उच्च रक्तदाब भाग – २

0
203

– डॉ. स्वाती अणवेकर

वेळेवर जेवणे, नीट ताजा सकस आहार घेणे, वेळेवर झोपणे, सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, ध्यान-धारणा, अनुलोम-विलोम प्राणायाम, वेगवेगळे योग प्रकार यांचा वापर आपण नियमित केल्यास निश्‍चितच उच्चरक्तदाब आपण आटोक्यात ठेवू शकतो.

उच्च रक्तदाबाची कारणे ः
१) इसेन्शियल किंवा प्रायमरी हायपरटेन्शन – याचे काही कारण सापडत नाही.
२) सेकंडरी हायपरटेन्शन – ह्याची काही कारणे असतात… जसे
वृद्धावस्था, अनुवंशिकता, वातावरण- जसे उष्ण वातावरणात रक्तदाब कमी असतो तर थंड वातावरणात तो वाढतो. तसेच प्रौढ पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक आढळते. त्याशिवाय स्थूलपणा, व्यायामाचा अभाव, दारू-सिगारेटचे व्यसन, मीठ अधिक प्रमाणात खाणे, मानसिक ताण, डायबेटीस, गरोदरपणा इत्यादी कारणे आहेत.
रक्तदाब तपासणार्‍या यंत्राला ‘स्फिग्मोमॅनोमीटर’ असे म्हणतात. तसेच उच्च रक्तदाबाचा शरीरावर काही परिणाम झाला तर नाहीना, हे तपासण्याकरता रक्त, लघवी, स्ट्रेस टेस्ट, कार्डियोग्राम देखील काढला जातो.
जर रक्तदाब अल्प प्रमाणात वाढला असेल तर फक्त आहार-विहार ह्यात बदल करून तो आटोक्यात ठेवता येतो.
जर मध्यम स्वरूपाचा रक्तदाब असेल तर असे म्हटले जाते की पुढील दहा वर्षांत आपल्याला हृदयरोग होण्याचा धोका २०% असतो. अशा परिस्थितीत औषधे व आहार-विहारातील बदल आवश्यक असतात.
जर रक्तदाब गंभीर रित्या वाढला असेल तर मात्र औषध, आहार-विहारात बदल करण्यासोबतच काही तपासण्या करून घेणे फायद्याचे ठरते.
उच्चरक्तदाबाच्या व्यक्तीने काय करावे?
* नियमित अर्धा ते एक तास व्यायाम करणे हृदयाच्या आरोग्याला फायदेशीर ठरते.
* कोणतेही व्यसन असल्यास ते पद्धतशीरपणे सोडवणे उत्तम.
* पौष्टीक व सकस आहार नेहमी घ्यावा.
* जेवणात अतिरिक्त मीठाचा वापर करू नये.
* वजन नियंत्रणात ठेवावे.
* चहा-कॉफी जास्त प्रमाणात घेऊ नये.
* ध्यान-धारणा व प्राणायामाचा अभ्यास करावा म्हणजे मानसिक ताण कमी होतो.
* रात्रीची झोप नीट शांतपणे घेणे आवश्यक असते.
उच्चरक्तदाबामुळे उद्भवणार्‍या गंभीर समस्या ः
१. स्ट्रोक ः उच्चरक्तदाबामुळे मेंदूच्या एखाद्या भागाला रक्ताद्वारे ऑक्सीजनचा पुरवठा नीट होत नाही किंवा त्यात अडथळा निर्माण होतो तेव्हा त्या व्यक्तीला स्ट्रोक येतो. ह्याचे लक्षण म्हणजे मेंदूच्या ज्या भागात रक्तपुरवठा बंद झाला, त्या भागातून ज्या अवयवांना संवेदना पाठवल्या जातात त्या भागाचे कार्य थांबल्यामुळे त्या अवयवांमध्ये अशक्तपणा येतो. त्यालाच गावठी भाषेत लकवा मारला असे म्हणतात. त्यात मुख्यत्वे चेहर्‍याच्या एका बाजूला संवेदना कमी होते, तसेच शब्दोच्चार करायला त्रास होतो, भावना व्यक्त करणे अवघड जाते, दृष्टी कमी होते इत्यादी.
२. हार्ट अटॅक ः उच्चरक्तदाबामुळे हृदयाच्या स्नायूंना अतिरिक्त ताण सहन करावा लागतो. त्यामुळे हृदयाच्या एखाद्या भागाला जर प्राणवायु किंवा रक्तपुरवठा कमी अथवा बंद झाला तर मग हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तसे झाल्यास रुग्णाला अस्वस्थ वाटते, गुदमरल्यासारखे होते, दम लागतो… अशी लक्षणे जाणवू लागतात.
