पंतप्रधानांची पणजीत २८ रोजी सभा

0
54

>> प्रचारासाठी अमित शहा, गडकरी, फडणवीसही येणार

गोवा विधानसभा निवडणूक प्रचारासाठी भाजपचे अनेक केंद्रीय नेते गोव्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दि. २८ रोजी पणजीत जाहीर सभा होणार असल्याची माहिती केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजपला २०१२ च्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला.
गोव्यात येणार असलेल्या नेत्यांमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोवा प्रभारी तथा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू, मुख्तार अब्बास नकवी, स्मृती इराणी आदींचा समावेश असेल, असे नाईक यांनी सांगितले.
उमेदवारी देताना भाजपने कधीही जाती-धर्माचा विचार केला नाही, असे त्यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.
पेडणे येथे विरोधकांनी मंत्री राजेंद्र आर्लेकर अर्ज भरण्यास गेले असता, त्यावेळी त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. या प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी मागणी श्रीपाद नाईक यांनी केली. वरील प्रकरणी निवडणूक आयोगाकडे व पोलिसांत तक्रार दिल्याचे त्यांनी सांगितले.