स्वास्थ्यवर्धनासाठी रसायन विधी

0
591

डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

शरीरबलाबरोबर मनोबल वाढणे खूप महत्त्वाचे असते. ज्याचे मन शुद्ध आहे, अशाच व्यक्तींमध्ये रसायन प्रयोगांचा लाभ होतो. आजच्या युगात योग्य आहार-विहार, आचार-विचारांचे आचरण करून विविध रसायनांचा वापर करून स्वस्थ, निरोगी आयुष्य व्यतीत करता येते. 

प्राचीन ग्रंथामध्ये च्यवन ऋषींनी चिरतारुण्य व दीर्घायुष्य प्राप्त करण्यासाठी च्यवनप्राशसारख्या रसायनाचा प्रयोग केला अशी आख्यायिका वाचायला मिळते. त्याप्रमाणे काही ऋषी नेहमी एका ठिकाणाहून दुसरीकडे मार्गक्रमण करीत संचार करीत असत. असा संचार करीत असताना काही ग्रामवासियांच्या संपर्कात यायचे व त्यांच्याकडून त्यांचा आहार इत्यादीचे सेवन घडत असे. विविध ठिकाणची हवा, पाणी, वातावरण व आहार यांच्या परिणामस्वरूपी हे ऋषी हळूहळू मेदस्वी, सुखलोलुप असे बनू लागले. त्यांना त्यांची जपजाप्यादि नित्यकर्मेही योग्य प्रकारे करता येईनाशी झाली. अशावेळी प्रजाहितदक्ष अशा इंद्राने त्यांना ग्राम्यवासामुळे उत्पन्न झालेल्या या मनोग्लानी, वैस्वर्य, वैवर्ण्य आदि अवस्थांपासून दूर करणार्‍या जराव्याधिप्रशमन करणार्‍या ऊर्जस्कर अशा अमृतमय रसायन चिकित्सेचा उपदेश केला. ऐन्द्री, ब्राह्मी, क्षीरकाकोली, क्षीरपुष्पी, जिवंती, शतावरी, विदारी, पुनर्नवा, नागबला, स्थिरा, वचा, मेदा, महामेदा व अशाच प्रकारच्या अन्य जीवनीय गणातील द्रव्यांचा दुधाबरोबर वापर करावा असा हा उपदेश असून या रसायनाने सहा महिन्यात आयु, वय, तारुण्य, आरोग्य, स्वरवर्ण संपदा, उपचय, मेधा, स्मृती व उत्तम आणि इष्ट अशा अन्य शरीर भावांची उत्पत्ती होते, असे या इन्द्रोक्त रसायनात म्हटले आहे. अशा ह्या फक्त प्राचीन कथा म्हणून न घेता यावरून बोध घेऊन बदलत चाललेली जीवनशैली, कमी होत चाललेलं व्याधिक्षमत्व, झपाट्याने वाढत चाललेला रोगप्रसार यावर ‘रसायन चिकित्सा’ ही रामबाण चिकित्सा म्हणता येईल.
स्वस्थ मनुष्याचे स्वास्थ्यरक्षण करण्यासाठी किंवा त्यास अधिक ऊर्जा किंवा बल प्राप्त व्हावे म्हणून केली जाणारी चिकित्सा म्हणजेच रसायन चिकित्सा.
* लाभोपायो दि शस्तानां रसादीनां रसायनम्‌॥
रसायन हा शब्द रस व अयन या दोन घटक शब्दांपासून बनलेला आहे. रस म्हणजे रस रक्तादि सर्व धातू व अयन म्हणजे आप्यायन किंवा वर्धन होय. रसादि सप्तधातूंच्या वर्धनासाठी ज्या उपक्रमांचा उपयोग केला जातो त्यांना रसायन असे म्हणतात.
– रसायनाने प्रशस्त अशा धातूंची निर्मिती होत असल्याने साहजिकच वयःस्थापन घडते व अकाली येणारे वार्धक्य टाळता येते.
– बुद्धीवर्धन, बलवर्धन व रोगनाशन यांचे सामर्थ्य रसायनाने प्राप्त होते.
– व्याधीक्षमन हे शारीरिक बल व मनोबल यावर अवलंबून असते. रसायनाने शरीरधातूची सुयोग्य निर्मिती व बलवर्धन होत असल्यानेच शरीरातील व्याधीक्षमत्व – व्याधिप्रतिकारशक्ती वाढते व त्यामुळे रोगनाशन घडते.
– शरीरात जो धातू विगुण असेल, जो अवयव वा स्रोतस विकृत असेल त्या धातुची, अवयवाची वा स्रोतसाची विगुणता दूर करणारी चिकित्सा म्हणजे रसायन चिकित्सा!
– वार्धक्य प्राप्त झाल्यावर करावयाची ही चिकित्सा नसून वार्धक्य येऊ नये, तारुण्य अधिक काळ टिकावे म्हणून करावयाची ही चिकित्सा आहे. जरानाशन रसायन मात्र सप्तधातुवर्धकच होय.
– रसायन चिकित्सेने सर्वच शरीरधातू प्रशस्त उत्पन्न होत असल्याने दीर्घायुष्य, स्मृति-मेधा यांची वाढ होणे, आरोग्य प्राप्त होणे, तारुण्य अधिक काळ टिकणे, शरीराची कांती-वर्ण-सार यामध्ये प्रशस्तभाव उत्पन्न होणे, देहबल, इंद्रियबल व मनोबल वाढणे, व्यक्ती तेजस्वी बनणे, वाक्‌सिद्धी प्राप्त होणे या गोष्टी रसायनामुळे घडतात.
– रोग निर्माण झाल्यानंतर तो बरा करण्यासाठी उपचार करणे जरुरीचे असते खरे, पण रोग होऊच नयेत या दृष्टीने प्रयत्न करणे हे अधिक महत्त्वाचे ठरते म्हणून रसायन चिकित्सा ही अन्य चिकित्सेपेक्षा तुलनेने महाफलदायी आहे.

