व्यक्तिस्तोम

0
131

खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या या वर्षीच्या दिनदर्शिकेवरून महात्मा गांधींचे छायाचित्र हटवून त्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राचा वापर झाल्याने विरोधकांनी मोठा गदारोळ माजवला आहे. सध्या निवडणुकीचे दिवस असल्याने या वादाला अधिक खतपाणी मिळालेले असले, तरी देखील अशा प्रकारच्या व्यक्तिपूजनाद्वारे कॉंग्रेसच्या राजवटीतील अंधभक्तीचेच अनुसरण या नव्या राजवटीत होणार आहे का हा प्रश्न निर्माण झाला आहे. भारतामध्ये सत्तेवरील राजकारण्यांनी आपापला वैचारिक वारसा मिरवताना हाती असलेल्या सत्तेचा दुरुपयोग करून आपल्या पूर्वसुरींचे सतत उदात्तीकरण चालवले. त्यालाही हरकत नसावी, परंतु इतरांवर सदोदित घोर अन्याय केला गेला. कॉंग्रेसने देशावर दीर्घकाळ राज्य केले, परंतु पं. जवाहरलाल नेहरू, नंतर इंदिरा गांधी, नंतर राजीव गांधी असा आपल्या नेत्यांचा उदोउदो करताना अन्य विचारधारांच्या नेत्यांना अडगळीत टाकले. नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतीवीर भगतसिंग यांची देशभक्ती काय कॉंग्रेसजनांहून कमी प्रतीची होती? परंतु आपल्या विचारसरणीशी जुळणार्‍या नेत्यांचा उदोउदो करीत असताना इतरांना खुजे ठरवण्याचा नेहमीच प्रयत्न झाला. सार्‍या प्रकल्पांना त्याच नेत्यांची नावे, सार्‍या योजना त्याच नेत्यांच्या नावाने याचा अतिरेक चालला होता. ए. सूर्यप्रकाश यांनी कॉंग्रेसच्या सरकारांच्या काळात जवाहरलाल, इंदिरा किंवा राजीव गांधींचे नाव असलेल्या वेगवेगळ्या योजना, विद्यापीठे, शिक्षणसंस्था, रस्ते, इमारती, बंदरे, विमानतळ, स्टेडियम, इस्पितळे अशांची एक यादी बनवली आहे, त्यांची संख्या अक्षरशः शेकडोंच्या घरात आहे! आता देशात सत्तापालट झाल्यानंतर पुन्हा याच प्रकाराची उलटी पुनरावृत्ती होणार आहे काय? लालबहादूर शास्त्री, सरदार पटेल यांच्या प्रतिमेला उजाळा देताना पं. नेहरू, इंदिरा गांधी यांना अडगळीत फेकल्याने त्यांनी या देशाला दिलेले योगदान कमी होणार नाही. आता तर दीनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी यांनाही राष्ट्रीय नेत्यांच्या पंक्तीत बसवून यत्र तत्र सर्वत्र त्यांचे नामकरण करण्याचे नवे पेव फुटले आहे. सत्तापालट झाला की दैवते बदलली, परंतु व्यक्तीपूजा त्याच धाटणीची राहिली आहे. केवळ राजकारणामध्येच नव्हे, तर इतरही जीवनांगांमध्ये अशी आंधळी व्यक्तिपूजा सर्रास दिसते. नरेंद्र मोदी यांना केंद्रीय राजकारणात आणले जाताना देशाला बव्हंशी अपरिचित असलेल्या या व्यक्तीचे नाव घरोघरी जाऊन पोहोचवण्यासाठी प्रसार माध्यमांपासून तंत्रज्ञानापर्यंत अनेक गोष्टींचा आधार घेतला गेला होता. प्रचंड पैसा या ब्रँडिंगमध्ये खर्ची पडला. मोदी यांनी देशाची धुरा हाती घेतल्यानंतर केलेले आमूलाग्र व्यवस्थात्मक आणि प्रशासनीक बदल प्रशंसनीय नक्कीच आहेत, परंतु एवढ्या मोठ्या देशाची धुरा केवळ एका व्यक्तीच्या खांद्यावरच आहे अशा रीतीने जे आज प्रस्तुतीकरण केले जाते आहे, ते योग्य नाही. ग्रीक पुराणांतील स्वतःच्याच प्रतिमेच्या प्रेमात पडलेल्या नार्सिससची कथा यासंदर्भात उल्लेखनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वर्षांपूर्वी घटनासभेपुढे बोलताना विचारवंत जॉन स्टुअर्ट मिलच्या एका अवतरणाचा दाखला देत सांगितले होते की, ‘‘लोकशाहीमध्ये नागरिकांनी कोणत्याही व्यक्तीच्या पायाशी आपले स्वातंत्र्य समर्पित करू नये. तिला एवढीही शक्ती देऊ नका की सार्‍या संस्था उलथून पडतील!’’ एखाद्या व्यक्तीप्रतीचा आदर, प्रेम, कृतज्ञता व्यक्त करणे हा एक भाग झाला, परंतु व्यक्तिपूजेचे स्तोम माजू नये. शेवटी कोणत्याही व्यक्तीच्या उंचीचे मोजमाप हे तिच्या कार्यावरूनच होत असते. मोदींचे मूल्यमापनही त्यांच्या ऐतिहासिक कार्यावरून होईल. तसबिरी, पुतळे, दिनदर्शिका आणि योजना व प्रकल्पांच्या नामकरणांवरून नव्हे.