम आदमी पक्षाचे ऍड. सुरेल तिळवे यांनी काल अर्ज सादर केले. सावर्डे मतदारसंघाचे भाजप उमेदवार गणेश गावकर व डमी उमेदवार शिरीष देसाई यांनीही काल धारबांदोड्यात आपले अर्ज सादर केले. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असता आपचे मोलू वेळीप (शिरोडा) यांच्या व्यतिरिक्त कोणी अर्ज सादर केलेले नव्हते. मात्र, काल दिवसभरात उपजिल्हाधिकारी कार्यालयात सहा अर्ज सादर झाले.पर्ये मतदारसंघातून भाजपतर्फे विश्‍वजीत कृ. राणे यांनी काल अर्ज सादर केला. भाजपतर्फे काल सर्वाधिक २० उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले.
कॉंग्रेसतर्फे दिगंबर, सुभाष, रेजिनाल्ड
कॉंग्रेसच्या वतीने मडगावमधून दिगंबर कामत यांनी आपला उमेदवारी अर्ज काल सादर केला. शिरोड्यातून सुभाष शिरोडकर, कुडतरीतून आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, कुडतरीतून मारिया लॉरेन्स यांनीही काल अर्ज भरले.
आपतर्फे १० उमेदवारी अर्ज सादर
आम आदमी पक्षाच्या विविध उमेदवारांनी काल आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यात बाणावलीच्या उमेदवार रॉयला फर्नांडिस, सांगेचे रवींद्र वेळीप, कुडचडेचे जेम्स फर्नांडिस, फातोर्ड्याचे रणजीत कार्व्हालो, नुवेचे मारियान गुदिन्हो, व मडकईचे सुरेल तिळवे, शिवोलीचे विष्णू नाईक, साळगावचे प्रदीप पाडगावकर, कुडतरीचे डॉमनिक वाझ, हळदोण्याच्या रोझी डिसोझा यांचा समावेश आहे.
गोवा फॉरवर्डतर्फे ३ अर्ज
गोवा फॉरवर्डच्या वतीने विजय सरदेसाई यांनी फातोर्डा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज सादर केला, तर शिवोलीतून गोवा फॉरवर्डतर्फे विनोद पालयेकर यांनी अर्ज सादर केला आहे. साळगावचे उमेदवार जयेश साळगावकर यानीही अर्ज सादर केला आहे. फातोर्ड्यातून मगोतर्फे दिलीप नाईक व अपक्ष अवीन नाईक यांनीही अर्ज सादर केले आहेत.
सहा अपक्षांचेही अर्ज
काल दिवसभरात सहा अपक्षांनी उमेदवारी अर्ज सादर केले. त्यात नावेलीतून माजी मंत्री आवेर्तान फुर्तादो, प्रियोळमधून गोविंद गावडे, सांगेतून दत्तप्रसाद सावर्डेकर, फातोर्ड्यातून अवीन नाईक, वेळ्ळीतून कार्लितो कुरैय्या व शिवोलीतून पेद्रिक साव्हियो आल्मेदा यांचा समावेश आहे. युनायटेड गोवन्स पार्टीतर्फे कुठ्ठाळीमधून रमाकांत बोरकर यांनी अर्ज दाखल केला आहे, तर कम्युनिस्ट पक्षातर्फे साळगावमधून गजानन नाईक व भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे सांताक्रुझमधून पेद्रू पिरीस यानी अर्ज सादर केले आहेत.

रमेश तवडकर यांची माघार?
भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारलेले माजी मंत्री रमेश तवडकर यांना मगो पक्षाने आपली उमेदवारी देऊ केली होती, परंतु त्यांनी ती स्वीकारू नये यासाठी भाजपातर्फे शर्थीचे प्रयत्न सुरू असून ते सफल झाल्यास श्री. तवडकर मगोची उमेदवारी न स्वीकारण्याची शक्यता आहे. खासदार नरेंद्र सावईकर यांनी तवडकरांच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांना मतदारसंघातील राजकीय परिस्थितीबाबत समजावल्याचे वृत्त आहे. मनोहर पर्रीकर यांनीही काणकोण भाजप मंडल समिती व महिला मोर्चाच्या सदस्यांशी चर्चा करून त्यांना तवडकर यांना उमेदवारी नाकारण्यामागील कारणे विशद केली आहेत व भाजपासोबत राहण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, भाजपचे संघटक सतीश धोंड यांनी स्वतः श्री. तवडकर यांची भेट घेऊन दीर्घ चर्चा केली. त्यामुळे मगोतर्फे निवडणूक लढवण्याचा विचार तवडकर स्थगित ठेवण्याची शक्यता आहे. उमेदवारी नाकारून भाजपने आपला विश्वासघात केला, परंतु भाजपाशिवाय अन्य पक्षाच्या नेतृत्वाखाली मी निवडणूक लढवणे आपल्या कार्यकर्त्यांना पसंत नसल्याचे तवडकर यांनी सांगितले.

शेवटपर्यंत वाट पाहिली ः राष्ट्रवादी
आधी महागठबंधन होणार, होणार या आशेने आम्ही राहिलो, त्यामुळे आमचा वेळ वाया गेला. आता युती होणार म्हणूनही वाट पाहिली, तिथेही कॉंग्रेसने ऐनवेळी दगा दिला. त्यामुळे आम्हाला एकला चलो रे चा मार्ग अनुसरावा लागल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जुझे फिलीप डिसोझा यांनी काल सांगितले. आम्ही १५ ठिकाणी उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नेली रॉड्रिग्स यांच्याविषयी विचारले असता, त्या आमच्या बरोबर होत्या, पण कॉंग्रेस – राष्ट्रवादी युती होणार व आपली कुठ्ठाळीची जागा जाणार या भीतीने त्यानी साथ सोडली असे त्यांनी पुढे सांगितले.