रसायनाचे कार्य कसे घडते?…
रसायनाने सप्तधातुवर्धन घडते. पण ते घडण्यासाठी धातु, स्रोतस, धात्वाग्नी आणि या सर्वांच्या क्रिया प्राकृत करणारा वायु यांचा एकत्रित विचार करावा लागतो. शरीरातील पंचकर्माद्वारे प्रथम शरीर शुद्ध करावे.
स्रोतःशोधन घडून वातानुलोमन होण्यासाठी भल्लातक, मरिच, पिप्पली ही रसायन द्रव्ये वापरावीत.
– धात्वाग्निवर्धनासाठी वसंत कल्पांचा वापर करावा. त्याचप्रमाणे विविध प्रकारची आसवारिष्टे ही सुद्धा जाठराग्नी प्रदीप्त करण्याबरोबर धात्वाग्निवर्धनाचे ही कार्य करतात.
– रसायनाचे कार्य चांगल्या प्रकारे व्हावे यासाठी तद् तद् धातूंच्या पोषक भावांची शरीराला आवश्यकता असते. दूध व अंडी हे दोन आहार पदार्थ सप्तधातुवर्धनासाठी अग्रगण्य आहेत.
त्याचप्रमाणे विशिष्ट धातू व स्रोतसांसाठी विविध पोषक द्रव्ये रसायन म्हणून वापरता येतात.
– रसधातु व रसवह स्रोतस ः रसधातुकरता खरे पाहता फारशा रसायन द्रव्यांची जरुरी भासत नाही. केवळ विविध प्रकारचे मण्ड, मंथ व आप्य पदार्थ यासाठी पुरेसे होतात. खर्जुरमंथ, लाजमंड व गुडूची.
– रक्तधातु व रक्तवह स्रोतस ः मांसरस, मांस, सुवर्णभस्म, कुष्मांड, बला, शतावरी, शुद्ध कारस्कर.
– मेद धातू ः सर्वच स्निग्ध पदार्थ विशेषतः वसा, गुग्गुळ, शिलाजतु.
– अस्थिधातु ः प्रवाळ, अजास्थिभस्म, कुक्कुटाण्डत्वक् भस्म, बाळभीचा डिंक.
– मज्जाधातु व मज्जावह स्रोतस ः वसा, मज्जा, घृत, रौप्यभस्म, वचा व भृंगराज.
– शुक्रधातु व शुक्रवह स्रोतस ः दूध, इंद्रगोप किडे, कपिकच्छुबीज, ब्राह्मी, मंडूकपर्णी, बस्ताण्ड.
– प्राणवह स्रोतस ः पिंपळी, भल्लातक, आमलकी, मरिच.
– उदकवह स्रोतस ः सर्व जलीय पदार्थ.
– अन्नवह स्रोतस ः मरिच, कपर्दिक, शंखभस्म, पर्पटीकल्प, हिंग, नागकेशर.
– मूत्रवह स्रोतस ः शिलाजतु, गोक्षुर, पुनर्नवा.
– पुरीषवह स्रोतस ः कुटज, बिल्व, हरितकी.
– स्वेदवह स्रोतस ः वंगभस्म
जरानाशन किंवा व्याधीनाशन रसायन ही सप्तधातुवर्धन रसायन चिकित्सा असते. पण काम्य रसायन, नैमित्तिक रसायन किंवा आजस्रीक रसायन या प्रकारेही रसायन चिकित्सा दिली जाऊ शकते.
– काम्य रसायन ः एखादी विशिष्ट कामना मनामध्ये धरून केली जाणारी रसायन चिकित्सा. उदा. रक्तधातुवर्धनाकरिता लोहकल्पांचा वापर करणे, बुद्धीवर्धनासाठी मेध्य रसायन वापरणे इत्यादी.