३. हार्ट फेल्युअर ः जेव्हा हृदय शरीराला आवश्यक असलेला रक्ताचा पुरवठा करू शकत नाही तेव्हा हृदयाचे कार्य बंद पडते. अर्थात जेव्हा उच्चरक्तदाब असतो तेव्हा रक्ताचा पुरवठा संपूर्ण शरीराला करताना हृदयावरचा ताण वाढतो. तो ताण सहन न झाल्यास हृदय आपले काम करणे बंद करते. ह्यालाच ‘हार्ट फेल’ होणे असे म्हणतात. ह्याची लक्षणे म्हणजे दम लागणे, श्‍वास घ्यायला त्रास होणे, अशक्तपणा, पायांवर (खुबे व पावलं) सूज येणे, पोटावर सूज येणे तसेच मानेच्या शिरा फुगणे.
४. रक्त गोठणे ः सततच्या उच्चरक्तदाबामुळे रक्ताची द्रवता कमी होते व ते दाट बनते. त्याच्या गुठळ्या बनतात आणि ह्या गुठळ्या कधी कधी गंभीर लक्षणांचे कारण बनतात.
५. अन्युरीझम ः यामध्ये रक्तावाहिनीची भिंत पातळ होऊन त्याला फुगवटा येतो. ही प्रक्रिया काही वर्षे काहीही लक्षणे न जाणवता व्यक्तीच्या शरीरात सुरू असते आणि जेव्हा हा फुगा एवढा मोठा होतो की आजुबाजूच्या अवयवांवर दाब निर्माण करतो अथवा मग फुटतो त्यावेळी ज्या अवयवातील रक्तवाहिनी फुटते त्यानुसार लक्षणे निर्माण होतात.
६. जीर्ण वृक्क रोग ः जेव्हा उच्चरक्तदाबामुळे वृक्क म्हणजेच किडनीमधील बारीक रक्तवाहिन्या खराब होतात त्यामुळे किडनीची कार्यक्षमता कमी होते व ते शरीरातील नको असलेले घटक बाहेर टाकण्यात असमर्थ ठरतात व त्यामुळे किडन्या निकामी तर होतातच पण त्याचा दुष्परिणाम हृदयावर होऊन हृदयाचे विकारदेखील उत्पन्न होतात.
७. डोळ्यांचे विकार ः जेव्हा आपण वाढलेला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय करत नाही तेव्हा काही रक्तवाहिन्या आपोआपच बारीक होतात. त्यामुळे त्यातून रक्तवहन नीट होत नाही आणि हा प्रकार जेव्हा डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांच्या बाबतीत घडतो तेव्हा त्याने दृष्टीदेखील कमी होऊन आंधळेपणा, रेटिनोपॅथी असे विकार होऊ शकतात.
८. इतर विकार ः सततच्या उच्चरक्तदाबामुळे स्मृतीभ्रंश, मधुमेह, स्ट्रोक इत्यादी विकार उद्भवतात.
आयुर्वेद शास्त्रामध्ये प्रत्यक्ष उच्चरक्तदाब असा व्याधीचा उल्लेख केलेला नसला तरीदेखील उच्चरक्तदाब आटोक्यात ठेवायला बरेच प्रभावी उपाय आयुर्वेदामध्ये आहेत जे आपण नक्कीच करू शकतो आणि हे वेगवेगळ्या वैद्यांच्या अनुभवातून सांगितले गेले आहेत. तसेच आयुर्वेदामध्ये आहार व दिनचर्या ह्यासंबंधी ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्याचा वापर देखील आयुर्वेदातील पंचकर्म उपचारातील विरेचन, नस्य, रक्तमोक्षण, बस्ती हे उपचार आपण उच्च – रक्तदाबाच्या रुग्णावर करू शकतो. तसेच शिरोधारा, हृद्बस्ती यांचादेखील चांगला फायदा होतो. त्याचप्रमाणे औषधांमध्ये गुळवेल, तगर, अश्‍वगंधा, सर्पगंधा, ब्राह्मी, जटामांसी या वनस्पती किंवा त्यांपासून तयार केलेली औषधे वैद्य उच्चरक्तदाबाच्या रुग्णांसाठी वापरतात. त्याशिवाय वेळेवर जेवणे, नीट ताजा सकस आहार घेणे, वेळेवर झोपणे, सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, ध्यान-धारणा, अनुलोम-विलोम प्राणायाम, वेगवेगळे योग प्रकार यांचा वापर आपण नियमित केल्यास निश्‍चितच उच्चरक्तदाब आपण आटोक्यात ठेवू शकतो.
कारण जर आपला रक्तदाबाचा पारा नियंत्रणात राहिला तरच आपले हृदय सुखरूप राहून आपण दीर्घायुषी होऊ शकतो ह्यात वाद नाही.