– नैमित्तिक रसायन ः काही विशिष्ट कालावधीसाठी घेतलेली चिकित्सा. व्याधी बरा झाल्यानंतर स्रोतसामध्ये आलेली विगुणता भरून काढण्यासाठी घेतलेले उपचार. उदा. ज्वरोत्तर काळामध्ये गुडूचीचा वा सुवर्णकल्पांचा वापर करणे.
– आजस्रीक रसायन ः हे रसायन नित्य सेवन करावयाचे आहे. धातुवर्धनासाठी घृत वा अन्य बल्य पदार्थांचा नित्य वापर, दुग्धपान, नियमित आहार, व्यायाम या सर्वांचा समावेश यात होतो.
आयुर्वेदीय विविध रसायन कल्प (मुख्यतः हरितकी व आमलकी युक्त).
– ब्राह्मरसायन, च्यवनप्राश रसायन, आमलक रसायन, हरितक्यादि रसायन, आमलकी घृत, आमलकावलेह, विडंगावलेह, नागबला रसायन, बलादि रसायन, भल्लातक घृत, क्षीर, क्षौद्र, तैल्य, लवण, तर्पण, पलल, सत्तु, ऐंद्र रसायन, लोहादि रसायन, मेध्य रसायन, पिंपळी रसायन, त्रिफळा रसायन.
– च्यवनप्राश ः मुख्यतः आवळ्याचा कल्प. आज व्यवहारात अधिक प्रमाणात वापरला जाणारा कल्प. या रसायन कल्पाचे सेवन करणारी व्यक्ती धां, धृति, स्मृति यांनी युक्त होते. शरीराकांती, आरोग्य, आयुष्य, इंद्रियबल्य, मैथुनशक्ती व जाठराग्नी हे सर्व वर्धमान होतात. रोगनाशक रसायन या दृष्टीने प्राणवहस्रोतस, कास, श्‍वास, क्षतक्षीण, हृद्रोग यासाठी च्यवनप्राश अत्यंत उपयुक्त होय.
– ऐंद्र रसायन ः हे रसायन ओज वाढविण्यासाठी श्रेष्ठ आहे. याच्या सेवनाने अकाली वृद्धावस्था येत नाही.
– मेध्य रसायन ः १. मंडूकपर्णी स्वरस, २. यष्टिमधु चूर्णाचा दुधाबरोबर प्रयोग, ३. गुडूची स्वरस, ४. मूळ व फळासहीत शंखपुष्पी कल्प हे चार रसायन कल्प आयुष्य वाढविणारे आहेत. ही मेध्य रसायने सकाळ-संध्याकाळ घ्यावीत.
– पिंपळी रसायन ः हे उत्कृष्ट रोगनाशन रसायन आहे. पिंपळी कफनाशक असल्याने खोकला, क्षयरोग, दमा, गलविकार, अर्श, विषमज्वर, स्वरभेद ह्या रोगांवर विशेष गुणकारी आहे. पिंपळी चूर्ण मध व तुपाबरोबर खावे.
– त्रिफळा रसायन ः आहार चांगला पचल्यानंतर १ हिरड्याचे चूर्ण, जेवणापूर्वी २ बेहेड्यांचे चूर्ण आणि भोजनोत्तर ४ आवळ्यांचे चूर्ण मध व तूप याबरोबर १ वर्षपर्यंत घ्यावे. याच्या सेवनाने मनुष्य रोग व वृद्धावस्था रहीत १०० वर्षेपर्यंत आयुष्य व्यतीत करतो.
– आचार रसायन ः हे मानस रसायन होय. शरीरबलाबरोबर मनोबल वाढणे खूप महत्त्वाचे असते. ज्याचे मन शुद्ध आहे, अशाच व्यक्तींमध्ये रसायन प्रयोगांचा लाभ होतो.
आजच्या युगात योग्य आहार-विहार, आचार-विचारांचे आचरण करून विविध रसायनांचा वापर करून स्वस्थ, निरोगी आयुष्य व्यतीत करता येते.